अखंड राष्ट्रासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |
आज डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याची वेळ आली असून त्यांची जीवनमूल्ये, आदर्श आणि दूरदर्शी विचार अंगीकारण्याची गरज आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांमध्ये राजकीय सहिष्णुता होती आणि राष्ट्रवादाचीही खोल भावना होती.
 

shamaprasad 
 
 
 
 
एका देशात दोन कायदे, दोन प्रधानमंत्री, दोन निशाण चालणार नाहीत’ या निश्चयाने आणि राष्ट्रीय जाणिवेने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. ’एक भारत अखंड भारत’ हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाने देशाला नवी दिशा आणि बळ मिळाले. त्यांचे आदर्श आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला सात दशकांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि कार्यक्षम नेतृत्वाचाच हा परिणाम आहे की, आज जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत एक आहे. आज देशात फक्त एकच कायदा आहे, फक्त एकच पंतप्रधान आणि एकच निशाण आहे.
 
आज डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याची वेळ आली असून त्यांची जीवनमूल्ये, आदर्श आणि दूरदर्शी विचार अंगीकारण्याची गरज आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांमध्ये राजकीय सहिष्णुता होती आणि राष्ट्रवादाचीही खोल भावना होती. एकदा काश्मीर धोरणावर ते म्हणाले होते, “काश्मीरबाबत तुमच्या धोरणाच्या विरोधात असलेल्यांबद्दल थोडी सहिष्णुता दाखवा. एकमेकांवर दगडफेक करून काही फायदा नाही. एकमेकांना जातीयवादी आणि प्रतिगामी म्हणवून काही फायदा नाही. त्यांनी समजून घ्यायला हवे की, अशा काही गोष्टी आहेत, ज्यावर त्यांचा दृष्टिकोन आणि आपण ज्याला राष्ट्रीय दृष्टिकोन मानतो, त्यात मूलभूत फरक आहे.”
 
दि. ५ ऑगस्ट, २०१९ आणि दि. २३ जून,१९५३ या तारखांचा जवळचा संबंध आहे. पंतप्रधान मोदींनी डॉ. मुखर्जी यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक यात्रेला पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केले. ‘कलम ३७०’च्या अंधारातून केवळ जम्मू-काश्मीरची सुटका झाली नाही, तर जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याची सुवर्णसंधीही मिळाली आहे. ज्या योजनांपासून आजपर्यंत आमचे बंधू-भगिनी वंचित होते, त्यांना त्याचा थेट लाभ मिळत आहे. विकासाचा प्रत्येक उपक्रम जम्मू-काश्मीरच्या शेवटच्या माणसापर्यंत जातो. डॉ. मुखर्जी यांचीही हीच दूरदृष्टी आणि संकल्पना होती. याच दूरदृष्टीने त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आज भारतीय जनता पक्ष खंबीरपणे पुढे जात आहे. असे म्हणतात की, ‘जो व्यक्ती आपल्या पूर्वजांची मूल्ये, आदर्श आणि त्यागाचे स्मरण संस्थेत किंवा समाजात ठेवतो, तो नेहमीच सर्वोच्च शिखरावर पोहोचतो.’ या परंपरेला अनुसरून भाजपने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना नेहमीच जीवंत ठेवले आणि त्यांना प्रेरणास्थान मानून पुढे कार्य सुरू ठेवले. ’व्यक्तीहून मोठा पक्ष, पक्षापेक्षा देश मोठा’ हे आदर्श जनसंघाच्या काळापासून २०१४ मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार येईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने व नेत्याने समर्पणाने अंगीकारले आहे.
 
परराष्ट्र धोरणासारख्या गंभीर विषयावर डॉ. मुखर्जींची घट्ट पकड होती. ‘महाबोधी’ संस्थेचे अध्यक्ष या नात्याने डॉ. मुखर्जी आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाची अशी अनेक कामे करत होते. पूर्वेकडीलराष्ट्रांशी भारताच्या संबंधांबद्दलचे चिंतन हे त्यांचे काळापलीकडचे विचार प्रतिबिंबित करते. त्यांचा हाच विचार अलीकडे ’लूक ईस्ट अ‍ॅक्ट ईस्ट’ सारख्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येईल. स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक मंत्री म्हणूनही त्यांचा ठसा पहिल्या औद्योगिक धोरणावर (१९४८) स्पष्टपणे दिसून येतो, ज्याचे व्यापक स्वरूप आज ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणून आपल्यासमोर आहे.
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे केवळ दूरदर्शी राजकारणीच नव्हते, तर ते एक महान विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांची वयाच्या ३३व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाच्या कुलगुरूपदीही नियुक्ती झाली होती. त्यांचा शैक्षणिक प्रवास ही एक ज्ञानगंगा आहे, ज्याची एक झलक आपल्याला ‘एनईपी’ २०२० मध्ये पाहायला मिळते. भारतीय ज्ञान परंपरा आणि भारतीय मूल्यांवर त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यांच्या मते, आपल्याला खेदाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य ज्ञान भारतीयांवर लादण्यात आले होते असे नाही, तर हे ज्ञान भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाच्या बलिदानाने आयात केले होते. याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा दोन प्रणालींमध्ये योग्य संश्लेषण आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण व्यवस्थेबाबतचे विचारही अनुकरणीय आहेत. डॉ. मुखर्जी म्हणाले की, “सामान्यत: भारतीय विद्यापीठाने स्वत:ला राष्ट्रीय पुनर्रचनेचे एक जीवंत अवयव मानले पाहिजे. जीवनातील अध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पैलू एकत्र मिसळण्याचे सर्वोत्तम साधन शोधले पाहिजे. आपल्या मातृभूमीची प्रगती आणि समृद्धी वाढवण्यासाठी आणि जात, पंथ किंवा लिंग यांचा विचार न करता सर्वोच्च परंपरा जपण्यासाठी आपल्या माजी विद्यार्थ्यांना तयार केले पाहिजे.”
 
डॉ. मुखर्जींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिक्षण हा सर्वांत प्रभावी मार्ग मानला. ते स्वातंत्र्य केवळ राजकीयच नाही, तर आर्थिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिकही आहे. त्यांच्याकडे अतिशय उल्लेखनीय अशी प्रतिभा होती, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दिसून येते. केवळ एका वर्षाच्या राजकीय प्रवासानंतर स्वा. विनायक सावरकरांनी त्यांच्यावर प्रभावित होऊन त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून नामांकित केले. ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या पायावरच सोनेरी भविष्याचा पाया घातला जाऊ शकतो’, असे डॉ. मुखर्जी नेहमी म्हणायचे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या व्हिजनची तळागाळात अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात आले आहे. आज वर्तमान सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या तत्त्वावर राष्ट्र उभारणीच्या मार्गावर आहे. एकता आणि अखंडतेच्या भावनेने डॉ. मुखर्जी यांच्या आजच्या हौतात्म्यादिवशी हे राष्ट्र त्यांना नमन करते आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्र उभारणीत आपले सर्वोच्च योगदान देण्याची प्रेरणा देते.
 
- आचार्य पवन त्रिपाठी