नामाचा गजर गर्जे भीमा तीर...

    दिनांक : 10-Jul-2022
Total Views |

‘माझे माहेर पंढरी’चा गजर करत वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने दाखल होतो. ज्या क्षणाची वारकर्‍यांना आतुरता, उत्कटता दाटून आलेली असते, त्या विठूरायाच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. वारीचा उरलासुरला थकवा, क्षीण सगळा क्षणार्धात वाहून जातो. तेव्हा, अशा या वारीचा हा नेत्रदीपक सोहळा, संत अभंगांतून साकारलेले विठ्ठल दैवत आणि वारकर्‍यांचे हे आध्यात्मिक प्रकटीकरण अशा विविधांगी पैलूंचे दर्शन घडविणारे हे विशेष लेख....
 

bhima 
 
 
 
टाळ-मृदुंगांची धून, लेझीमचा ताल, मुखी ग्यानबा-तुकारामाचा घोष, खांद्यावर भगवी पताका, गळा तुळशीमाळ आणि पांढर्‍या शुभ्र वस्त्रातली वारकर्‍यांची लांबच लांब रांग... वर्षानुवर्षे, शतकानुशतके चाललेली ही पंढरीची वारी. दरवर्षी ठरल्याप्रमाणे, ठरल्या दिवशी दर मुक्कामी मजल दरमजल करीत पुढे पुढे जात राहते आणि अगदी बरोबर आजच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचताच, अवघे भीमा तीर नामाच्या गजरात चिंब भिजून जाते...
 
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध संतांच्या पालख्या-दिंड्या पंढरपूरची वाट धरतात. प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूर मुक्कामी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण प्रवास म्हणजेच भागवत संप्रदायाची ही नितांत सुंदर वारीची परंपरा. ‘भेटी लागे जीवा लागलीये आस’ या ओढीने जो जो वारीत पायी चालतो, तो प्रत्येकजण या वारीचं गारूड अनुभवतो. हा विलक्षण अनुभव थक्क करणारा.
 
वारी पुण्यावरून निघून दिवे घाटात पोहोचते, तेव्हा ड्रोन कॅमेर्‍यातून टिपलेली तिची विहंगम दृश्य माध्यमातून झळकतात. वळणदार घाट रस्त्यावरून मार्गक्रमण करीत या टोकापासून त्या टोकापर्यंत कमनीय दिसणारी एक अनोखी पदयात्रा... एका लयीत चालणार्‍या वारकर्‍यांचे ते मनोहारी दृश्य अथपासून इतिपर्यंत डोळ्यात साठवून ठेवावसं वाटतं. पाहणार्‍यांचे मन हरखून जातं. डोळेभरून येतात. हृदय भक्तिभावाने काठोकाठ वाहू लागतं. सारा आसमंत भारावतो... त्या दृश्याचा मनावर एक खोल परिणाम उमटतो. त्या सार्‍याचे कुतूहल मिश्रित आश्चर्य दाटून येते. त्यातून अनेक प्रश्न समोर उभे राहतात की, गावागावातून संतमहंतांच्या दिंड्या-पालख्या निघतात कशा, एकमेकांना ठरल्या स्थळी ठरल्या वेळी भेटतात कशा... भक्तांचा मेळा लाखोंच्या संख्येने एके ठायी गोळा होतो कसा, एवढ्या शिस्तीत एका गतीत पाऊले पंढरीची वाट चालतात कशी... या भक्तिमय पार्श्वभूमीवर सार्‍या वातावरणात जे एक चैतन्य जागे होते, ती शक्ती येते कुठून... मन या प्रश्नांची उत्तरं शोधताना विचारात पडतं...
 
असा विचार आपल्यासारख्या सामान्य माणसापेक्षा विचारवंत मंडळी खरंतर जास्त करीत असतात. त्या विचारवंतांमध्ये एक चर्चा नेहमी झडते, त्यात तुलना अशी असते की, पाश्चिमात्य देशांमध्ये अनेकानेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी विज्ञानाचा पाया रचला. भौतिक शास्त्रातले सिद्धांत मांडले. माणसाच्या सुखासाठी अनेक शोध लावले. अंतराळातील खगोलशास्त्रीय सत्य सांगितले. मानवी जीवन विवेकवादाच्या आधारे शास्त्रीय दृष्टीतून जगावे, तर्कशास्त्राच्या कसोटीवर घासून वैचारिक बैठक ठेवावी, आधुनिक जगात शिकून-सवरून ज्ञानी झालेल्या माणसाने विज्ञानाची कास धरायला हवी... एकूण काय तर, विज्ञानातील सिद्ध ज्ञानाशिवाय दुसरा कशावर विश्वास ठेवू नये, हा या विचारधारेचा अंतिम परामर्ष आहे. त्याउलट आपल्याकडचे संत त्यांच्या समृद्ध अभंग संपदेतून काय सांगतात, तर ‘ठेविले अनंत तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ यातील ‘चित्ताचे समाधान’ या विषयाला हळूच वळसा घालून हे विचारवंत विचारतात; जर आहे त्याच स्थितीत राहून समाधान मानलं, तर माणसाची प्रगती कशी होणार? हा खडा सवाल अनेक प्रश्नांची वर्तुळे निर्माण करतो, या वर्तुळाच्या त्रिज्या केंद्रबिंदूकडे जाताना पाश्चात्य आणि भारतीय जीवनपद्धतीचा मागोवा घेत काही प्रमेय आणि सिद्धांत समोर ठेवतात.
 
हे खरेच आहे की, भौतिक सुखाची साधनं शोधून शास्त्रज्ञांनी मानवी जगणे सोयीचे केले. तंत्रज्ञानाने आधुनिक झालेलं जग सुखाच्या शिखरावर पोहोचले. प्रत्येक गोष्टीतली सोय आणि सुलभता माणसाच्या आज हातात आहे. हरएक सुविधा पायाशी लोळण घेते आहे. डिजिटल क्रांतीची तर बातच और! क्षणार्धात जगाच्या दुसर्‍या टोकाशी ‘कनेक्टिव्हिटी’ जोडणार्‍या या तंत्रावर आबालवृद्ध फिदा आहेत. कपोलकल्पित वाटणारं असं जग आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. ही सारी एक अजब किमया वाटते. परंतु, या संदर्भात एक मूलभूत सत्य आपल्या तत्त्ववेत्यांनी सांगितले आहे की, ज्ञान आणि विज्ञानाच्याही पुढे आध्यात्म आहे!
 
वरवरच्या सुखसुविधांच्या पल्याड आत्मिक सुखाकडे माणसाला घेऊन जाण्याचे संतपरंपरेचे उद्दिष्ट होतं. वैयक्तिक सुखापेक्षा एकूण मानवी समाजाच्या कल्याणाचा विचार सांगतानाच ’चित्ताचे समाधान’ करणारे काही मंत्र या संतांना सापडले होते. ज्ञानदेवांनी जगाच्या कल्याणासाठी ’पसायदान’ गायले ते स्वसुखाच्या कितीतरी योजने पुढे, अवघ्या विश्वाचे मंगल चिंतणारे होते. ’संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब’ अशी सर्वव्यापी कल्पना मांडून सृष्टीतली सारी तत्वं एकमेकास जोडण्याची ती अद्भुत कल्पना होती. या कल्पनेतली ताकद सर्वसमावेशक स्थायी तत्वाकडे नेणारी होती. अगदी सध्या जागतिक परिषदांमधून सुद्धा जगातले अनेक देश एकत्र येऊन संपूर्ण विश्वाचे हित कसे साधता येईल, याचा शोध घेत आहेत.
 
तत्कालीन संतांनी सांगितलेल्या समाजाच्या हिताचा हेतू घेऊन भक्तीच्या मार्गावरून चालणारी ही वारी आजही संत शिकवणुकीचा तोच संदेश घेऊन निघते आहे. वारीची प्रथा ज्ञानेश्वर-नामदेव यांच्या काळात खर्‍या अर्थाने जनमानसात रुजली. या संतांच्या विशाल आणि उदार दृष्टिकोनामुळे वारीचे स्वरूप सर्वसमावेशक झाले. नेमकी त्याचवेळी एक महत्त्वाची सामाजिक घटना घडली होती. ती म्हणजे, मूळ संस्कृतमधील गीता ज्ञानेश्वरांनी प्राकृतात लिहून जनसामान्यांसाठी खुली केली. सोप्या भाषेत हरिपाठ आणि अभंग-ओव्या रचल्या. त्याच रचना पंढरीला चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या भक्तमंडळींसोबत बसून ज्ञानेश्वर आपल्या गोड स्वरात गात असत. जमलेले लोक त्या सुरांवर डोलत असत, तर संत नामदेव अतिशय रसाळ शैलीत कीर्तन करीत. त्यांच्या प्रेरणेतून सर्वच संत मंडळ अभंग रचना करू लागले. त्यात संत कवयित्रीही सामील होत्या. वाळवंटात जमलेला हा संतमेळा भक्तिरसात बुडून जायचा.
 
कीर्तन-गायन-भजन यात रंगून जाणारे संत गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, संत जनाबाई, मुक्ताई अशा तत्कालीन संतांची ती अलौकीक मांदियाळी... त्या काळात फोटो, व्हिडिओ तंत्रज्ञान नव्हते; पण या सगळ्या दृश्याचा जणूकाही फोटो काढलाय अशा चित्रमय शैलीत त्यावेळच्या प्रमुख संत कवयित्री जनाबाई यांनी आपल्या बोलक्या अभंगात वर्णन लिहून ठेवलंय-
 
विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर। मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडीवरी। चोखा, जीवा बरोबरी
बंका कडेवरी। नामा करांगूली ही धरी।
’जनी’ म्हणे गोपाळा। करी भक्तांचा सोहळा॥
 
या सर्व संतांचे प्रिय संतशिरोमणी ज्ञानदेव यांनी अवघ्या १६व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्या घटनेने उदास झालेले संत नामदेव देशभ्रमणाला निघाले. पाकिस्तान-पंजाबपर्यंत हिंडले. भाषेच्या मर्यादा ओलांडून हिंदीत रचना केल्या. कीर्तनाच्या माध्यमातून आत्मशक्तीची ज्ञानज्योत लोकांच्या अंतरी पेटवली. तिचा प्रकाश तर आजवर सगळ्या समाजाला पुरतोय. कारण, अध्यात्म ही एक चिरंतन शक्ती आहे. ती काळाचे अनेक पर्व पार करून पुढेही टिकते.
 
भारतीयांच्या तर दैनंदिन जगण्यात सुद्धा आध्यात्मभाव अगदी सहजपणे विरघळून गेलेला आहे. तोच वारीच्या रूपात प्रचंड विस्तीर्ण होऊन भव्य दिव्यपणे प्रकट होतो. मनात वसलेलं, हृदयात साठलेलं, भावनेत ठसलेलं, बुद्धीत भरलेलं हेच आध्यात्म पंढरीच्या वाटेवर मैलोन मैल चालायला अथक बळ देतं! प्रत्यक्ष वारी जेव्हा पहिले रिंगण, दुसरे रिंगण, फुगड्या, फेर, गाणी, गवळणी असे वाटेवरच्या प्रवासातले सारे मनमुक्त आनंद लुटून विसावा घेत घेत पंढरीत पोहोचते, तेव्हा जिकडे बघावे तिकडे, ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी वारकर्‍यांची आवस्था झालेली दिसते. ज्या ओढीने ही लांबवर पायपीट केली, त्या विठूरायाच्या मंदिराचे कळसदर्शन होताच सारा शीणभाग हलका होतो. लहानथोर एकमेकांच्या पायावर डोकं ठेवत ‘माऊली, माऊली’ म्हणून एकमेकांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देतात. दोन आत्मे एक होऊन ’ विठ्ठलरूप’ झाल्याचा तो प्रगाढ अनुभव म्हणजेच, सगळ्या जगाला अचंबित करणारी ही महान भागवत परंपरा. तिचा सामूहिक उद्गार आहे पंढरीची वारी! मानवतेचे चिरंतन मूल्य जोपासणारा एक अनुपम्य सुखसोहळा!!
 
संतमंडळी एकावेळी जमवण्याची ही मूळ कल्पना होती; तीच मुळी सारे समाजिक स्तर एकत्र व्हावेत, भेदाभेद मिटून जावेत, जातीपातीच्या मान्यता विसरून जाव्यात, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भिंतींना भेदून समरसतेची भावना निर्माण व्हावी, यासाठीच संतमंडळींनी हा सामूहिक सोहळा प्रस्थापित केला होता. त्यानुसार आजही इथे सामील होणार्‍या विठ्ठलभक्तांमध्ये विशुद्ध एकात्मतेचा निखळ भाव असतो. प्रेमाचे धागे नकळतपणे गुंफले जातात. सारा समाज एकत्र आणण्याची ही एक अजब जादू कमालीची यशस्वी झाली ती वारीच्या माध्यमातून...
 
सर्वसामान्य समाजाला मार्ग दाखवून शुद्ध आचरण आणि व्यवहारी वर्तन यांची शिकवण देण्याचे संतांचे महत्कार्य वारीच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने आकाराला आले. जागोजागी होणारे पालख्यांचे भव्य स्वागत, गावोगावी होणारे चोख व्यवस्थापन या सार्‍यांच्या मागे आहे, सामाजिक एकतेचा भावना; जो या कृतीतून समोर स्पष्ट दिसतो. मुद्दाम काही शिकवण्याचा अविर्भाव संतांना आणावा लागला नाही. ती शिकवण आपोआप रूजली.
भक्तिभावाबरोबरच एकतेचे आणि समतेचे रेशमी वस्त्र आपल्या संतांनी हळूवारपणे विणले. एखाद्या कुशल विणकरासारखे श्रद्धेचे धागे इथल्या समाजाच्या हृदयात त्यांनी अशा कौशल्याने गुंफले की, गेल्या सात-आठशे वर्षांपासून आजतागायत ती भगवी पताका डौलाने फडकतेच आहे. दरवर्षी मोठ्या प्रेमाने ती खांद्यावर घेऊन निघालेले वारकरी अखेरी पंढरीत पांडुरंग चरणीची धूळ मस्तकी धारण करून धन्य होतात. ही वैभवशाली परंपरा जतन करून वर्तमानातसुद्धा ‘भेदाभेद अमंगल’ असे समाजभान जागृत ठेवण्याचे काम हा वारकरी संप्रदाय आजही निरलसपणे करीत आहे.
 
ज्ञानेश्वर-नामदेवांनंतर काही शतकांनी जन्मलेले, याच परंपरेतील थोर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगवाणीतून हिच ज्ञानगाथा लिहिली. ‘जोडावे धन उत्तम व्यवहारे’ अशी नैतिक शिकवण देऊन समाजाला जगण्याचा सत्य मार्ग सांगितला. संत आणि सामान्य कष्टकरी यांचे एक अंतरिक नाते पुन्हा एकदा दृढ झाले. म्हणूनच संत बहिणाबाई लिहून गेली ‘ज्ञानदेवे रचला पाया कळस जाहले तुकोबाराया.’ तेव्हापासून ग्यानबा-तुकारामांचे स्मरण करीत आपला सर्वात्मक समाज, संतवाणीचे भावरूप मनी घेऊन मोठ्या ताकदीने वारीत आजतागायत चालतो आहे. म्हणूनच पंढरीची वारी आपल्या सर्वकालिक समाजाचं प्रतिकात्मक रूप भासते.
 
प्रापंचिक सुखदुःख विसरून संतांच्या पवित्र पादुकांची पालखी खांद्यावर घेत त्यांचा मौलिक संदेश पोहोचण्याचे काम वारी आपल्या पद्धतीने सातत्याने करते आहे. यात सामील होणारा प्रत्येक वारकरी एका अलौकीक शक्तीच्या दर्शनाने तृप्त होतो, जगण्या-भोगण्याचे विलाप, कष्ट-यातनांचे सारे बंध गळून मन विठ्ठलचरणी लीन होते, सारे व्याप-ताप दूर पळतात. न सांगता येणार्‍या एका तरल आनंदाची पुंजी गाठी बांधली जाते, यातूनच पुढल्या वारीची ओढ लागते.
 
कोरोनाच्या आरोग्य संकटात दोन वर्ष वारीचा हा सोहळा स्थगित झाला. तरी काळाची गती कधीच थांबत नाही. कालचक्र अखंड चालवणारी महान शक्ती अस्तित्वात आहे. तिच शक्ती विठ्ठलभक्तीची ही पताका पुन्हा डौलाने फडकवते आहे.
 
श्रद्धा, भक्ती, आस्था आणि जगण्याच्या आत्मविश्वासाचे शाश्वत बळ देणारी पंढरीची वारी दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आषाढीला चंद्रभागेच्या तिरी मुक्कामाला येईल आणि नामसंकीर्तनात रंगून दंगून जाईल. आता तर वारी व्यवस्थापन समितीने वारी मार्गात खूप सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पंढरपूर शहरातही वारकर्‍यांच्या आरोग्याची खास काळजी घेतली जाणार आहे. ’निर्मलवारी’ अभियानातून वारीतील स्वच्छता जपली गेली आहे.
 
पंढरीला जाईपर्यंत टाळकरी, वीणेकरी आणि कीर्तनकार वारीचा रस्ता भक्तिमय करून टाकतात. या वर्षीच्या वारीत तर तरूण कीर्तनकारांनी मोठ्या आनंदाने कीर्तनाची परंपरा जपलेली दिसली. शिवाय अनेक तरूण मुले अभंग गायनाने भक्तिमय वातावरण निर्मिती करीत होते. वारकर्‍यांच्या सुखाचा हा ठेवा कुणी हिरावून न्यावा, असा नाहीच!
 
वारकर्‍यांची अशी श्रद्धा आहे की, ’चंद्रभागेच्या तिरी उभा श्रीहरी.’ या ओवीत म्हटलंय तसं, आम्हा भक्तांची वाट पाहात तो विठ्ठल अठ्ठावीस युगे आमच्यासारख्या अनन्य भक्तांसाठीच विटेवर उभा आहे. याच श्रद्धेच्या बळावर विठ्ठलनामाचा जयघोष करीत, ’नामाचा गजर गर्जे भीमा तीर’ या अभंगात म्हटल्याप्रमाणे या आषाढी एकादशीला ’अवघे गरजे पंढरपूर’ असे सर्वपराचित चित्र पुन्हा साकार होईल आणि अवघी पंढरी त्या गजराने दुमदुमून जाईल, नेहमीप्रमाणे....