लष्कराचा ‘अग्निपथ’: भ्रम आणि सत्य

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |

‘अग्निपथ’ योजनेला देशाच्या काही निवडक भागांतून होणारा विरोध हा सर्वस्वी निंदनीयच म्हणावा लागेल. विरोधक तसेच या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी ‘अग्निपथ’ योजनेमागील सरकारची व्यवस्थापननीती समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
 
 

army 
 
 
 
भारतीय सैन्यदलात यापुढील होणारी नव्या व युवा सैनिकांची भरती अधिकाधिक प्रशिक्षणावर आधारित व सक्षमतेच्या आधारावर करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आली. या योजनेची घोषणा होऊन त्याचा तपशील पडताळून पाहण्यापूर्वीच ‘अग्निपथ’ला व्यापक व हिंसक विरोध देशातील काही विशिष्ट क्षेत्रांतून होताना दिसतो. या जाळपोळीवर आधारित आंदोलनाच्या धुरामुळे मूळ योजना झाकोळण्याचा व अंमलबजावणीआधीच त्याला आक्रस्ताळेपणे विरोध करण्याचा योजनापूर्वक प्रयत्न केला गेला असला तरी, ‘अग्निपथ’चे महत्त्व त्यामुळे झाकोळले जाऊ शकत नाही. यानिमित्त सुरुवातीलाच हे समजून घेतले पाहिजे की, सैन्यदलाच्या तिन्ही शाखांमधील लष्करी करिअर हे धाडसी तरुणांसाठी आवडते व आव्हानपर असले तरी, संबंधित वा इच्छुक युवा-उमेदवारांना सैन्यदलात सामावून घेऊन नोकरी देणे हा उद्देश कधीच नव्हता, असे करणे शक्य ही नाही. परंपरागत स्वरुपात हे तथ्य सर्वमान्य आहे.
 
नव्या संदर्भात व आठवण स्वरुपात सांगायचे म्हणजे सुमारे एक वर्षापूर्वी राष्ट्रीय स्तरावर ‘एनसीसी’म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना दलाच्या निवडक छात्रसैनिकांना संबोधित करताना नजीकच्या काळात युवकांना राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर प्रत्यक्ष लष्करात प्रवेशासह काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे धोरणात्मक वक्तव्य केले होते, हे लक्षणीय आहे. नवी ‘अग्निपथ’ योजना या घोषणेचेच मूर्तस्वरुप म्हणता येईल.थोडक्यात सांगायचे झाल्यास राष्ट्रीय छात्र सेनेत कनिष्ठ व वरिष्ठ स्तर मिळून विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या जोडीलाच सैन्यदलाच्या तिन्ही विभागांचे त्यांच्या आवड आणि क्षमतेनुसार दोन अथवा तीन वर्षांचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते, अशा प्रकारचे छात्र सेवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लष्करी वा निमलष्करी दलात प्रवेश प्रसंगी गुणांकांसह प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय सैन्यदलात छात्र सैनिक प्रशिक्षितांना ‘थेट भरती’ या विशेष योजनेचा लाभ गेली अनेक वर्षे होत आहे. मुख्य म्हणजे, या छात्र सैनिकांना आर्थिक स्वरुपात अगदी मानधनासह काहीही लाभ न मिळता पण विद्यार्थी छात्र सेवा प्रशिक्षण व त्याद्वारा त्यांच्या इच्छेनुरुप सैन्यदलात भरती होण्यास प्रयत्नपूर्वक प्राधान्य देत असतातच.
 
हीच बाब काही प्रमाणात मात्र मोठ्या स्वरुपात औद्योगिक क्षेत्रात प्रस्थापित स्वरुपात दिसून येईल. सर्वच उद्योग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये ‘अ‍ॅपरेंटिसशिप’ कायद्यानुसार शिकाऊ उमेदवार घेणे कायद्याने बंधनकारक असून त्यानुसार तांत्रिक-गैर तांत्रिक अशा विविध क्षेत्रातील या प्रशिक्षणाच्या लाभ घेतात. विद्यार्थ्यांच्या या प्रशिक्षणाचा कालावधी सर्वसाधारणपणे एक ते तीन वर्षे असतो. त्यादरम्यान त्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून अत्यंत मर्यादित स्वरुपात म्हणजेच दोन हजार ते पाच हजार रुपये दरमहा पाठ्यवेतन सरकारी नियमांनुसार मिळते. त्यांच्या संबंधित प्रशिक्षण काळानंतर त्यांना नोकरीची शाश्वती नाही, हे त्यांना त्यांच्या निवड प्रसंगीच स्पष्ट करण्यात येते. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण, पाठ्यवेतन व प्रमाणपत्र एवढेच मिळते. उद्योग क्षेत्रातील या उमेदवारांनासुद्धा त्यांच्या प्रशिक्षणाचा फायदा मात्र निश्चितपणे होत असतो. विद्यार्थी शिकाऊ उमेदवार म्हणून ज्या आस्थापनेत प्रशिक्षार्थी म्हणून काम करतात, अशा आस्थापनांमध्ये त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणानुरुप संधी उपलब्ध असल्यास आवर्जून सामावून घेण्यात येत असते. मात्र, असे होऊ शकले नाही तरीही त्यांना त्यांच्या उमेदवारी काळातील प्रशिक्षण कौशल्यावर आधारित रोजगार निवडण्याचा पर्यायही असतो. त्यामुळे जुजबी पाठ्यवेतनासह एक ते तीन वर्षे उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेले विद्यार्थी रोजगाराच्या संदर्भात लाभार्थी होतातच.
 
बदलती युद्धनीती व पद्धती याला अनुसरुन अद्ययावत तंत्रज्ञानासह लढू शकणार्‍यांची सैन्यदलात नितांत निकड असते. याचेच प्रत्यंतर ‘अग्निपथ’ योजनेत दिसून येते. मुख्य म्हणजे यापूर्वीच्या ‘राष्ट्रीय छात्र सेना’ योजनेप्रमाणे ‘अग्निपथ’मध्ये प्रवेश होणे हे ऐच्छिक आहे. त्यातही महत्त्वाचा फरक म्हणजे वरिष्ठ गटातील छात्रसैनिकांच्या तुलनेत ‘अग्निपथ’च्या माध्यमातून अग्निवीरांना त्यांच्या अर्थार्जनाच्या जोडीलाच सैन्य प्रवेशाची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात तपशिलासह सांगायचे झाल्यास नव्या योजनेअंतर्गत ४६ हजार अग्निवीरांची चार वर्षे कालावधीसाठी निवड करण्यात येईल, चार वर्षे पूर्ण करणार्‍या प्रत्येक अग्निवीर उमेदवाराला ११ लाख रुपयांची राशी देण्यात येईल. यापैकी १२ हजार अग्निवीरांना त्यांच्या निवडीच्या आधारे सैन्यदलात निवड करण्यात येईल व बाकी ३४ हजार अग्निवीरांना त्यांचे कौशल्य व प्रशिक्षणाच्या आधारे इतरत्र योग्य नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकेल. याच निर्णयाला झालेला विरोध त्यापोटीचे आंदोलन व हिंसाचार लक्षात घेता केंद्र सरकारने काही धोरणात्मक व सहानुभूतीपूर्ण निर्णय घेतल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने उमेदवारांच्या वयोमर्यादेची अट शिथिल करण्याचा समावेश आहे. त्यामुळे अधिक मोठ्या संख्येतील उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याच्याच जोडीला ज्या अग्निवींराची निवड थेट सैन्यदलात होऊ शकणार नाही, अशांसाठी देशाच्या अर्धसैनिक दलात राखीव जागांसह संधी देण्याचा निर्णय तेवढाच महत्त्वाचा आहे, यामागे सरकारची सकारात्मक भावना समजून होणे महत्त्वाचे ठरते. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणार्‍या ‘आयएएस’वा समकक्ष प्रशासन सेवा निवड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाखत व निवड प्रक्रियेअंतर्गत मर्यादित जागांसाठी त्यांची निवड न झाल्यास अशा उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता-पात्रता यांचा उपयोग विभिन्न सहकारी उपक्रमाशिवाय कंपन्यांशी पण करावा, यासाठी प्रोत्साहनपर मुभा दिली व त्याचे सकारात्मक दिसून लागले आहेत.
 
अर्धसैनिक दलांचा तपशील पाहता, राष्ट्रीय स्तरावर असणार्‍या दहा अर्धसैनिक दल संस्थांमध्ये सध्या सुमारे दहा लाख सशस्त्र सैनिक सेवारत आहेत. यामध्ये सर्वात मोठे अर्धसैनिक दल केंद्रीय राखीव पोलीस दल असून त्यामध्ये सुमारे साडेतीन लाख सैनिक आहेत. त्याखालोखाल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दीड लाख, रेल्वे सुरक्षा दलात ७५ हजार सशस्त्र सैनिक कार्यरत आहेत. याशिवाय आसम रायफल, सीमा सुरक्षा बल, इंडो-तिबेट सुरक्षा दल यामध्ये सशस्त्र सैनिक असतात. या विविध अर्धसैनिक दलांमध्ये दरवर्षी नव्या जवान-सैनिकांची आवश्यकता असते व ही आवश्यकता उर्वरित अग्निवीरांना सशस्त्र दलात संधी नक्कीच उपलब्ध करून देईल. वरील अर्धसैनिक दलांशिवाय गृहमंत्रालयाने अग्निवीरांना वयोमर्यादेची अट शिथिल करण्याच्या जोडीलाच दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाने तटरक्षक दलाशिवाय संरक्षण मंत्रालयांतर्गत असणार्‍या प्रमुख व मोठ्या१६ उत्पादन आस्थापनांमध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय अग्निवीरांसाठी शैक्षणिक व कौशल्यपर विकासाच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या अग्निवीरांना बारावीची पात्रता पूर्ण करण्यासाठी विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे विशेष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश करता येणे व कौशल्य विकास मंत्रालयातर्फे विविध कौशल्य विकासाला चालना देणे या आणि यांसारख्या उपक्रम-पुढाकारांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. त्याच्याच जोडीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतर्फे अग्निवीरांना उद्योजक बनविण्यासाठी आर्थिक सहकार्यासह प्रोत्साहन योजनेचा नव्याने समावेश करण्यात आल्याने अग्निवीरांचे भविष्य आणि भवितव्य घडविण्याच्या विविध संधी उपलब्ध होऊ घातल्या आहेत. पण, या नव्या योजनेचा युवकांना होणारा मोठाच फायदा ठरणार असल्याने अग्निवीरांच्या संदर्भातील भ्रम निश्चितच दूर होतात.

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)