सेक्सटॉर्शन : ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्... ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न

    दिनांक : 10-Jul-2022
Total Views |
धरणगाव : सध्या ‘सेक्सटॉर्शन’चा नवा फंडा वापरून अनेकांना लाखाेंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे धरणगावात जवळपास दोन तरुणांना अशाच प्रकारे गंडवण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
 
Sextortion
 
धरणगावातील एका तरुणासोबत व्हॉट्सअॅपवरून हिंदी भाषिक तरुणीने संपर्क साधला. आधी तरुणाशी मैत्री केली. त्यानंतर व्हिडिओ कॉलवरून तरुणीने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली. यानंतर तरुणाला ही कपडे काढायला सांगितले. त्यानंतर काही वेळात तरुणीने त्या तरुणाला फोन करून पैशांची मागणी केली. जवळपास दोन दिवस हा फोन सलग सुरु होता. भेदरलेल्या या तरुणाने अॅड. संजय महाजन यांना सर्व हकिगत सांगितली. यानंतर अॅड. महाजन यांच्यासह पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची भेट घेतली. पाे.नि. खताळ यांनी तरुणाला त्या तरुणीसोबत संवाद साधून कायदेशीर कारवाई करत असल्याची सूचना दिली. तेव्हापासून त्या तरुणीचे फोन बंद झाले आहेत.
 
मोबाइलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर ललनेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्यानंतर, औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडीओ कॉलिंग सुरू होते. अश्लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर पैशांची मागणी होते. नकार दिला तर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आणि चॅटिंग व्हायरल करून बदनामी करायची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग केले जाते. अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात आणि लाखो रुपयांना फसविले जातात.
 
सुरुवातीला या प्रकारच्या जाळ्यात सेलिब्रिटी, राजकारणी, इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना ओढले जात होते. फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील ऍप्सचा वापर करून हा गोरखधंदा केला जातो. आता तर सेक्सटॉर्शनचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे.
 
गुन्हेगार ‘सेक्सटॉर्शन’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर करतात. समाजातील इभ्रत, नाव खराब होऊ नये म्हणून लाखोंचा गंडा घातला गेलेले अनेकजण अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करत नाही. काहींनी तक्रार केली तरी गंडा घालायचे काम होताच सोशल मीडिया आणि बँक अकाउंट साफ करून गुन्हेगार पसार होतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हे आणि पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे.
 
सेक्सटॉर्शनचे ग्रामीण व्हर्जन ‘हनी ट्रॅप’
 
सेक्सटॉर्शनचे ग्रामीण व्हर्जन म्हणजे हनी ट्रॅप. या प्रकारात महिलांचा वापर करून पैसेवाले सावज जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर, सावजाकडून पैसा उकळला जातो. प्रसंगी सावजाला बदनामीची धमकी दिली जाते. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही हनी ट्रॅपचे लोण पसरत चालले आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे आहे की, त्यात बदनामी होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
 
कोणत्याही अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारल्यास त्यांना व्हॉट्सॲप क्रमांक देऊ नये. कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नका. खासगी विषयावर कुठलाही संवाद करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. असे केल्यास तुमचा व्हिडीओ कॉल आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला बदनाम करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी होईल. त्यामुळे अशा फसव्या कॉलपासून अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.