योम यरूशलेम आणि सहा दिवसांचं युद्ध

    दिनांक : 04-Jun-2022
Total Views |

जेरूसलेम शहरातील सर्व धर्मियांच्या पवित्र प्राचीन स्थानांना जराही धक्का लागू नये, म्हणून संरक्षणमंत्री जनरल मोशे दायान आणि त्याचा चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल यित्झाक राबिन यांनी पूर्व जेरूसलेममध्ये रणगाडे, तोफा किंवा चिलखती गाड्या न नेता, फक्त पॅराट्रूपर्स पथक उतरवलं. विमानांमधून हवाई छत्रीद्वारे हे हत्यारबंद पॅराट्रूपर्स कमांडो पूर्व जेरूसेलमममध्ये उतरले आणि त्यांनी अरब प्रतिकार मोडून काढत पूर्व जेरूसेलम जॉर्डनच्या ताब्यातून मुक्त केलं. तो दिवस होता दि. ७ जून, १९६७.
 
 

sainik 
 
आपल्या हिंदू कालगणनेप्रमाणेच जगातल्या सर्व प्राचीन समाजांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र कालदणना आहेत, पंचांग आहेत. चिन्यांचं वेगळं पंचांग आहे. पारशांचं वेगळं पंचांग आहे. तसेच, ज्यू लोकांचं पण वेगळं पंचांग आहे. त्यातलं गणित, त्यातले अधिक महिने, त्यातले महिन्यांचे दिवस हे पण वेगळे आहेत.
 
आपली हिंदू कालगणना चैत्र महिन्यापासून सुरू होते नि तिच्यात प्रत्येकी ३० दिवसांचे १२ महिने असतात. तशी ज्यू कालगणना ही ‘निसान’ या नावाच्या महिन्याने सुरू होते नि तिच्यात ३० आणि २९ अशा एकाआड एक दिवसांचे १२ महिने असतात. परवाच्या २८ आणि २९ मे या दिवशी तसा ज्यू पंचांगानुसार ‘इयार’ नावाच्या महिन्याचा २८ वा दिवस होता. ज्यू पद्धतीनुसार हा दिवस २८ मेचा सूर्यास्त ते २९ मेचा सूर्यास्त, असा मोजला जातो. ज्यू कालगणनेनुसार हे चालू वर्ष, म्हणजे सप्टेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ हे वर्ष ५७८२ ए.एम. वर्ष आहे.
 
‘ए.एम.’ म्हणजे ‘आनो मुंडी’ किंवा जगाच्या उत्पत्तीपासून. म्हणजे ज्यू पंचांगकर्त्यांचं असं म्हणणं आहे की, जगाच्या उत्पत्तीपासून आमच्या पंचांगाची गणना सुरू झाली. ती आता ५७८२ या वर्षापर्यंत चालू आहे. आपलं सध्या कलियुगाब्द ५१२३वं वर्ष सुरू आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने ज्यू कालगणना कलियुगपर्व ६५९ या वर्षी सुरु झाली असावी, असे म्हणायला हरकत नाही. असो. तर परवा २८ व २९ मे रोजी इस्रायलमधल्या आणि विशेषतः जेरूसलेममधल्या ज्यू नागरिकांनी ’जेरूसलेम डे‘ किंवा ’योम यरूशलेम‘ साजरा केला. हा दिवस कोणताही प्राचीन धार्मिक सण, उत्सव नसून अगदी आधुनिक असा लष्करी विजय दिवस आहे. त्या दिवसांच वैशिष्ट्य म्हणजे, इस्रायली तरूण हातात डेव्हिडचा तारा असलेले झेंडे घेऊन ते नाचवत नाचवत मिरवणुकीने ’वेलिंग वॉल’कडे जातात, प्रार्थना करतात. राजा हेरॉड याने इसवी सन पूर्व १९ या वर्षी टेंपल माउंट म्हणजेच देवळाच्या टेकडीवर एक अतिभव्य मंदिर बांधलं होतं. त्याचा १६०० फूट लांब आणि ६२ फूट उंच एवढा भिंतीचा भाग आज शिल्लक आहे. तो पश्चिमेकडचा भाग आहे. म्हणून त्याला ‘वेस्टर्न वॉल’ असे म्हणतात किंवा गेली कित्येक शतकं ज्यू लोक त्या भिंतीसमोर दुःख व्यक्त करायचे म्हणून तिला ‘वेलिंग वॉल’ असेही म्हणतात.
 
इसवी सन सुमारे ६६ ते ७० या काळात रोमन लोकांनी ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमधून पूर्ण हद्दपार केलं. त्यांची देवळं, धार्मिक स्थळं, कब्रस्थान उद्ध्वस्त केली. पुढे इ.स. १५१६ साली पॅलेस्टाईन जे एकदा तुर्कांच्या ताब्यात गेलं, ते थेट १९२० पर्यंत. मध्ये १८३२ ते १८४० असा अल्पकाळ इजिप्तने ते गिळण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याला ते पचलं नाही. १९१९च्या व्हर्सायच्या तहाने ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन आपल्या ताब्यात घेतलं. नुकत्याच झडून गेलेल्या पहिल्या महायुद्धात (सन १९१४ ते १९१८) ज्यू लोकांनी इंग्रजांना भरपूर मदत केली होती. त्याचं बक्षीस म्हणून पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचं राष्ट्र बनवायला ब्रिटनने तत्वतः मान्यता दिली.
 
ब्रिटनच्या या मान्यतेमुळे पॅलेस्टाईनमध्ये राहणारे अरब संतापले. कारण, ते गेली किमान १२०० वर्षं त्या भूमीत राहात होते. शिवाय ते मुसलमान होते. त्यांना आपल्या भूमीत अन्य कोणत्याही धर्माचे लोक नको होते. १८०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनमधून हद्दपार होऊन जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांसाठी पण हा जीवन-मरणाचा लढा होता. त्यांच्या नेत्यांनी तो कमालीच्या हुशारीने लढवला. १९२० सालापासून जगभरातले ज्यू पद्धतशीरपणे पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होऊ लागले. चिडलेल्या अरबांनी त्यांच्या नि इंग्रज सरकारच्या विरोधात सशस्त्र दंगे केले. ज्यूंनी अरबांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं ‘तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे!’
 
१९३३ पासून घटनाचक्र आणखीनच वेगाने फिरू लागलं. जर्मनीत सत्तारूढ झालेल्या हिटलरने किमान ६० लाख ज्यूंना ठार मारलं. रशियात सत्तारूढ असणार्‍या लेनिन आणि स्टॅलिनने किती ज्यूंना नाहीसं केलं, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अशा सगळ्या भीषण, अमानुष खाटिकखान्यातून बचावून अखेर दि. १४ मे, १९४८ या दिवशी इस्रायल हे ज्यू धर्मीय लोकांचं स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र पॅलेस्टाईन या त्यांच्या मूळ भूमीवरूनच निर्माण झालं.
 
यामुळे संतापलेल्या अरब देशांनी दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. १५ मे, १९४८ या दिवशी इस्रायलवर सशस्त्र आक्रमण केलं. इजिप्त, ट्रान्स जॉर्डन, इराक, सीरिया, लेबेनॉन आणि सौदी अरेबिया यांच्या सुमारे ६० हजार सैन्यासमोर इस्रायलचं सुमारे ३० हजारांचं सैन्य, अशी ही विषम लढाई पुढचे नऊ महिने म्हणजे दि. १० मार्च, १९४९ पर्यंत चालू होती. तिच्यात इस्रायलने सगळ्या अरब देशांना सणसणीत झोडपून काढलं. फक्त ट्रान्स जॉर्डनने त्याला रोखून धरत जेरूसलेम शहराचा पूर्व भाग स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं.
 
१९५२ सालापासून इजिप्तमध्ये अब्दल गमाल नासेर किंवा नासर हा नेता झपाट्याने पुढे आला. मुळात इजिप्तच्या लष्करात लेफ्टनंट कर्नल असलेला नासर भलताच महत्त्वाकांक्षी होता. १९५२ साली त्याने राज्यक्रांती केली आणि तो राष्ट्राध्यक्ष बनला. अतिशय आक्रमकपणे त्याने भराभर अनेक सामाजिक, राजकीय आणि लष्करी सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे तो हुकूमशहा असूनही लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. १९५६ साली त्याने सुवेझ कालव्यावरचे ब्रिटिश-फ्रेंच वर्चस्व रद्दबातल करून सुवेझचं राष्ट्रीयीकरण केलं. त्याविरूद्ध ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल यांनी लष्करी कारवाई केली. पण, ती अपयशी ठरून उलट नासरची लोकप्रियता आणखी वाढली.
 
आता नासरला पुन्हा इस्रायलला समूळ नष्ट करण्याची स्वप्न पडायला लागली. त्याने सोव्हिएत रशियाच्या मदतीने आपलं रणगाडा दल आणि हवाईदल एकदम अत्याधुनिक बनवलं. १९६७ सालच्या मे महिन्याअखेरीस युद्धाचे ढग पुरेपूर भरून आले. पुन्हा एकदा इस्रायलच्या सर्व बाजूंनी अरब राष्ट्रांचा फास आवळला जाऊ लागला. मग इस्रायलने फालतू वेळ दवडला नाही. दि. ५ जून, १९६७ या दिवशी इस्रायलने आकस्मिक हवाईयुद्धाला सुरुवात करून इजिप्तचं जवळपास संपूर्ण हवाईदल विमानतळावरच खतम करून टाकलं. इस्रायली प्रदेश भाजून काढण्यासाठी उत्सुक असेलेली इजिप्शियन विमानं हवाई अड्ड्यांवर उभी असतानाच धडाधडा पेटली नि नष्ट झाली. मग इस्रायली रणगाडा दलाने गाझा पट्टी आणि सिनाई द्वीपकल्पात जोरदार मुसंडी मारली आणि इजिप्शियन रणगाडे उद्ध्वस्त करीत इस्रायली रणगाडा दल प्रमुख जनरल ताल याची आर्मर्ड कोअर सुवेझ कालव्याच्या काठावर येऊन उभी राहिली.
 
पूर्वेकडे जॉर्डनच्या प्रदेशात अशीच वेगवान धडक मारत लेफ्टनंट जनरल उझी नार्किस यांच्या पथकांनी वेस्ट बँक हा संपूर्ण प्रदेश जिंकला. त्यातला सर्वात महत्त्वाचा परिसर होता शहर जेरूसलेमचा पूर्व भाग. संपूर्ण जेरूसलेम शहरात सर्वत्र ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांना पुण्य पवित्र असणारी अनेक प्राचीन स्थानं आहेत. त्यांना जराही धक्का लागू नये, म्हणून संरक्षणमंत्री जनरल मोशे दायान आणि त्याचा चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल यित्झाक राबिन यांनी पूर्व जेरूसलेममध्ये रणगाडे, तोफा किंवा चिलखती गाड्या न नेता, फक्त पॅराट्रूपर्स पथक उतरवलं. विमानांमधून हवाई छत्रीद्वारे हे हत्यारबंद पॅराट्रूपर्स कमांडो पूर्व जेरूसेलमममध्ये उतरले आणि त्यांनी अरब प्रतिकार मोडून काढत पूर्व जेरूसेलम जॉर्डनच्या ताब्यातून मुक्त केलं. तो दिवस होता दि. ७ जून, १९६७.
 
१९४८-१९४९च्या युद्धबंदीनंतर जॉर्डनने ज्यू लोकांना पूर्व जेरूसलेममध्ये यायला बंदी केली होती. म्हणजेच ज्यू धर्मीयांना सुमारे २० वर्षं त्यांच्या पवित्र ‘वेलिंग वॉल’ जवळ जाता येत नव्हतं. त्यामुळे आता मुक्त झालेल्या जेरूसलेममध्ये ‘वेलिंग वॉल’ जवळ पहिल्यांदा जाऊन पोहोचणार्‍या ज्यू इस्रायली पॅराट्रूपर कमांडो सैनिकांच्या भावना वर्णनातीत होत्या. ते आनंदाने रडतही होते, हसतही होते. या मजकुरासोबतचं छायाचित्र पाहा. डेव्हिड रूबिंजर या इस्रायली छायाचित्रकाराने ते घेतलेलं आहे. तो इस्रायली सैन्याचा अधिकृत छायाचित्रकार होता. खरं म्हणजे तो सिनाईमध्ये तैनात होता.पण, त्याला अकस्मात खबर मिळाली की, पूर्व आघाडीवर काहीतरी जबरदस्त घटना घडणार आहे. पूर्व आघाडी म्हणजे जेरूसलेम! रूबिंजर मिळेल त्या वाहनाने सिनाईमधून निघाला आणि कसाबसा जेरूसलेममध्ये पोहोचला. हे छायाचित्र त्याने तो विशिष्ट कोन साधण्यासाठी जमिनीवर आडवं पडून घेतलेलं आहे. इस्रायली लष्कराने ते मोठ्या प्रमाणावर छापलं आणि वाटलं. त्या कमांडोच्या चेहर्‍यावरच्या भावना या संपूर्ण इस्रायल राष्ट्राच्या भावना बनल्या. इस्रायली सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मिशाएल खेशिन यांच्या मते, “हे छायाचित्र संपूर्ण देशाची संपत्ती बनलं आहे.”
 
या घटनेला ५५ वर्षं पूर्ण होत असताना आणि त्या छायाचित्राच्या निमित्ताने एक विजिगिषू राष्ट्र आपल्या शत्रूंवर मात करून आपलं पवित्र स्थळ परत मिळवताना पाहून अर्थातच आठवण होते दि. ६ डिसेंबर, १९९२ची.