व्हिडीओ व्हायरलची धमकी देत साडेदहा हजार उकळणारा हरियाणाचा संशयित अटकेत

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
जळगाव : व्हॉटसॲपवर चॅटींग करून अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन भुसावळ येथील युवकाकडून १० हजार ५८० रूपये आॅनलाइन उकळले होते. या प्रकरणी संशयिताला सायबर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून फसवणुकीची रक्कम हस्तगत करण्यात आली. मुरसलिम आशू मोहंमद (रा. गागडबास मेवात, हरीयाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.


Mursalim1 
 
तक्रारदार हा भुसावळ शहरातील रहिवाशी आहे. १८ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉटसॲप नंबरवर संशयिताने स्त्री असल्याचे भासवून चॅटींग केली. त्यानंतर संशयिताने तक्रारदाराच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवला. त्यानंतर तक्रारदाराचे काही फोटो घेवून स्त्रीसोबत व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तक्रारदाराने घाबरून दिलेल्या बँक अकाऊंटवर १० हजार ५८० रूपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १९ एप्रिल रोजी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तांत्रिक तपासात संशयित हा हरियाणाचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला हरियाणातून ८ जुलै रोजी अटक केली.