लोभासाठी नाही, स्थैर्यासाठीच!

    दिनांक : 01-Jul-2022
Total Views |
 
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड करुन देवेंद्र फडणवीसांनी हे नवीन सरकार लोभासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठीच पुढील अडीच वर्षे कार्यरत राहील, याची एकीकडे तजवीज करत ठाकरे आणि पवारांना जोरदार दणका दिला आहे.
 
 

fadanvis 
 
 
 
महाराष्ट्राचे सरकार एक ना एक दिवस अंतर्विरोधानेच कोसळेल,’ हे देवेंद्र फडणवीस मागील अडीच वर्षांपासून वारंवार जाहीरपणे सांगत होते. ‘हे सरकार आम्ही पाडणारही नाही आणि पडले तर जनतेवर निवडणुका न लादता स्थिर सरकारसाठी कटिबद्ध आहोत,’ ही बाबही फडणवीसांनी एकदा नव्हे,तर शंभरदा अधोरेखित केली. महाराष्ट्रातील हे तिघाडी सरकार आपापसांतील कलहातूनच अखेरच्या घटका मोजेल, ही भविष्यवाणीही फडणवीसांचीच! त्यामुळे फडणवीसांच्या ‘अंतर्विरोधा’चा अर्थ हा तीन पक्षांतील बेबनाव व कुरघोडी असाच मागील अडीच वर्षे सरसकट लावला गेला. परंतु, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर या अंतर्विरोधाची दुसरी बाजू समोर आली. तीन पक्षांपैकी एकानेही या सरकारचा पाठिंबा न काढताच, शिवसेनेतील अंतर्विरोधानेच ठाकरे सरकार गडगडले. पण, एकनाथ शिंदे समर्थकांचा बंडखोर आमदारांचा गट सुरतमार्गे गुवाहाटीला गेल्यापासून बंडखोरांसोबत सामंजस्याची भूमिका घेण्यापेक्षा, त्यांना डुक्कर, प्रेतं, तरंगणारी विष्ठा वगैरे संबोधत अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत बेमालूमपणे अपमानित केले गेले. केवळ वाचाळ संजय राऊतच नाही, तर खुद्द उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही अशाच तथाकथित शिवराळ भाषेचा अर्वाच्च प्रयोग केला.
 
आमदारांची समजूत काढण्यापेक्षा त्यांच्यावर गद्दारीचा टॅग लावून शिवसैनिकांना रस्त्यावर उतरविले. या आमदारांच्या कार्यालयांवर, घरांवर हल्ले चढविले. त्यांच्या फोटोंना काळे फासले. शिवसेनेचे शत्रू म्हणून त्यांची अवहेलना केली. ‘बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, आपल्या बापाच्या नावावर लढा’ वगैरे अप्रिय शब्दांत हिणवले. परंतु, त्यानंतरही या बंडखोर गटांतील आमदारांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी अनुद्गारही काढले नाहीत की, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर हर्षोल्ल्हास व्यक्त केला नाही. उलट महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करुन हिंदुत्वाची कास धरावी, हीच शिंदे गटाची शेवटपर्यंतची मागणी कायम होती. परंतु, ठाकरे सरकारने या बंडखोरांविषयी चर्चेचा नाही, तर पवारांच्या सांगण्यानुसार चाबकाचाच फटकारा अवलंबला. परिणामी, विश्वासमताच्या सर्वोच्च लढाईत पराभूत झाल्यानंतर ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्गही मोकळा झाला.
 
या सगळ्या राजकीय नाट्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, हे माध्यमांसह महाराष्ट्राच्या जनतेलाही अपेक्षित होते. मात्र, फडणवीसांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करताच सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. अनपेक्षित आणि अनाकलनीय असा हा धक्का होता. कारण, असे काही होईल, याची स्वप्नातही कुणी कल्पना केली नसावी. कारण, मुख्यमंत्रिपदासारखे राज्यातील सर्वोच्च पद नाकारुन फडणवीस नेमके काय साध्य करु पाहत आहेत, याचा क्षणभर थांगपत्ता कुणालाही लागणे तसे मुश्कीलच! पण, फडणवीसांनी अत्यंत चाणाक्षपणे एका दगडात अनेक पक्ष्यांना घायाळ करण्याची किमया या एका निर्णयामुळे साध्य केली. ते म्हणतात ना, कधी कधी एखादे पाऊल मागे घेणे ही भविष्याची तजवीज असते. तसाच काहीसा प्रकार भारतीय जनता पक्षाने या खेळीतून केला असून त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसतील, याबाबत तीळमात्रही शंका नाही.
 
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची वर्णी लागल्याने, त्यांच्या नेतृत्वातील हा बंडखोर गट पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेण्याची शक्यताच मुळी मावळली आहे. कारण, आजही मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच आणि बाळासाहेबांचा, हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणारा शिवसैनिकच आहे, यावर या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शिंदेंना गटनेता म्हणून समर्थन देणारे आमदार पुन्हा ठाकरेंच्या गोडीगुलाबीला भूलणार नाहीत, हेच खरे! तसेच या एका निर्णयामुळे ‘मातोश्री’च्या पायाखालची वाळू पुरती सरकली असून ‘मातोश्री’च्या आशीर्वादाशिवाय, आधाराविनाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतो, हे अकल्पित वास्तवास उतरले. त्यामुळे ‘ठाकरे’ आडनावाचा वृथा अहंकार आणि ‘शिवसेना म्हणजे ठाकरे घराणेच’ या समजाला फडणवीसांनी सुरुंग लावला.
 
‘मातोश्री’चे राजकारण आणि विधिमंडळाचे राजकारण यांच्यात उद्धव ठाकरेंनी पवारांच्या सांगण्यावरुन केलेली ही सत्तेची सरमिसळ त्यांचीच अंतत: नाचक्की करणारी ठरली. शिवसेना ठाकरेंची असली, तरी राज्यातील सत्ताकेंद्र हे शिंदेंच्या भोवती केंद्रित झाल्यामुळे ‘मातोश्री’चे उरलेसुरले महत्त्वही संपुष्टात आल्यात जमा म्हणावे लागेल. त्यामुळे मनोहर जोशी, नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरेंचाच आदेश अंतिम होता. मात्र, आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी पक्षप्रमुख राहण्याचीच शक्यता जास्त. भाजपच्या या चाणक्यनीतीमुळे शिवसेनेतील घराणेशाही नामक कीडही एकाएकी उखडून फेकली गेली. त्यामुळे भविष्यात आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे सोपविण्याचे ठाकरेंचे मनसुबेही धुळीस मिळाले आहेत. कारण, बंगल्यावर बसून पक्ष चालवणे आणि मंत्रालयात बसून राज्याचा राज्यशकट सक्षमपणे हाकणे, या दोन पूर्णत: भिन्न बाबी असून दोन्ही दगडावर एकाच वेळी पाय ठेवला, तर तोंडावर आपटण्याचीच वेळ येतेच, हाच ठाकरेंसाठीचा मोठा धडा! त्यामुळे या खेळीतून शिवसेनेचा जरी मुख्यमंत्री विराजमान झाला असला तरी ठाकरेंची वाचाळ शिवसेना मात्र पुरती तोंडघशीच पडली. तेव्हा, आगामी काळात शिंदेंशी जुळवून घेऊन शिवसेनेला एकसंध ठेवायचे की, काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करुन उरल्यासुरल्या शिवसेनेलाही सुरुंग लावायचा, याचा निर्णय आता सर्वस्वी पक्षप्रमुखाचांच!
 
भाजपच्या या निर्णयाने ठाकरेंबरोबरच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा, कर्त्याधर्त्या पवार साहेबांनाही फडणवीसांनी एकाच खेळीत धोबीपछाड दिला. एकप्रकारे ‘महाविकास आघाडी’ नामक हा अनैसर्गिक आघाड्यांचा खेळच भविष्यात खेळला जाणार नाही, याची तजवीज फडणवीसांच्या या ‘मास्टर स्ट्रोक’ने केलेली दिसते. त्यामुळे जे पवार या महाविकास आघाडीचे भक्कम संरक्षक वगैरे मानले जात होते, त्यांच्या तथाकथित राजकीय मोठेपणाचा फुग्गाही फडणवीसांनी शिवसेनेच्या टाचणीनेच फोडून काढला. आधी एकदा अजितदादांना हाताशी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा फडणवीसांनी प्रयोग केला होताच. पण, त्याहीपेक्षा पवार साहेबांना त्यांच्या आधाराशिवाय शिवसेनेचाच मुख्यमंत्री खुर्चीवर बसवून दिलेली ही सणसणीत चपराक पवारांच्याही सर्दैव स्मरणात राहील. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राजकीय चाणक्य, जाणते राजे या पवारांच्या खोट्या प्रतिमेलाही मुळापासून उखडून टाकण्याचेच काम या एका निर्णयाने केले. तेव्हा, पवार साहेबांच्या पुढेही राजकीय चाली खेळणारा खरा कसलेला पहिलवान म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत सिद्ध केले आहेच. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार’ नामक नावाचे वलयच पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची किमया या एका खेळीने साधलेली दिसते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने आता ३६० अंशांच्या कोनात आपली कूस बदलली असून अभद्र आघाड्यांचा खेळ फार काळ टिकत नाही, यावर यानिमित्ताने पुनश्च शिक्कामोर्तब झाल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
 
मुख्यमंत्री भाजपचा नसला तरी भारतीय जनता पक्ष हा जनसेवेसाठी सर्दैव कटिबद्ध आहे, असाही संदेश पक्षश्रेष्ठींच्या विनवणीवरुन उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारुन फडणवीसांनी दिला. फडणवीसांच्या मनाचा हा मोठेपणा असून त्यांची राजकीय परिपक्वता आणि वजन या एका निर्णयामुळे हजारोपटीने वाढले आहे. केवळ राज्याच्याच राजकारणात नाही, तर राष्ट्रीय राजकारणातही तत्व आणि हिंदुत्वाचाच एक पायंडा यानिमित्ताने फडणवीसांनी घालून दिला. त्यामुळे बंडखोरांना ‘तुम्ही सत्तेत येऊन भाजपची धुणीभांडी कराल’ म्हणून अपमानास्पद वागणूक देणार्‍या राऊतांसारख्या वाचाळवीरांना ‘फडणवीस’ नावाचे रसायन कधीच समजले नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणार्‍या या ऐतिहासिक निर्णयामुळे मात्र हिंदुत्वाची पुन:स्थापना राज्यात झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच तमाम जनतेला सुखावणारे असतील, असा विश्वास वाटतो. प्रशासकीय कौशल्य वेळोवेळी सिद्ध केलेल्या शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!