‘स्टार्टअप’ देशाकडून नावीन्यपूर्ण देशाकडे

    दिनांक : 27-Jun-2022
Total Views |
 
‘स्टार्टअप्स’, उद्योग, जोखीम भांडवल निधी, आणि उद्योगांसाठी मुक्त तसेच सुलभ वातावरण अशा प्रकारच्या विविध सरकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मला खात्री आहे की, येत्या काही वर्षांमध्ये आताच्या ‘स्टार्टअप्स’चे रूपांतर दर्जेदार उद्योगांमध्ये मोठ्या संख्येने होईल. त्यामुळे वैद्यकीय, आरोग्य सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये चांगले बदल घडून येतील आणि जगभरातील नागरिकांना अधिकाधिक परवडणार्‍या दरात आणि जास्त सुलभतेने आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. 
 
 
startup
आपल्या सरकारने ‘स्टार्टअप’संस्कृतीला ज्या भक्कम पद्धतीने प्रोत्साहन दिले आहे, प्रत्येक धोरणात्मक आणि प्रशासकीय योजनेत नावीन्यपूर्ण घटकांचा मोठ्या खुबीने अंतर्भाव केला आहे, ही बाब मला अतिशय प्रेरणादायी वाटते.
 
लस उत्पादनाचा स्वयंपूर्ण उद्योग उभारण्याचे स्वप्न घेऊन 1996 साली जेव्हा मी भारतात परत आलो होतो, तेव्हा देशात या संस्कृतीचा अभाव होता, रस्त्यात अनेक अडथळे होते आणि आम्ही एक ‘स्टार्टअप’ होतो. नुकताच एक बदल माझ्या लक्षात आला आहे, तो म्हणजे नवीन भारतासाठी नीती आयोगाचे सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण, ज्यात समावेशकतेबाबतचा अनोखा दृष्टिकोन आहे. धोरण वातावरणात संपूर्णपणे बदल झाला असून, खासगी गुंतवणूकदार आणि इतर संबंधित घटकांना प्रोत्साहन दिले जात आहे, त्यांना त्यांची उद्दिष्टे गाठण्यासाठी साहाय्य केले जात आहे आणि 2030 सालापर्यंत भारताला पाच अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काम होत आहे. वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतांचा विकास करण्याबरोबरच ‘सीएसआयआर’ प्रयोगशाळा, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटीज), ‘भारतीय सांख्यिकी संस्था’ (आयएसआय), अनेक विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्था, ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेकदा पहिलीवहिली प्रगती साधून देशासाठी पाया रचला, अशा संस्थांच्या भूमिका नव्याने स्थापित करण्याची दूरदृष्टी आपल्या देशाने दाखवली आहे.
 
‘युनिकॉर्न’ भारत
 
भारताने गेल्या आठ वर्षांमध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त ‘युनिकॉर्न’ची निर्मिती केली आहे आणि ‘स्टार्टअप’उभारणी क्षेत्रात जगात अमेरिकेखालोखाल दुसरा क्रमांक पटकावला आहे. २०२१ मध्ये आपले १०० पैकी ४४ ‘युनिकॉर्न’ बनल्याचे तसेच आणखी १४ ‘युनिकॉर्न’ यंदा वर्षभरात जलद क्रमाने बनल्याचे देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केले, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद होता आणि पहिल्या पिढीतील ‘स्टार्टअप’उद्योजक या नात्याने माझ्यासाठी तर यामुळे देशाची ताकद जागतिक महामारीच्या काळातदेखील भक्कम आणि शाश्वत राहिल्याचे स्पष्ट झाले. कारण, ‘स्टार्टअप’ उद्योगांनी देशाला वैभव आणि मूल्य मिळवून दिले. पुढच्या पिढीतील उद्योजकांना भारत प्रेरणादायी होऊ शकतो हे औद्योगिक परिसंस्थेतील या अलौकिक प्रगतीने दाखवून दिले आहे. अशा परिसंस्थांची धोरणात्मक अंमलबजावणी दरवर्षी करून सरकारने त्यांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. भारतीय ‘स्टार्टअप’ आणि इतर उद्योगांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक राहता यावे, यासाठी मूलभूत संकल्पना राबवून महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासपूर्ण व तरुण भारताला स्वप्नांची भरारी घ्यायला आधार दिला आहे. कर सवलती देणार्‍या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमाची तसेच निधींचा निधी उभारणार्‍या ‘इन्व्हेस्ट इंडिया’ कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि ‘स्टार्टअप’ची प्रगती आणि भरभराट करणारे नीती आयोगाचे अटल नावीन्य मिशन यांच्यामुळे ‘स्टार्टअप ’उद्योगांचा भाग्योदय झाला आहे. ‘अटल नावीन्य मिशन’ ही प्रमुख योजना नावीन्य संस्कृती आणि उद्योजकतेची उभारणी करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी आणि विशेषतः महिला उद्योजिकांना विशेष प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अनुकरणीय आहे.
 
जगाची फार्मसी
 
जागतिक औषध सुरक्षेत भारताचा वाढता सहभाग असून, जगाची फार्मसी म्हणून भारताचे बळकट स्थान आहे. स्वस्त दरातील गुणवत्तापूर्ण मनुष्य बळ आणि योग्यरीत्या स्थापित उत्पादन पाया असल्याने हे शक्य झाले आहे. जगभरातील दुर्बल लोकसंख्येला अतिशय गरज असताना परवडण्याजोग्या दरात जीवरक्षक लसी आणि औषधे पुरवून आपला देश पायाभूत नावीन्याचे अव्वल उगमस्थान बनला आहे. ‘स्टार्टअप’ म्हणून प्रवास सुरू केलेल्या ‘भारत बायोटेक’ने आज जागतिक संकटात सुयोग्य उपाय उपलब्ध करून देऊन ‘स्टार्टअप’ची वाढ कशी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.
 
आरोग्य क्षेत्रातील कळीची आव्हाने झेलण्याच्या दृष्टीने निव्वळ अगणित जीव वाचवण्याचे कामच ‘भारत बायोटेक’ने केले नाही, तर स्वतःच्या प्रयत्नांनी भारतातील स्वदेशी बनावटीची लस तयार करण्याची क्षमताही सिद्ध केली आहे. कोविड-१९ विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी उपाय शोधण्याच्या जागतिक स्पर्धेत क्लोन ते लस असा प्रवास करत भारताने सर्व प्रकारच्या क्लीनिकल चाचण्या करून अमेरिका आणि ब्रिटनखालोखाल जगात तिसरे स्थान मिळवले. जगातील पहिली विषमज्वर संलग्न लस, रोटावायरस विरोधातील लसी, तसेच झिका विषाणू, चिकनगुनिया विषाणू, आफ्रिकेतील मोठे आरोग्य आव्हान असलेला विना विषमज्वर साल्मोनेला अशा निर्माणाधीन लसींमधील नावीन्यता ही सर्व उदाहरणे भारत हा जागतिक संकटामध्ये नवनवीन उपाय शोधण्यात अग्रेसर असल्याचे दर्शवितात. महत्त्वपूर्ण मूलभूत साहित्य (केएसएम)/ड्रग इंटरमीजिएट्स (डीआय) आणि औषधनिर्मिती प्रक्रियेतील सक्रिय घटक यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी भारतात राबविली गेलेली उत्पादनाआधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) अतिशय महत्त्वपूर्ण होती. एक उद्योजक आणि वैज्ञानिक असलेल्या मला ‘भारत बायोटेक’च्या उत्पादन ठिकाणाला आपल्या पंतप्रधानांनी दिलेली भेट हा निर्णायक क्षण वाटला. भारत सरकारचा देशाप्रति आणि जगाप्रति असलेला विश्वास आणि कटिबद्धता यामुळे अधिक दृढ झालीच, पण अतिविशिष्ट आव्हानांचा सामना करण्याची आम्हा वैज्ञानिक आणि कर्मचार्‍यांची कटिबद्धताही दृढ झाली.
 
आपल्या देशातील कंपन्यांनी उत्पादित केलेल्या लसींमुळे देशातील 97 टक्के नागरिकांचे ‘कोविड-19’ विरोधी लसीकरण पूर्ण होऊ शकले, ही अभिमानास्पद बाब आहे. जागतिक महामारीच्या काळात आपल्या सरकारने केलेल्या सहकार्याशिवाय हे होऊ शकले नसते. त्यासाठी केलेल्या धोरण बदलांची मालिका, जलद मंजुरीप्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रंदिवस काम करणारे सरकारी अधिकारी यामुळे चित्र सुखदपणे पालटून गेले आणि माझ्यासारख्या कोणत्याही उद्योजकासाठी हे स्वागतार्हच होते.
 
डिजिटायझेशन आणिसमावेशकता - पथदर्शिता
 
‘युपीआय’ या ‘डिजिटल’ पेमेंट प्रणालीचा वापर सुरू करून डिजिटायझेशन आणि ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेला दिलेली चालना हा भारताच्या शीघ्र वाढीचा महत्त्वाचा पैलू आहे. ‘युपीआय’ ही गेल्या काही वर्षांमध्ये जगात अतिशय परिणामकारक ठरलेली फिनटेक प्रणाली निःसंशयपणे आहे. यामुळे ई-कॉमर्सला चालना मिळाली असून, एकल उद्योजक, छोटे आणि मध्यम उद्योग यांना अर्थव्यवस्थेच्या वाढीत सहभागी होता आले आहे. ग्रामीण भागातील इंटरनेटचा विस्तार हा नवीन भारताचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘कोविन’ अ‍ॅपशी 100कोटींहून अधिक नागरिक जोडले गेले आणि त्यांचा तपशील उपलब्ध झाला, हे कदाचित देशाची 85 टक्के लोकसंख्या ‘डिजिटल’ झाल्याचे जगातील सर्वात उल्लेखनीय उदाहरण ठरू शकेल. यामुळे देशाच्या साथरोगकालीन सुसज्जतेला हातभार लागला आहे. अशा पद्धतीचे उपयोजन आणि तपशीलवार आकडेवारी जगात इतर कोणत्याही ठिकाणी लागू केल्याचे ऐकिवात नाही. वैशिष्ट्यपूर्ण शास्त्रीय आकडेवारी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावरच संशोधन प्रगती होऊ शकते आणि भविष्यातील आरोग्य आव्हानांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना बनवता येते. ‘कोविन’ आकडेवारीचा वापर करून आपले सरकार भविष्यातील साथरोगांचा सामना करू शकेल किंवा एखाद्या ठिकाणी उद्भवलेल्या संसर्गावर लक्ष ठेवू शकेल. साथरोगविषयक तपशील वापरून सांसर्गिक आजारांचा शोध, तपास आणि उपाय या उपयोजनामुळे सुकर झाले आहे.
 
सार्वजनिक - खासगी भागीदारी
 
एखाद्या देशाच्या वाढीसाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अतिशय महत्त्वाची भूमिका वठवते. हे प्रारूप भविष्यात इतर अनेक क्षेत्रांत, मुख्यत्वे विज्ञान, संरक्षण, औषध आणि संशोधन यात प्रभावी ठरू शकते. ही भागीदारी कशी परिणामकारक ठरू शकते ते रोटावॅक, टायफॉईड आणि कोवॅक्सिनच्या यशाने उत्कृष्टपणे दाखवून दिले आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीमधील भारताची प्रगती ही एक यशोगाथाच आहे. आपल्या लसविकास क्षमतेचा वापर करून भारताने जगाला रोटावायरस लस, विषमज्वर संलग्न लस आणि जागतिक दर्जाची, रास्त दराची ‘कोवॅक्सिन’ ही ‘कोविड-19’ विरोधी लस यांचा पुरवठा केला आहे. आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये नावीन्य आणि उद्योजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी नावीन्य एकांश आणि मुख्य नावीन्य अधिकार्‍याची नेमणूक हा सरकारचा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम मानावा लागेल. आज शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांकडे स्वतःची वैचारिक मंथन केंद्रे असून, सरकारी किंवा औद्योगिक संस्थांसोबत भागीदारी करण्याची मुभा आहे. महामारीच्या काळात विकसित करण्यात आलेली ‘कोवॅक्सिन’ या भारत बायोटेक आणि ‘आयसीएमआर’ - ‘एनआयव्ही’ यांच्यातील भागीदारीच्या फलश्रुतीने काय साध्य होते, ते दाखवून दिले आहे. शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमधील सहकार्य आणखी दृढ होण्याची गरज असून, भारतीय विद्यापीठांनी अधिकाधिक ‘स्टार्टअप्स’ची उभारणी व्हावी, तसेच ‘व्हेंचर कॅपिटल’ संस्थांनी अतिजोखमीच्या वैज्ञानिक उद्योगांमध्ये सहभागी होण्यासाठी विश्वासपूर्ण वातावरण व्हावे, यादृष्टीने काम करण्याची गरज आहे. याशिवाय वैज्ञानिक प्रगती आणि लस विकासासाठी दिले जाणारे डइखठअ-इखठअउ अनुदान तसेच नीती आयोगाचे साहाय्य यामुळे या क्षेत्रात उद्योजकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल. या उपक्रमामुळे भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये वैचारिक मंथन होऊन तरुण भारतातील नावीन्याचा शोध घेण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन कार्यक्रम व धोरणांची आखणी झाली.
 
भारतातील एकता एखाद्या देशाचे नागरिक आणि नेते यांच्यातील एकतेची भावना हा देशाच्या प्रगतीचा मोठा प्रेरणास्रोत असतो. सर्व नागरिकांना उत्तम आरोग्यसुविधा, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, जबाबदार, पारदर्शी प्रशासन असावे, औद्योगिक वातावरणाची जोपासना व्हावी. तसेच, गरिबी आणि निरक्षरतेचे निर्मूलन होऊन एक आरोग्यदायी देश वास करण्यास मिळावा हेच कोणत्याही उत्तम देशाचे उद्दिष्ट असते. ‘स्टार्टअप्स’, उद्योग, जोखीम भांडवल निधी, आणि उद्योगांसाठी मुक्त तसेच सुलभ वातावरण अशा प्रकारच्या विविध सरकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आरोग्य सुविधा क्षेत्रात अनेक नवनवीन उत्पादने आणि सेवा विविध ‘स्टार्टअप्स’मार्फत उपलब्ध झाल्याने भारताने लक्षणीय यश पाहिले आहे. आरोग्य सुविधा उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील अधिकाधिक लोकसंख्येला सेवा पुरविण्यासाठी हे सर्व सुसज्ज आहेत. मला खात्री आहे की, येत्या काही वर्षांमध्ये आताच्या ‘स्टार्टअप्स’चे रूपांतर दर्जेदार उद्योगांमध्ये मोठ्या संख्येने होईल. त्यामुळे वैद्यकीय, आरोग्य सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये चांगले बदल घडून येतील आणि जगभरातील नागरिकांना अधिकाधिक परवडणार्‍या दरात आणि जास्त सुलभतेने आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. भारताने सार्वजनिक आरोग्य उपक्रमांमध्ये लक्षणीय पुढाकार घेतला आहे, ज्याची प्रशंसा विकसित देशांनी आणि जगभरातील नेत्यांनी केली आहे. आपण आपल्या देशाचा पाया अधिक भक्कम केला आहे. हा भारत प्रेरणादायी आहे!!
 
-डॉ. कृष्ण एला
 
(लेखक भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत)