दर्ग्याचे खादिम ‘शरीफ’ नाहीत

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
 
अजमेर दर्ग्याच्या खादिमांनी नजीकच्या काळात हिंदूंविरोधात भडकाऊ आणि चिथावणीखोर विधान केली असून त्यातूनच शराफतच्या बुरख्याआड लपलेला खादिमांचा भेसूर चेहरा समोर येत आहे. इतकेच नव्हे, तर अजमेरमधील शरीफ दर्ग्याच्या खादिमांची विधाने आणि त्यांची कुकृत्ये पाहता यापैकी कोणीही अजिबात शरीफ नसल्याचे स्पष्ट होते.
 
 
 
khadim
 
 
 
देशभरात दिवसेंदिवस इस्लामी कट्टरता वाढत चालली असून हिंदूंविरोधात द्वेषाचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न धर्मांध मुस्लिमांकडून केले जात आहेत. कधी ‘सर तन से जुदा’ करण्याची तयारी केलेले टोळके देशभरात सक्रिय होत आहे, तर कधी भारतातच हिंदूंचा आर्थिक बहिष्कार करण्याचे आवाहन केले जात आहे. इस्लामी कट्टरतेने थैमान घातलेले असताना इतिहासाची माहिती नसलेल्या व त्यामुळे आपल्या वर्तमानाचीही फिकीर नसलेल्यांकडून अजमेर दर्ग्यातून कधीही धर्मांधतेला प्रोत्साहन दिले जाणार नाही, असे म्हटले जात होते. कारण, आता आतापर्यंत हिंदू-मुस्लिमांतील एकता व बंधुभावाचे प्रतीक म्हणूनच अजमेर दर्ग्याची प्रतिमा तयार करण्यात आली होती. अनेक बॉलिवूड चित्रपटांतूनही तसे दाखवले गेले.‘जोधा-अकबर’ चित्रपटातूनही हिंदू-मुस्लिमांतले संबंध उत्तम असल्याचे दाखवले गेले. पण, गेल्या पंधरवड्यापासूनच्या घडामोडी पाहता अजमेर दर्ग्याचा वापर हिंदूंविरोधात धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट होते.
 
बॉलिवूड तारे-तारकांपासून तमाम राजनेत्यांनी चादर चढवण्याच्या प्रथेतून शांती आणि सौहार्दाचा आदर्श म्हणून कौतुक केलेल्या अजमेर दर्ग्याची असली हकीकत निराळीच असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदू-मुस्लीम एकता व सौहार्दाचे प्रतीक असल्याचे गोडवे गायल्या जाणार्‍या अजमेर दर्ग्याचे संचालन करणारी प्रवृत्ती नेमकी कशी, हे उजेडात येत आहे. तसेच अजमेर दर्गा व हिंदू-मुस्लीम एकतेचा भाबडेपणा नेमका कसल्या भुसभुशीतपणावर होता, हेही दिसून येत आहे. अजमेर दर्ग्याच्या खादिमांनी नजीकच्या काळात हिंदूंविरोधात भडकाऊ आणि चिथावणीखोर विधाने केली असून त्यातूनच शराफतच्या बुरख्याआड लपलेला खादिमांचा भेसूर चेहराही समोर येत आहे.
 
उदयपूरमधील कन्हैयालाल तेली या शिवणकाम करणार्‍या हिंदूची दोघा इस्लामी कट्टरपंथीयांनी गळा चिरुन हत्या केली. आता या नृशंस हत्येचे धागे अजमेर दर्ग्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. अजमेर दर्ग्याचा खादिम गौहर चिश्तीने दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर नुपूर शर्मांविरोधात घोषणाबाजी करवून घेत ‘सर तन से जुदा’चे नारे लावले होते. त्यानंतर तो दि. १७ जूनला उदयपूरला गेला. यावेळी गौहर चिश्तीने कन्हैयालालचा हत्यारा रियाज मोहम्मदची भेट घेतली. रियाजला हत्येनंतर ध्वनिचित्रफीत तयार करण्याचा सल्लादेखील गौहर चिश्तीनेच दिला होता. उदयपूर हत्याकांडात अटक केलेल्या अन्वर हुसैननेच गौहर चिश्ती आणि रियाज मोहम्मदची भेट घडवून आणली होती. इतकेच नव्हे, तर रियाज मोहम्मद आणि गौसच्या पलायनाची तयारीदेखील गौहर चिश्तीने केली होती. तथापि, उदयपूर हत्याकांडात नाव समोर आल्यापासून गौहर चिश्ती फरार झाला.
 
नुपूर शर्मांविरोधात द्वेषपूर्ण भाषण देणार्‍यांमध्ये अजमेर दर्ग्याच्या अंजुमन कमिटीचा सचिव सरवर चिश्तीदेखील सहभागी आहे. सरवर चिश्तीची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली होती. त्यात ‘अंजुमन कमिटी’च्या सचिवपदी निवड झाल्यानंतर सरवर चिश्तीने मुस्लीम जमावाला संबोधित करताना नुपूर शर्मांनी ईशनिंदा केल्याचे म्हणत भडकाऊ विधाने केली होती. ‘नबी की शान में गुस्ताखी हो रही हैं। ऐसा माहौल बना दिया गया हैं। अब ऐसा आंदोलन किया जाएगा जिससे पूरा हिंदुस्तान हिल जाएगा,’ असे तो यात म्हणत असल्याचे दिसते. सरवर चिश्ती कोणत्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला हादरा देण्याचे म्हणत आहे, हे तर तोच सांगू शकतो. पण, यातून हिंदूंना खुलेआम धमकी दिल्याचे आणि ‘सर तन से जुदा’वाल्या धर्मांध मानसिकतेला सरवर चिश्तीच पोसत असल्याचे दिसते. कारण, याआधी दि. २६ जून रोजी हिंदू धर्मीयांनी नुपूर शर्मांच्या समर्थनात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावरून सरवर चिश्तीने हिंदू दुकानदारांना लक्ष्य करत हिंदूंशी एक रुपयाचाही व्यवहार करू नका, असे आवाहन मुस्लिमांना केले होते.
 
अजमेर दर्ग्याचा आणखी एक खादिम सलमान चिश्तीदेखील विषवमन करताना पाहायला मिळाला. समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झालेल्या ध्वनिचित्रफितीत सलमान चिश्ती रडत रडत मोहम्मद पैगंबरावर केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा बदला घेण्याबद्दल बोलताना दिसते. त्यात सलमान चिश्ती, ‘वक्त पहले जैसा नहीं रहा, वरना मैं बोलता नहीं, कसम हैं मुझे पैदा करने वाली मेरी माँ की, मैं उसे सरेआम गोली मार देता, मुझे मेरे बच्चों की कसम, मैं उसे गोली मार देता और आज भी सीना ठोक कर कहता हूँ, जो भी नुपूर शर्मा की गर्दन लाएगा, मैं उसे अपना घर दे दूँगा और रास्ते पर निकल जाऊंगा, ये वादा करता हैं सलमान,’ अशी धमकी देत असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणार्‍याला आपल्या घराची ‘एक्सचेंज ऑफर’ देणार्‍या सलमान चिश्तीच्या बचावासाठी राजस्थान पोलिसांतलेच एक अधिकारी थेट ‘नशे में बोल गया’चा सल्ला देत बचावाचा प्रकार सांगताना ऐकायला मिळाले. उल्लेखनीय म्हणजे, खादिम सलमान चिश्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात १३ गुन्हे दाखल आहेत. अजमेरमधील शरीफ दर्ग्याच्या खादिमांची विधाने आणि त्यांची कुकृत्ये पाहता यापैकी कोणीही अजिबात शरीफ नसल्याचे स्पष्ट होते.
 
पुढचा मुद्दा अजमेर दर्ग्याच्या परंपरेचा आहे. अजमेर दर्गा इस्लामच्या सुफी परंपरेतला असून सुफी परंपरा शांतता, सौहार्दाचा विचार जगाला देते, असा दावा केला जातो. पण, सुफी परंपरेचा भूतकाळ पाहता तसे दिसत नाही. मोहम्मद पैगंबरानंतर साधारण ३५० वर्षे सुफी परंपरा इस्लामच्या मुख्य प्रवाहापासून अंतर राखून होती. पण, नंतर सुफी परंपरेचे पाईक कट्टरतेचा पुरस्कार करणार्‍या हजरत अल-गझालींच्या संपर्कात आले. अल-गझालींनी इस्लामच्या मुळाशी जाण्याचा म्हणजे सर्व गोष्टींचा कर्ता करविता अल्लाच असल्याचा उपदेश मुस्लिमांना केला होता. त्यांच्या या आवाहनाने इस्लाममध्ये कट्टरतेला अधिकाधिक जोर चढला. याच काळात सुफी परंपरेनेही आपण इस्लाममधून बाहेर होऊ, या धास्तीने अल-गझालींच्या कट्टर विचारांना अनुसरण्यास सुरुवात केली. त्यातून सुफी परंपरेत ‘बाशरा’ आणि ‘बेशरा’ असे दोन भाग पडले. ‘बाशरा’ म्हणजे कट्टर इस्लामी, शरियतला प्रमाण मानणारे व ‘बेशरा’ म्हणजे मस्त कलंदर, मलंग वगैरे. या ‘बाशरां’मधलेच प्रकार म्हणजे, चिश्ती, नक्षबंदी, फिरदौसी व कादरी. या सगळ्या घडामोडी मध्य आशियात सुरु होत्या, हे महत्त्वाचे. पण, ‘बाशरां’पैकी एक असलेल्या चिश्तींचा दर्गा अजमेरमध्ये, भारतात आहे.
 
आणखी एक गोष्ट म्हणजे, सुफी परंपरेतल्यांना अल-गझालींकडून ज्ञान मिळाल्यानंतर ते थेट भारतात आले. खरे म्हणजे, कोणालाही कोणतेही ज्ञान मिळाल्यानंतर ते मिळवणारे लोक त्याचा प्रसार आपण जिथे राहतो, त्या भागात, त्या लोकांत करतात, जसे भारतातील अनेक संत. पण, सुफी परंपरेतले लोक आपला प्रदेश म्हणजे मध्य आशिया सोडून भारतात आले, तेही कट्टरतावादी अल-गझालींच्या संपर्कानंतर. ते अन्य कोणत्याही मध्य आशियायी देशात गेले नाहीत. का? त्यांना विशिष्ट हेतूने भारतात पाठवण्यात आले होते का? सुफी परंपरेतील विविध प्रसिद्ध व्यक्तींचा इतिहास तपासल्यास त्याची अधिक माहिती मिळेल, पण, अजमेरमधील दर्गादेखील ‘बाशरा’ या सुफी परंपरेतील चिश्तींचाच आहे. अन् ‘बाशरा’ म्हणजे कट्टरता, शरियतला मानणारे. जी कट्टरता आतापर्यंत शांतता, सौहार्दाच्या आवरणाखाली झाकलेली होती, तीच अजमेर दर्ग्याच्या खादिमांच्या वेगवेगळ्या विधानांतून समोर आली आहे. त्यात वावगे काही नाही, कारण, त्यांच्यासाठी कट्टरता सामान्यच आहे, असते. इतके दिवस ती फक्त समोर आली नव्हती, आता समोर आली. त्यांच्यावर कायद्यानुसार व्हायची ती कारवाई होईलच, पण याकडे हिंदूंनीही सजगतेने पाहायला पाहिजे व आपली एखादी कृती कट्टरतेला प्रोत्साहन देणार्‍यांची ताकद वाढवणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.