सावखेडयात गावठी दारूसह अवैध धंद्यांना ऊत, बंदीसाठी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

    दिनांक : 10-Jul-2022
Total Views |
जळगाव : अमळनेर तालुक्यातील सावेखडा येथील ग्रामस्थांनी गावात विकली जाणारी अवैध गावठी दारू बंद करण्याची मागणी थेट नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्वीटरव्दारे केली आहे. लक्ष्मीकांत कदम यांनी गावातील हातभट्टीच्या अवैध दारू विक्री बंदीबाबतचा ग्रामपंचायतींच्या ठरावाची प्रतही मुख्यमंत्र्यांना ट्विट केली आहे.
 


Sawkheda1 
 
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील हातभट्टीची दारू व मटका बंदी करण्यात यावी असा ठराव ग्रामपंचायतीत करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागात दोन वेळा तक्रारी दिल्या. तरीपण काहीही उपयोग होत नाही. कृपया आपण सहकार्य करावे, खूप उपकार होतील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रस्त झालेल्या सावखेडा गावातील ग्रामस्थांनी एक पत्रक ट्विट केले आहे.
 
यात म्हटले आहे की, आमच्या सावखेडा गावात सन १९७२ पासून डुकरांचा व्यवसाय करायला आलेल्या भटक्या विमुक्त समाजातील लोकांनी गावात हातभट्टीच्या दारूचा उच्छाद मांडला आहे. गावठी दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. यामुळे बर्‍याच महिला वयाच्या तिशीच्या आत विधवा झालेल्या आहेत. अनेक कुटुंब मटक्यामुळे रस्त्यावर आले आहे. चोरीचे प्रमाण वाढले आहे. महिला, मुलींना गावात फिरण्यासही भीती वाटते, यात तरुण मोठ्या प्रमाणात या दारू, मटक्याच्या आहारी गेल्याने तरुणांची लग्न होण्यास अडथळे येत आहे. या रसायनयुक्त दारू, मटक्याच्या आहारी धावडे, मुंगसे, दापोरी, रुंधाटीसह आजूबाजूच्या गावातील तरुण ओढला जात आहे. सावखेड्यात तब्ब्बल सहा ते सात दारूचे अड्डे आहेत. त्या सहा जणांची नावेही तक्रार अर्जात नमुद केली आहेत. तसेच सट्टा चालविणार्‍या दोघांची नावे आहेत.
 
गावात बेकायदेशीररित्या विदेशी दारू, बियरही विकली जाते. यामुळे तरुण व्यसनाधीन होऊन गाव विनाशाच्या दिशेने जात आहे. गावात सट्टासह सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावी असा ठराव क्र. १८९ सावखेडा ग्रामपंचायतीने २४ जून २०२२ रोजी केला आहे. या सर्व दारू उत्पादकांचा कायमचा बंदोबस्त करून तरुण पिढीला यापासून वाचवण्याचे काम आपण करावे असे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना ट्विटरव्दारे याचना केली आहे.