बंडखोर आमदारांना 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश; अन्यथा होणार कारवाई !

    दिनांक : 22-Jun-2022
Total Views |
मुंबईः महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आले असतांना सरकार बरखास्तीचं संकट गळ्याशी आलं आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना अखेरचं अल्टिमेटम दिलं आहे.
 
 

letter
 
 
 
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्व आमदारांना एक पत्र पाठवलं आहे. संध्याकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. हा पक्षाचा आदेश असून तो न पाळल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा या पात्रातून दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले, सर्व शिवसेना आमदारांना आता वर्षा बंगल्यावरील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी हजर रहावं लागणार आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, यावरच महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
 
पत्रातील मोठे तीन मुद्दे-
 
शिवसेना आमदारांना मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पाठवलेले पत्र नुकतेच पोहोचले आहेत. त्यापैकीच आमदार शंभुराजे देसाई यांना पाठवलेले पत्र माध्ममांच्या हाती लागलं आहे. त्यातील प्रमुख तीन मुद्दे पुढील प्रमाणे-
 
 
१. तातडीची बैठक
 
पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी 5 वाजता वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहणे सर्वच आमदारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
 
२.  उपस्थिती अनिवार्य
 
या बैठकीला लिकित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहता येणार नाही. ही सूतना आमदारांना ईमेल तसेच व्हॉट्स अप तसेच समाजमाध्यमांद्वारेही पाठवण्यात आलेली आहे.
 
३. उपस्थित न राहणाऱ्या आमदारांवर तातडीनं पक्षातर्फे कारवाई
 
दरम्यान सदर बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांना तातडीनं पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. सदर बैठकाला आमदार उपस्थित नसतील तर स्वेच्छेने शिवसेना सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असा अर्थ घेऊन संविधानातील सदस्य अपात्रते संदर्भात तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे प्रमुख प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिला आहे.