५० हून अधिक ‘लग्नाळुं'च्या हातावर तुरी, जळगाव जिल्ह्यातील भडगाव बनले केंद्र

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
जळगाव : लग्न होत नसलेल्या युवकांना मुलगी दाखवणे, ती पसंत पडली की, मुलाच्या कुटुंबाकडून १ ते १० लाख रुपयांपर्यंत सौदा ठरवायचा, लग्न लावून द्यायचे, लग्नानंतर दोन चार दिवसांमध्ये नवरीने दागिने घेऊन पळून जायचे. या पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या महिलेच्या टोळीने तब्बल ५० जणांपेक्षा अधिक युवकांची फसवणूक केल्याची माहिती दौलताबाद पोलिसांच्या तपासात उघड झाली. या टोळीचे महाराष्ट्रासह गुजरातमध्येही नेटवर्क आहे.
 

Marriage-Cheating-Racket 
 
दौलताबाद पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यानुसार मावसाळा येथील युवकाचे २६ मार्च रोजी लग्न लावून दिल्यानंतर चौथ्या दिवशी नवरीने दौलताबाद किल्ला पाहण्याचा बहाणा करुन पळ काढला. पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिलीप बचाटे व पथकाने केलेल्या तपासात या टोळीने ५० हून अधिक युवकांना फसविल्याचे समोर आले.
 
पोलिसांनी नववधू ममता पाटील (शुभांगी शिंदे बनावट नाव) हिला सुरुवातीला अटक केली. तिच्या चौकशीत लग्न लावून देण्याऱ्या टोळीची आशाबाई प्रकाश बोरसे (रा. भडगाव, जि. जळगाव) ही मास्टरमाईंड असून, तिला लताबाई राजेंद्र पाटील (रा. जळगाव) हिने मदत केल्याचे स्पष्ट झाले. पोलीस दोघींच्या शोधात होते.
 
६ जुलै रोजी लताबाई जळगावात असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक बचाटे, परीविक्षाधीन उपनिरीक्षक कांता परदेशी, शिपाई नितीन कापडे व सुदर्शन राजपूत यांचे पथक जळगावला पोहोचले. त्यांनी लताबाईला ताब्यात घेतले. तिने टोळीची सूत्रधार आशाबाई असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक भडगावला पोहोचले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच आशाने पळ काढला. पथक लताबाईला घेऊन दौलताबादला आले.
 
फसलेले अनेकजण बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रारी देत नाहीत. याचाच फायदा आशाबाई उचलत असल्याचेही आरोपींनी सांगितले. लग्नाळू युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीची सूत्रधार आशाबाई बोरसे हिचे भडगाव येथे आलिशान घर आहे. तिच्याकडे संपत्तीही असल्याचे येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.