आर. बी. श्रीकुमार यांची अटक आणि नंबी नारायणन

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |

श्रीकुमार हे ‘आयबी’चे उपसंचालक असताना नंबी नारायणन यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. आता ज्या अधिकार्‍याच्या इशार्‍यावरून त्यांचा छळ करण्यात आला, त्याच अधिकार्‍यास गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
 

shrikumar 
 
 
 
माजी ‘आयपीएस’ अधिकारी आर. बी. श्रीकुमार यांना गुजरात पोलिसांनी अटक झाल्याबद्दल ‘इस्रो’चे वैज्ञानिक नंबी नारायणन यांनी आनंद व्यक्त केला आहे. “खोट्यानाट्या गोष्टी रचून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न या निवृत्त पोलीस अधिकार्‍याने माझ्याबाबतही केला होता. ‘इस्रो’मधील हेरगिरी प्रकरणी आपल्याबाबत खोटेनाटे आरोप करून या अधिकार्‍याने सनसनाटी निर्माण केली होती,” असे नंबी नारायणन यांनी म्हटले आहे.
 
गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना गुजरातच्या पोलिसांनी गेल्या शनिवारी अटक केली. सर्वोच्चन्यायालयाने २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीनचीट’ देण्याचा जो निर्णय गुजरातमधील न्यायालयाने घेतला होता, तो गेल्या २४ जून रोजी कायम ठेवल्यानंतर आर. बी. श्रीकुमार यांना अटक करण्यात आली. या अटकेसंदर्भात बोलताना, “संबंधित पोलीस अधिकार्‍याने सर्व मर्यादांचे उल्लंघन केले होते. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. माझ्याबाबतही या पोलीस अधिकार्‍याने अगदी असेच केले होते. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने, तुम्ही अशी उथळ, बिनबुडाची वक्तव्ये करू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्या पोलीस अधिकार्‍यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याने मी आनंदी आहे. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. त्या पोलीस अधिकार्‍याने सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केले होते. आपल्याबद्दल अनेक खोटी वक्तव्ये त्या पोलीस अधिकार्‍याने केली होती. त्या पोलीस अधिकार्‍यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत, ते माझ्या प्रकरणाबाबत लागू आहेत, असे मला व्यक्तिश: वाटते. आता सदर निवृत्त पोलीस अधिकारी खोटेनाटे आरोप करण्याचे उद्योग सोडून देईल, अशी आशा वाटते. त्याने जे काही केले त्याबद्दल त्यास शिक्षा ही व्हायलाच हवी,” असे नंबी नारायणन यांनी म्हटले आहे. कायद्यांमधील पळवाटांचा कोणीही गैरफायदा घेता कामा नये, असेही ते बोलताना यावेळी म्हणाले. श्रीकुमार हे ‘आयबी’चे उपसंचालक असताना नंबी नारायणन यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. आता ज्या अधिकार्‍याच्या इशार्‍यावरून त्यांचा छळ करण्यात आला, त्याच अधिकार्‍यास गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
 
उत्तर प्रदेशातील पुरातन वारसा
 
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील गणेशपूर नावाच्या खेड्यात शेताची नांगरणी करीत असलेल्या एका शेतकर्‍यास जमिनीखाली तांब्याच्या शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मिळाला. या महिन्याच्या प्रारंभी ही घटना घडली. हा मिळालेला साठा अत्यंत किमती म्हणजे सोन्या-चांदीचा असल्याचे समजून सदर शेतकर्‍याने तो आपल्या घरी नेला. पण, काही स्थानिक लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पुरातत्व खात्यास या घटनेची माहिती कळविण्यात आल्यानंतर त्या खात्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो सर्व साठा आपल्या ताब्यात घेतला. जी शस्त्रास्त्रे सापडली, त्यांची संख्या ३९ असल्याचे सांगण्यात आले. ही शस्त्रास्त्रे महाभारतकालीन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील सनौली परिसरात २०१८ मध्ये पुरातत्व खात्यास ख्रिस्तपूर्व २००० ते ख्रिस्तपूर्व १८०० या काळातील वस्तू सापडल्या होत्या.
 
मैनपुरी भागातील खेड्यामध्ये ज्या वस्तू सापडल्या, त्यामध्ये विविध प्रकारच्या तलवारी सापडल्या आहेत. ही शस्त्रास्त्रे चार हजार वर्षांपूर्वीची असल्याचे पुरातत्व जाणकारांचे म्हणणे आहे. ताम्रयुगातील ती शस्त्रास्त्रे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, जी रंगीत भांडीकुंडी सापडली आहेत ती थेट या कालखंडातील असल्याचेच दिसून येते, अशी माहिती पुरातत्व खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली. पुरातत्व खात्याचे प्रवक्ते वसंत स्वर्णकर यांनी, मैनपुरी परिसरात ज्या वस्तू सापडल्या आहेत, त्या सुमारे ३८०० ते चार हजार वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असे म्हटले आहे. या संदर्भात सनौली (बागपत), मदरपूर (मोरादाबाद) आणि साकतपूर (सहारनपूर) या भागात सापडलेल्या वस्तूंच्या नमुन्यांची ‘कार्बन डेटिंग टेस्ट’ केली असता त्या वस्तू दोन हजार ते चार हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचे सिद्ध झाले, अशी माहितीही पुरातत्व खात्याच्या प्रवक्त्याने दिली. दोन मोठ्या गटामध्ये जमिनीच्या वादातून किंवा आपल्या अधिकाराच्या हक्कातून जो संघर्ष झाला, त्यामध्ये ही शस्त्रास्त्रे वापरली गेली असावीत, अशी माहिती संबंधित प्रवक्त्याकडून देण्यात आली.
 
पुरातत्व खात्याने २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातील सनौली परिसरात जे उत्खनन केले, त्यामध्ये ख्रिस्तपूर्व २००० ते ख्रिस्तपूर्व १८०० या कालखंडातील ज्या वस्तू सापडल्या, त्या महाभारत काळातील असल्याचे सांगण्यात येते. तसेच, घटनास्थळी पुरातत्व खात्यास अनेक रथ सापडले. ते महाभारतकालीन असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याच परिसरात, रथावर स्वार असलेले योद्धे जशी शिरस्राणे वापरतात तसे शिरस्राणही पुरातत्व खात्यास सापडले. त्याशिवाय संबंधित स्थानी अनेक वस्तू आढळून आल्या असून, त्या महाभारतकालीन असल्याचे सांगण्यात येते.
 
बलुचिस्तानमध्ये अत्याचार!
 
गेल्या शनिवारी जर्मनीमधील मुन्स्टर येथे ‘बलुच नॅशनल मुव्हमेंट’ या संघटनेच्यावतीनेपाकिस्तानमध्ये बलुचींवर जे अत्याचार होत आहेत, त्याकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानच्या तावडीतून बलुचिस्तान मुक्त करा, अशा आशयाचे फलक या निदर्शनात सहभागी झालेल्यांच्या हातात होते. बलुचिस्तानमधून ४० हजारांहून अधिक बलुच नागरिक बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तान आणि त्या देशाच्या लष्कराकडून जगभरात अमली पदार्थांचा प्रसार, तस्करी करण्यात मोठ्या प्रमाणात हातभार लावला जात आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा मार्ग बलुचिस्तानमधून जात असल्याने तेथील जनतेलाही अमली पदार्थांचे व्यसन जडले आहे. त्यातून अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी त्या भागातील जनतेला जडल्या आहेत. मुलेही व्यसनाधीन झाली आहेत. पण, पाकिस्तानकडून अमली पदार्थांच्या तस्करीला प्रोत्साहन दिले जात आहे, असे बलुची नेत्यांचे म्हणणे आहे. आपले वसाहतवादी धोरण बळकट करण्यासाठी पाकिस्तानकडून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. बलुचिस्तानमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील जनतेला छळास सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानी लष्कराला आव्हान देणार्‍यांना सक्तीने गायब करण्याचे तंत्र लष्कराकडून वापरले जात आहे. बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुन्वा प्रांतांमध्ये तेथील जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याच देशातील प्रांतांवर पाकिस्तानकडून कशा प्रकारे अत्याचार केले जात आहेत ते यावरून लक्षात यावे. जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी जर्मनीमध्ये जी निदर्शने झाली त्यामुळे तरी पाकिस्तानला काही सद्बुद्धी सुचते का ते पाहायचे!