राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला : देशाला मिळणार पुढील महिन्यात नवे राष्ट्रपती

    दिनांक : 09-Jun-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक तारखेची घोषणा केली. १८ जुलै रोजी मतदान होईल. २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची (President) तारीख आज, गुरुवारी निवडणूक आयोगाने घोषित केली. १८ जुलै रोजी मतदान घेण्यात येईल. तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. २९ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल.

rajiv kumar
 
 
 
मतदान संबंधी काही नियम :
 
१. निवडणुकीत मतदानासाठी विशिष्ट शाई असलेला पेन पुरवण्यात येईल.
 
२. मतदान करण्यासाठी १, २, ३ असे लिहून पसंती दर्शवावी लागेल.
 
३. पहिली पसंती न दर्शवल्यास मत रद्द ठरवले जाईल. कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी करता येणार नाही.
 
४. संसदेत आणि विधानभवनांमध्ये मतदान होईल.
 
५. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले.
 
तत्पूर्वी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. मागील वेळी १७ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना मतदान करता येत नाही. लोकप्रतिनिधीच या निवडणुकीत मतदान करू शकतात.
 
विधान परिषदेच्या सदस्यांनाही मतदानाचा अधिकार नाही. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर, त्यांनाही या निवडणुकीत मतदान करता येत नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'सिंगल ट्रान्सफरेबल वोट' प्रणालीद्वारे मतदान होते. याचाच अर्थ राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेचा एक सदस्य एकच मत देऊ शकतो.