राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा

    दिनांक : 22-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली : एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली.
 
 
 


Draupadi Murmu
 
 
 
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार जाहीर केला आहे. टीएमसीचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे. तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
 
एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे २० नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीनंतर झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असल्याची घोषणा जे पी नड्डा यांनी केली. मंगळवारी (ता. २१) पक्षाच्या मुख्यालयात भाजपची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेल्या संसदीय मंडळाची बैठक झाली.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे झाले नाही.