मुंबई मेट्रोची रखडगाडी कधी थांबणार?

    दिनांक : 22-Jun-2022
Total Views |
मुंबई मेट्रो लाईन-२ आणि ७ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असून ‘एमएमआरडीए’ने ऑक्टोबरपर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या मार्गाचे काम बाकी असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई मेट्रोची रखडगाडी समोर आली असून राज्यात वाहणारे सत्तांतराचे वारे पाहता, त्याचाही परिणाम साहजिकच मेट्रोच्या कामांवर जाणवू शकतो.
 
 
 
metro
 
 
 
मुंबईमध्ये पहिली मेट्रो सुरु व्हायलासुद्धा २०१४ साल उजाडावे लागले होते. परंतु, त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील मेट्रो मार्गांचे व्यापक नियोजन सुरु झाले आणि हे जाळे विस्तारण्याच्या कामालाही वेग आला. परंतु, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर मात्र मेट्रो रेल्वेच्या कामाची गती मंदावली. तसेच मेट्रोच्या जागा झोपडपट्ट्यांमुळे अतिक्रमित झाल्या आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याचबरोबर मेट्रोच्या कामांसाठी आर्थिक निधी पुरतो का? विद्युत पुरवठा पुरेसा आहे का? योग्य कंत्राटदार मिळतो का? अशी अनेक कारणेही आहेत. परंतु, मेट्रोची कामे करवून घेणार्‍या ‘दिल्ली कॉर्पोरेशन’सारख्या संस्था कमी आहेत. तेव्हा, आपण मुंबईतील मेट्रो मार्गाच्या प्रगतीची काही माहिती व अडचणी नेमक्या काय आहेत, ते थोडक्यात बघूया.
 
मेट्रो मार्ग ४, ४ अ
 
फ्रेंच कंपनी ‘अल्स्टॉर्म’ यांनी मेट्रो ४, ४ अ चे डबे तयार करण्याचे आंध्र प्रदेशमध्ये होत असलेले उत्पादन काम थांबविले आहे. त्यामुळे मेट्रो ४ चे वडाळा-ठाणे-कासारवडवली व मेट्रो ४अ चे कासारवडवली-गायमुख कामांवर संक्रांत आली आहे. या ‘अल्स्टॉर्म’ कंपनीला डबे बनविण्याचे १,१९८ कोटींचे कंत्राट मार्च २०२१ मध्ये देण्यात आले होते. पण, आता ‘एमएमआरडीए’कडून दुसरे कंत्राट तयार केले जाईल. यामुळे कामाला थोडा विलंब होणार आहे. मेट्रो-४ ही मार्गिका ३२.३२ किमी लांबीची आहे व त्यासाठी १४ हजार, ५४९ कोटी खर्च येणार आहे. एकूण पाच पॅकेजमध्ये हे काम सुरू आहे. २०२०च्या नियोजनानुसार हे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ‘लॉकडाऊन’व इतर कारणांमुळे हे काम संथगतीने सुरु होते व त्यानंतर कंत्राटदारांनी हे काम थांबविल्याने उपकंत्राटदाराकडे हे काम नेमून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सद्यःस्थितीत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे काम पुरे होण्यास आणखी दोन वर्षे तरी लागणार आहेत.
 
मेट्रो मार्ग २ अ, ७, ७ अ, ९- डीएननगर ते दहिसर पूर्व मार्गिका २ अ मार्गिकेची १८.६ किमी लांबी व अंधेरी ते दहिसर पूर्व मार्गिका ७ ची, १६.५ किमी लांब, दोन्हीं मेट्रो मार्गिकांचे प्रथम टप्पे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर सुरु झाले. वाहतूककोंडीटाळण्याकरिता चार उड्डाणपूल बांधण्याचे निश्चित झाले आहे. या मार्गावरुन नऊ लाख प्रवासी अपेक्षित आहेत. दुकाने व इतर व्यवसायाकरिता सुमारे ११ लाख नवीन नोकरीची कामे सुरू होतील. या मार्गिकांवर शोभेची कामे ११.८१ कोटी रुपये खर्चून होणार आहेत. मेट्रो मार्गिका ७ वर १४ पादचारी पूल बांधले जाणार आहेत. मेट्रो मार्ग ९ दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर ही मेट्रोमार्गिका ७च्या विस्तार मार्गावर आहे. कारशेडकरिता राई मूर्धेकडे स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. मेट्रो मार्गिका ७ अ अंधेरी पूर्व ते विमानतळ या मार्गातील १८०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनीचे काम अडचण ठरू नये, म्हणून हे काम वेगळेच करण्यात येणार आहे. मार्गिका ७ ला रेल्वेचे राममंदिर स्थानक जोडले जाणार आहे. २ अ मार्गिकेवरील रोप-वे प्रकल्पाचे काम रखडले आहे. या २ अ व ७ मार्गिका सुरू झाल्यावर तिसर्‍या दिवशी बिघाडाचा थांबा आला. सव्वा तास प्रवाशांचा खोळंबा झाला. मेट्रो-७च्या नव्या स्थानकाबाहेर सायकलसेवा सुरू झाली आहे. २ अ व ७ मार्गिकांचा दुसरा टप्पा नव्या वर्षात पूर्ण होईल.
 
मेट्रो २ ब ही मार्गिका डीएन नगर ते मंडाले २३.६ किमी लांबीची आहे. मंडाले येथे तिची कारशेड असणार आहे. हिचे काम २०२४ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जुना कंत्राटदार बदलून दोन वर्षांच्या रखडपट्टीनंतर नवा कंत्राटदार नेमण्यात आला आहे.
 
मेट्रो मार्ग ३
 
प्रकल्पाचे एकूण काम ७२ टक्के, भुयारीकरण ९७ टक्के, स्थानकांची कामे ७९ टक्के, स्थापत्य कामे ८२ टक्के, अनेक प्रणालींची कामे ३४ टक्के, रुळांची कामे २२ टक्के झाली आहेत. या मार्गिकेचा विस्तार नेव्हीनगरपर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री या मार्गिकेच्या कारशेडकरिता अजून अंतिम निर्णयाप्रत आलेले नाहीत. गोरेगाव पहाडी वा अन्य जागा विचाराधीन आहेत. परंतु, या कारशेडच्या अनिश्चितीमुळे चाचणीसकट अनेक कामे रखडली आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल हे या मार्गिकेचे सर्वांत लांब स्थानक उभारले गेले आहे. या मार्गिकेचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्याकरिता चाचणी व मरोशी येथील तात्पुरती कारशेडचे कामही रखडले आहे. सरकत्या जिन्यांची कामे सुरू आहेत.
 
मेट्रो मार्ग ५
 
मेट्रो 5च्या ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावरील प्रकल्पाला भिवंडीतील धामणकर नाका ते टेमघर दरम्यान तीन किमीवरील १ हजार, ५९७ बांधकामांकरिता अडथळा निर्माण झाला आहे. हा उन्नत मार्ग आता भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेट्रोच्या खर्चात १ हजार, ४२७ कोटी रुपयांची त्यामुळे वाढ झाली आहे. प्रकल्पाची कारशेड कशेळीत होणार आहे. ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी नियोजित वर्तुळाकार प्रकल्पाऐवजी लाईट मेट्रोला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ५ हजार, ९३० कोटींची बचत होणार आहे. कल्याणमध्ये मेट्रोचे काम सप्टेंबरपासून चालू होईल.
 
मेट्रो मार्ग ६
 
स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजुरमार्ग या मेट्रोच्या कामात जेव्हीएलआर सिग्नलजवळ गर्डर बसविताना क्रेन कोसळून अपघात घडला. क्रेन चालकाला मृत्यू आला. या अपघातामुळे कामाला विलंब होत आहे.
 
मेट्रो मार्ग १०, १२
 
मार्गिका १० गायमुख ते शिवाजी चौक (मीरारोड) ९.२ किमी लांबीची आहे. त्यावर ३ हजार, ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. मार्गिका १२ कल्याण ते तळोजा २०.७५ किमी लांबीची आहे व ४ हजार, १३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही १०, १२ मार्गिकांचे काम या वर्षी विलंबाने सुरुवात करत आहे.
 
मोनो रेल
 
मोनो रेल्वे मार्गिकेचे दुसर्‍या टप्प्यातील चेंबूर ते जेकब सर्कल काम तोट्यातून बाहेर काढण्याकरिता ३२ लाख देऊन सल्लागार नेमावा लागला आहे. ७०० मी. विस्तारीकरण महालक्ष्मीपर्यंत होणार आहे. जाहिराती, दुकानासाठी जागा, कार्यक्रमासाठी जागा देणे इत्यादी कामे करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर दहा मोनो गाड्या बांधण्याचा मार्ग खुला झाला आहे. मोनो स्थानके दोन मेगावॅट सौरऊर्जेने उजळण्यासाठी १६ स्थानकांच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यात सुमारे ७ कोटी, ८६ लाख खर्च येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन यंत्रणा उभारून सल्लागाराकडून ३० मिनिटात प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
 
मेट्रो मार्ग १
 
ही मार्गिका गेले आठ वर्षे २०१४ पासून सेवेत आहे. पालिकेने मेट्रोच्या ११ मार्गिकांच्या मालमत्तावर टाच आणण्याचे वॉरंट काढले आहे. मार्गिका-१ चाही यात आहे. पण, या रेल्वेसारख्या सेवा असल्याने मालमत्ता कर व पालिकेचे इतर कर बंधनकारक नाहीत. मार्गिका-१ वर कोरोना काळानंतर प्रवासीसंख्या दिवसाला ५.२ लाख इतकी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. स्थानके व डेपोवर बसविलेल्या सौरसंचांमधून या मार्गिकेला चार लाख युनिट वीज मिळत आहे. दरवर्षी दोन कोटी रुपयांची बचत होत आहे. या मार्गिकेवर व्हॉटसअ‍ॅप तिकीटांची व्यवस्था झाली आहे.
 
मेट्रोसेवेकरिता इतर व्यवस्था
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो २ अ व ७ मार्गिकांचा पहिला टप्पा दाखल झाला. मेट्रो स्थानकापासून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी बस स्टँड, सायकल स्टँड, खासगी वाहनांसाठी रस्त्यावर जागा निश्चित केल्या जात आहेत. १८ स्थानकांकरिता प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एकूण 60 प्रस्ताव तयार झाले आहेत.
 
अंधेरी ते वर्सोवापर्यंत शोभीवंत झाडांची लागवड केली जात आहे. वाहतूककोंडी कमी होण्याकरिता नरिमन पॉईंट ते कफ परेड १.६ किमीच्या नवीन सेवेकरिता उन्नत मार्ग हाती घेतला आहे. अर्थसंकल्पात २०० कोटी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी अर्थसंकल्पात ६ हजार, २५० कोटींची तरतूद झाली आहे.
 
मेट्रोच्या ६५० कर्मचार्‍यांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेवरील पक्षांचे अपघात रोखण्याकरिता ‘ओव्हररेड वायर’वर ‘पीव्हीसी’ नेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो डबे निर्मितीसाठी लातूरला सज्जता होत आहे. वर्षाला २५० डबे बनविण्याची क्षमता ठेवली जाणार आहे, अशा तर्‍हेने मुंबईत दोन ते तीन वर्षांमध्ये सर्व मेट्रो मार्गिका सुरू होतील.