नियोजनानुसारच वाजावी शाळेची घंटा

    दिनांक : 08-Jun-2022
Total Views |

वेध

 

कोरोनामुळे गेली दोन वर्षे School शाळा नियोजनाचा खेळखंडोबा झाला. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नसले, तरी अभ्यासक्रम आणि अभ्यासातले सातत्य शिक्षकांना व विद्यार्थ्यांना टिकविता आलेले नाही.

 
 
 
 
 
students

 

 
 
 
 
परिणामस्वरूप एकाग्रता आणि शिक्षणाचे गांभीर्यही कमी झाले, हे वास्तव आहे. पण, त्याचे खापर कोणावरही फोडता येणार नाही. कारण, स्थितीच तशी होती. सध्या कोरोना बर्‍यापैकी नियंत्रणात आहे. जून महिन्याच्या मध्ये किंवा शेवटी चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून तसे संकेत मुंबईत वाढणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येतून मिळायला लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते आवश्यक ती सर्व काळजी घेतल्यास तिसर्‍या लाटेप्रमाणे चौथ्या लाटेलाही आपल्याला थोपविता येईल. ते गृहीत धरूनच राज्याच्या शिक्षण विभागाने 2022-23 शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार School शाळेची घंटा विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात 15 जून रोजी वाजणार आहे. विदर्भात 27 जूनपासून शाळांमध्ये किलबिलाट सुरू होईल. इयत्ता पहिलीत प्रवेशित होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 'पहिले पाऊल' हा स्वागताचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्याचे कागदावर जे नियोजन करण्यात आले आहे ते प्रत्यक्षात उतरावे, ही सर्वांचीच इच्छा आहे.
 
नियमित शाळा सुरू असणे हे देशाचे उज्ज्वल भविष्य असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लाखमोलाचे आहे. शिक्षकांसाठीही ते फारच उपयुक्त आहे. व्यवस्थेच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक आहे. सुदृढ समाजाच्या निर्मितीचे शिक्षण हे प्रभावी माध्यम असल्याने त्यात कोणतीही हयगय होणार नाही, याची काळजी शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला घ्यावी लागणार आहे.
 

School शाळा सुरू करताना आवश्यक ती सर्व खबरदारी शिक्षण विभागाने घ्यायला हवी. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी हमी दिली आहे. त्यानुसार कृती होणेही अपेक्षित आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत आवश्यक त्या साधनसुविधांना प्राधान्य देणे महत्त्वाचे काम ठरणार आहे. खाजगी शाळा वगळता विदर्भासह उर्वरित राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची अवस्था फारच बिकट आहे. शाळेची इमारत, स्वच्छतागृह, शाळेची स्वच्छता, पिण्याचे पाणी, पंखे, लाईट, बसण्याची व्यवस्था या मूलभूत गरजांची वाताहत आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचा जप जितका गरजेचा आहे, तेवढ्याच शाळा नीटनेटक्या ठेवणे आवश्यक आहे. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर राहिला तर शिकविणार्‍यांचा आणि शिक्षण घेणार्‍यांचा उत्साह वाढतो. कोरोना नियंत्रणालाही हातभार लागतो. काही खाजगी शाळांमध्ये उपरोक्त अडचणी आहे. त्याकडेही लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. वेळेत आणि नियमित School शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे धोरण स्वागतार्ह आहे. पण, त्यासोबतच शाळांमधल्या सुविधांचा विषय त्याच धोरणाचा भाग असायला हवे. कडे दुर्लक्ष करून त्या धोरणाची उद्दिष्ट्यपूर्ती साधता येणार नाही. शासनाच्या लेखी कायम दुर्लक्षित राहिलेला सुविधांचा विषय यंदा तरी ऐरणीवर घ्यावा, ही अपेक्षा आहे.

 

कोरोनाचे सावट असताना शाळा सुरू होत असल्याने कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. आता हे नियम पाळण्याची जबाबदारी फक्त शिक्षण विभागातल्या अधिकारी व शिक्षकांचीच नाही तर विद्यार्थी व पालकांचीही राहणार आहे. चालढकल न करता हे कार्य गंभीरतेने करावे लागेल, याचे भान पदोपदी सर्वांना ठेवावे लागेल. बेभान झाले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. काहींनी पहिली मात्राही घेतलेली नाही. त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असून 6 ते 11 वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. लवकरच तेही सुरू होईल. हेही लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे लागणार आहे. काही शिक्षकांनी व पालकांनी वर्धित मात्रेकडे कानाडोळा केलेला आहे. शाळा सुरू होण्याच्यापूर्वी वर्धित मात्रा घ्यावी आणि स्वत:सह विद्यार्थ्यांनाही सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वाचे काम व्हायला हवे. शिक्षण विभागाने कागदावरच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी केली तरच लवकरच सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्रातल्या अडचणी टाळणे शक्य होणार आहे. गेल्या दोन वर्षांचा वेदनादायी अनुभव विस्मरणात जाईल, या पद्धतीने यंदाच्या शैक्षणिक सत्राचे नियोजन व्हावे आणि त्या नियोजनानुसारच प्रत्येक School शाळेची घंटा वाजावी, ही अपेक्षा व्यक्त करून शिक्षक, विद्यार्थी व पालकांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा!

 
- गिरीश शेरेकर
 

- 9420721225