अंजनेरी : आध्यात्मिक चेतनेचे ऊर्जाकेंद्र

    दिनांक : 06-Jun-2022
Total Views |

अंजनी पर्वतावर अंजनीमातेसोबत बाल हनुमानाचे श्रीविग्रह प्रतिष्ठापित आहे. श्री हनुमंताचे भौतिक व आध्यात्मिक रहस्य वेगवेगळे आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, अणूपासून ब्रह्मांड व्यापणारे त्यांचे तत्त्व गूढ आहे. श्री हनुमंताशिवाय परात्पर श्रीराम अपूर्ण आहे. ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील अंजनेरी क्षेत्र म्हणजे आध्यात्मिक चेतनेचे ऊर्जाक्षेत्र आहे.सध्या उद्भवलेल्या हनुमंत जन्मस्थळ वादाच्या निमित्ताने या ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुराणकथा व आनंद रामायण यांच्या आधारे संस्कृती कोशातील उल्लेखाप्रमाणे, ब्रह्मगिरीजवळील अंजन पर्वतावर केसरी वानर राहत होते.
 
 
 
prakalp
 
 
त्यांना अंजनी व अद्रिका नावाच्या दोन बायका होत्या. अंजनी वानरमुखी आणि अद्रिका मार्जरमुखी होती. पूर्वाश्रमीच्या अप्सरा असणार्‍या या दोघींना इंद्राच्या शापामुळे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. एक दिवस केसरी वानर तेथे नसताना महर्षी अगस्तींचे येथे आगमन झाले. या दोघींनी त्यांचा आदरसत्कार करून बलवंत व सर्व लोकोपकारक अशा पुत्राच्या प्राप्तीसाठी वर मागितला. तसा वर देऊन अगस्ती मुनी दक्षिणेकडे निघून गेल्यावर वायूने अंजनीला व निऋत्तीने अद्रिकेला पाहिले. ते त्यांच्याशी रममाण झाले. पुढे अंजनीस हनुमान व अद्रिकेला पिशाचराज झाले, असे हे पौराणिक काळातील प्राचीन स्थानाचे महत्त्व. यानंतरही या जागृतस्थानाचे प्रस्थ वाढत गेले.
 
अंजनी पर्वतावर अंजनीमातेसोबत बाल हनुमानाचे श्रीविग्रह प्रतिष्ठापित आहे. श्री हनुमंताचे भौतिक व आध्यात्मिक रहस्य वेगवेगळे आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, अणूपासून ब्रह्मांड व्यापणारे त्यांचे तत्त्व गूढ आहे. श्री हनुमंताशिवाय परात्पर श्रीराम अपूर्ण आहे. हनुमंत म्हणजे मूर्तिमंत शौर्य, पराक्रम, दक्षता, बल, धैर्य, बुद्धिमत्ता, राजनीतिज्ञ, राजकीय कृत्याला शेवटास नेण्याची हातोटी, ब्रह्मचर्य यांचा अपूर्व संगम होय. सप्तचिरंजीवात हनुमान त्यांचे स्थान आणि त्याचप्रमाणे चिरंजीव हे त्यांचे जन्मस्थान. जोपर्यंत रामकथा जीवंत आहे तोपर्यंत श्री हनुमान जीवंत आहे आणि आणि तोपर्यंत हे जन्मस्थान. म्हणूनच युगायुगांपासून श्रीरामचरित्र गायले जात आहे.
 
हनुमंतांचा योगसिद्धीशी संबंध असल्यामुळे नाथपंथाशी त्यांचा निकटचा संबंध आहे आणि त्यासाठी अंजनी पर्वताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पदभ्रमण करीत असताना श्री मच्छींद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर आले. त्यांनी जगदंबेकडे शाबरी विद्येचे कवित्व करावे, यासाठी आशीर्वाद मागितला. जगदंबा त्यांना घेऊन समोर असलेल्या मार्कंडेय पर्वतावर गेल्या. तेथे अदृश्य विशाल अशा नागवृक्षाचे दर्शन घडविले. वृक्षावरील देवतांचा परिचय करून दिला आणि त्या दैवतांना प्रसन्न करण्यासाठी सांगितले की, ऋष्यमूक पर्वतराजीत ब्रह्मगिरी निकट अंजन नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर काचीत नावाची एक दक्षिणगामी नदी वाहत आहे. तिच्या प्रवाहाने पुढे गेल्यावर तिच्या काठी हत्तीच्या पावलाएवढी १०० पाण्याची कुंडे आहेत आणि त्या ठिकाणी भगवती महाकालीचे स्थान आहे. मार्गावरील वाळलेल्या पांढर्‍या वेलीचा तुकडा घेऊन तो प्रत्येक कुंडात टाकावा. ज्या कुंडात ती वेल सजीव झाली असेल, त्याला पालवी फुटली असेल, त्या कुंडातील जलाने स्नान करून त्या कुंडातील जल घेऊन मार्तंड पर्वतावर जाऊन त्या वृक्षावरील एक-एक दैवत प्रसन्न करून घ्यावे व त्यांच्याकडून शाबरी विद्या कवित्वास आशीर्वाद व वर मिळवून घ्यावा.
 
आजही अंजनी पर्वतावर श्री महाकालीची गुंफा असून कालौघात कुंडे अदृश्य झाली आहेत. परंतु, अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर एका हनुमान जयंतीच्या दिवशी कोण्या जाणकाराकडून काही गोल कुंडे असल्याची माहिती मिळाली. शोध केल्यावर जवळजवळ हत्तीच्या पाया एवढी चार ते पाच गोलकुंडे दृष्टीस पडली. श्री मच्छींद्रनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा अंजनी पर्वत नाथपंथीयांसाठी व साधकांसाठी पूजनीय आहे. नाथपंथात मारुतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मारुतीच्या विनंतीवरून श्री मच्छींद्रनाथ स्त्री राज्यात गेले होते. गोरक्षनाथ आणि मारुतींचे स्वसामर्थ्य प्रदर्शनार्थ युद्धही झाले होते. तसेच नाथपंथीय स्थानावर हनुमंताची पूजा अर्चना होत असते, एवढेच नव्हे तर नाथपंथाच्या १२ उपपंथांपैकी ध्वजनाथ पंथाचे प्रवर्तक म्हणून हनुमंताचा मान आहे.
 
ब्रह्मगिरीच्या कुशीत ज्योतिर्लिंग स्वरूपात विसावलेला आदिनाथ-त्र्यंबकराज, जवळच अंजन पर्वतावरील भगवान शिवाचा अंशावतार मारुती आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी संजीवनी समाधी घेतलेले शिवाचे अवतार निवृत्तिनाथ हे प्रचंड ऊर्जेचे स्रोत या क्षेत्री विराजमान आहेत. हा केवळ योगायोग नव्हे. श्री हनुमंत प्रत्येक युगात आपल्या सूक्ष्मातिसूक्ष्म अशा वास्तव्याने साधकांना त्यांच्या साधनेचे योग्य फळ देत असतात व परमेश्वराचा साक्षात्कार घडवून आणीत असतात. परमेश्वराच्या साक्षात्कारापूर्वी हनुमंताची उपासना करावी, असा संकेत असून, मारुतीराय आपल्या भक्तांना या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात.
 
प्राचीन आयुर्वेदाच्या दृष्टीनेसुद्धा अंजनी पर्वताचे महत्त्व आहे. कायाकल्प करण्यासाठी ज्या वनस्पतींचा उपयोग केला जातो, त्या दुर्मीळ अशा वनस्पतींची उपलब्धता याच पर्वतावर होते, असे उल्लेख आढळून येतात. याशिवाय हा प्रदेश वन्य पशु-पक्षी तसेच ऋतुचक्रानुसार विविध फळा-फुलांनी नटलेला आहे. डोंगरमाथ्यावर भव्य तलाव असून त्यास बारमाही पाणी असते.
काही वर्षांपूर्वी येथे पाचव्या शतकातील ताम्रपट मिळाल्याचे माहिती मिळते. आजही अंजनी पर्वताच्या पायथ्याशी अनेक भग्न मंदिरांचे अवशेष दिसतात. माथ्यावर काही ठिकाणी गुहा दिसतात. ही भग्न मंदिरे अभिरराज व देवगिरीचे यादव (सन ११५० ते १३०८) या काळातील आहे. यापैकी एका देवालयाच्या दरवाज्यावर सन ११४० चा संस्कृत शिलालेख आढळून येतो. शेऊण यादवाच्या एका वाणी प्रधानाने येथील काही दुकानांचे उत्पन्न या देवळाला दिल्याचा उल्लेख आहे. अशीही माहिती प्राप्त होते की, इसवी सनाच्या चौथ्या शतकात आभिरांचे मांडलिक त्रिकूटक येथे राज्य करीत होते. यादवांच्या काळातही अंजनेरी भरभराटलेली -वैभवशाली नगरी होती. पूर्वी प्रसिद्ध क्षेत्र श्री त्र्यंबकेश्वर घोर अरण्यात असल्याने श्वापदांपासूनरक्षण व्हावे, या हेतूने यात्रेकरू अंजनेरी येथे येत असत व रात्री मुक्काम करून दुसर्‍या दिवशी पहाटे श्री त्र्यंबकेश्वर दर्शनास जात असत.
 
मारुतीचे जन्मस्थान असलेल्या अंजन पर्वताचे महत्त्व अनन्यसाधारण तर आहेच, पण स्थल-काळ-कल्पपरत्वे काही भेद असतीलही. परंतु, हे भेद समन्वयात्मक आहे. सध्या हिंदू समाजाची वाटचाल दिव्य अग्निपथावरून चालली असताना क्षूद्र प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीलोलुप धर्माचार्यांनी असे वाद करून हिंदू समाजात भ्रमभेद करू नये. कलियुगी संघशक्ती या न्यायाने हिंदू समाज एकसंघ कसा राहील व त्याआधारे राष्ट्राचे पुनर्निर्माणास हातभार लावला जाईल, हेच पाहावे. मग हे राष्ट्रच हनुमानाचे जन्मस्थान आहे
.
लेखक: देवेंद्रनाथ एन. पंड्या