लग्नाचे आमीष देत स्टेशन प्रबंधकाकडून तरुणीवर ४ वर्षे अत्याचार

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
भुसावळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

जळगाव : जिल्ह्यातील सावदा रेल्वेस्थानकावर स्टेशन प्रबंधक पदावर नोकरीस असलेल्या तरुणाने एका लग्नात २९ वर्षीय तरुणीशी ओळख करुन मोबाइल क्रमांक मिळवला. नंतर बोलणे सुरू करुन मैत्री, प्रेमाचे संबध निर्माण केले. तरुणीस रल्वेत नोकरी लावून देण्यासह लग्नाचे आमीष देत सलग चार वर्षे तरुणीवर अत्याचार केला. आता लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीने थेट पाेलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vinaybhang_JTB 
 
अंकुश किरण मोरे (वय 34, रा. भुसावळ) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंकुश हा सावदा रेल्वेस्थानकावर स्टेशन प्रबंधक म्हणून नोकरीस आहे.
 
सविस्तर घटना अशी की, 4 डिसेंबर 2017 रोजी अंकुशच्या कुटुंबियात लग्न समारंभ होता. या लग्नात पिडीत तरुणी देखील आली होती. अंकुशने त्यावेळी तिच्याशी ओळख निर्माण करुन मोबाइल नंबर मिळवला. यानंतर बोलणे सुरू करुन सुरूवातीला मैत्री व नंतर प्रेमसंबध तयार केले. तरुणीस रेल्वेत नोकरी लावून देईल, लग्न करेल असे आमीष तो वेळोवेळी देत होता. सन 2018 पासून त्याने तरुणीस एकांतात घेऊन जात अत्याचार केले. घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेऊनही अत्याचार केले.
 
दरम्यान, तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता भांडण करुन लग्नास नकार दिला. संपर्क करणेही बंद केले. या प्रकरणी तरुणीने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुशच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहेत.