देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मान

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
पंढरपूर : पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईची यंदाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदाची विठ्ठलाची शासकीय पूजा कोण करणार याबाबत उत्सुकता होती. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे चित्र स्पष्ट झालं आहे.
 

fadanvis 
 
 
 
बारामती तालुक्यातील काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्याचं रिंगण पार पडलं. परंपरेनुसार परीट समाजानं पालखीला धोतराच्या पायघड्या घालून स्वागत केलं. भाविकांच्या उत्स्फूर्त जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे रिंगण पार पडलं.
 
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यात दाखल झाली. तिथं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखीचं स्वागत केलं. त्यांनी विठ्ठल रुक्मिणी वेशातील लहानग्यांसह तुकोबारायांच्या पालखी रथाचं सारथ्य केलं. आणि फुगडी खेळत वारीचा आनंदही लुटला. पालखीचा आजचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये आहे.
 
बीड जिल्ह्यातील संत वामनभाऊ महाराज यांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाली. टाळ-मृदुंग, भगवी पताका आणि बैलजोडीच्या रथासह पालखी रवाना झालीये. मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी दिंडीचं नेतृत्व केलंय. अनेक वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात रवाना झाली.