काँग्रेसचे गणित हरियाणा, राजस्थानमध्ये फसणार?

    दिनांक : 03-Jun-2022
Total Views |

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने दहा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पक्षामध्ये अतिशय वाईट स्थिती असतानाही काँग्रेसने राज्यसभा उमेदवारी जाहीर करताना प्रादेशिक नेत्यांच्या मतांना महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
 
 
gandhi1
 
 
 
काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर नुकतेच पार पडले. त्या शिबिरामध्ये सालाबादप्रमाणे पक्षांतर्गत सुधारणांविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्ष असावा, याविषयीदेखील ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध समित्या पक्षाने तयार केल्या आहेत. मात्र, या समित्या म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचे पक्षातील नेत्यांनाही पुरते माहीत आहे. सततच्या पराभवांमुळे पक्षसंघटनेस कमालीचे नैराश्य आले आहे, तरीदेखील ते नैराश्य दूर करण्यासाठी पक्षामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचे चिंतन शिबिरामध्ये दिसली नाही. चिंतन शिबिरानंतर पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शांततेत पक्षाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि आपल्या राज्यसभेचा मार्ग मोकळा करून घेतला. अर्थात, सिब्बल यांची ही खेळी म्हणजे काँग्रेस आणि सपाचे ‘म्युच्युअल अंडरस्टॅण्डिंग’ असल्याची दिल्लीत चर्चा आहे. असो. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने दहा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पक्षामध्ये अतिशय वाईट स्थिती असतानाही काँग्रेसने राज्यसभा उमेदवारी जाहीर करताना प्रादेशिक नेत्यांच्या मतांना महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याउलट अतिशय काळजीपूर्वक रणनीती आखल्याने काँग्रेसला धक्का देण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे.
 
राज्यसभा निवडणुकीतमध्ये महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणाकडे देशाचे लक्ष लागले आहे. या तीन राज्यांतील १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानमध्ये सुभाष चंद्रा, हरियाणात कार्तिकेय शर्मा आणि महाराष्ट्रात धनंजय महाडिक हे मैदानात उतरल्याने ही लढत रंजक बनली आहे. राजस्थानमध्ये नामांकनाच्या शेवटच्या दिवशी खासदार सुभाष चंद्रा यांनी अपक्ष, तर हरियाणामध्ये कार्तिकेय शर्मा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सुभाषचंद्रा आणि शर्मा यांना भाजपने आपला पाठिंबा देऊ केला आहे. दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. महाडिक यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला नाही म्हटले तरी धक्का बसला आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये काँग्रेसला घेरण्याचे काम भाजपने केले आहे. काँग्रेसला धक्का देण्यात भाजपला यश आल्यास या राज्यांमधील काँग्रेस पक्षसंघटनेमध्येही फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
राजस्थानमध्ये चार जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसने रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने नामांकनाच्या शेवटच्या दिवशी तिसर्‍या जागेसाठी सुभाषचंद्रा यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे. राजस्थाममध्ये एक जागा जिंकल्यानंतर भाजपकडे ३० अतिरिक्त मते असतील, तर दोन जागा जिंकल्यानंतर काँग्रेसकडे २७ अतिरिक्त मते असतील. अशा स्थितीत दुसरी जागा जिंकण्यासाठी भाजपला ११ अतिरिक्त मतांची गरज आहे, तर काँग्रेसला तिसर्‍या जागेसाठी १४ अतिरिक्त मतांची गरज आहे. राज्यात १३ अपक्ष आहेत, प्रत्येकी तीन जागा ‘आरएलपी’, ‘बीटीपी’, दोन ‘सीपीएम’ आणि एक ‘आरएलडी’कडे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नजरा या अतिरिक्त आमदारांवर आहेत.
 
येथे सुभाषचंद्रा रिंगणात उतरल्याने काँग्रेसपुढे अडचणी उभ्या राहण्याची दाट शक्यता आहे. सुभाषचंद्रा राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार बनल्याने हरियाणातील शाई बदल प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. २०१६ सालच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये सुभाषचंद्रा यांना अपक्ष उमेदवार म्हणून बाहेरून पाठिंबा दिल्याची चर्चा होती. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आर. के. आनंद हे काँग्रेस आणि ‘आयएनएलडी’चे उमेदवार होते. निवडणुकीत संख्याबळ सुभाषचंद्रांच्या बाजूने अजिबात नव्हते. मात्र, चुकीच्या शाईचा पेन वापरल्याने काँग्रेसच्या १४ आमदारांची मते रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळे सुभाषचंद्रा यांचा विजय सुकर झाला होता. त्यावेळी पराभवातही विजय कसा वळवायचा, हे मला चांगलेच ठाऊक असल्याचे सुभाषचंद्रा यांनी म्हटले होते. या घटनेची दखल सोनिया गांधी यांनी घेऊन पक्षातील नेत्यांनी कठोर शब्दात समजही दिली होती. त्यामुळे सुभाषचंद्रा यावेळी कोणता करिष्मा करतात, याचीही चिंता काँग्रेसला आहे.
हरियाणामध्ये भाजपने कृष्णलाल पवार आणि काँग्रेसने अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, माकन यांच्यापुढे अपक्ष उमेदवार कार्तिकेश शर्मा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हरियाणात राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी ३० मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे ३१ आमदार असताना त्यांना विजयाची पूर्ण खात्री असायला हवी आहे. मात्र, ‘क्रॉसव्होटिंग’च्या भीतीने काँग्रेसला सतावण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे भाजपकडे आपल्या अधिकृत उमेवारास निवडून आणल्यानंतर दहा मते शिल्लक राहणार आहेत, अशा परिस्थितीत कार्तिकेय शर्मा यांचा दावा मजबूत मानला जात आहे. विशेष म्हणजे, कार्तिकेय यांचे वडील विनोद शर्मा हे काँग्रेसचे एकेकाळचे महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. दुसरीकडे कार्तिकेय यांचे सासरे कुलदीप शर्मा हेदेखील काँग्रेसमध्ये असले तरीही ते नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये फूट पाडण्यास कुलदीप शर्मा पुढाकार घेणार नाही, याची खात्री काँग्रेसला नाही. दुसरीकडे भूपिंदरसिंग हुड्डा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद दिल्याने नाराज असलेले कुलदीप बिश्नोईही बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजय माकन यांचा राज्यसभेचा मार्ग कठीण झाला आहे.
 
कर्नाटकातही चौथ्या जागेसाठीची लढत रंजक बनली आहे. कारण, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अतिरिक्त उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे जनता दलास (सेक्युलर) एकही जागा जिंकणे कठीण झाले आहे. भाजपच्या १२२ आमदारांसह पहिले दोन उमेदवार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेता जगेश याचा विजय निश्चित मानला जात आहे, तर तिसरे उमेदवार लहर सिंह सिरोया यांना उर्वरित ३२ मते मिळतील. मात्र, त्यांना विजयासाठी आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्याचवेळी काँग्रेसकडे ७० जागा आहेत आणि त्यांचे पहिले उमेदवार जयराम रमेश सहज जिंकतील. मात्र, दुसरे उमेदवार मन्सुर अली खान यांना विजयासाठी काँग्रेसला २० अतिरिक्त मतांची आवश्यकता असणार आहे.
 
एकूणच राज्यसभा निवडणुकीचा विचार केल्यास सध्या तरी भाजपने काँग्रेसचे पुरेपूर कोंडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच काँग्रेस हायकमांडने घेतलेल्या निर्णयांविरोधात प्रादेशिक नेत्यांनी विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रातून आशिष देशमुख यांनी राज्य सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनीही काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना नेहमीप्रमाणे गांधी घराण्याशी निष्ठा असणार्‍यांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने याद्वारे पक्षांतर्गत सुधारणांची मागणी करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, पक्षांतर्गत समीकरणे सोडविताना मुख्य समीकरणाकडे, म्हणजे निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे का, असा प्रश्न निर्माण होते. कारण, या निवडणुकीमध्ये ‘क्रॉसव्होटिंग’रोखण्यात काँग्रेसला यश न आल्यास त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागू शकते. याचा थेट परिणाम सध्याही यथातथाच असलेल्या पक्षाच्या संसदेतील कामगिरीवर होणार आहे, त्यासोबतच प्रादेशिक नेत्यांची नाराजी उफाळून आल्यास त्याचाही मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे.