एकनाथ शिंदेंच्या 'ट्विट'मध्ये हिंदुत्वाचा उल्लेख! वाटचाल स्पष्ट?

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |
मुंबई : "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.", असे ट्विट राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
 
Eknath Shinde Tweet 
नॉट रीचेबल असणाऱ्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक ट्विट, सोशलमीडिया खात्यावरून शिवसेनेचे नाव हटविले आहे. सहाजिकच त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या हिंदूत्व विरोधी विचारांच्या पक्षांशी युती केल्याच्या कारणास्तव आपण नाराज असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
 
विधानपरिषदेच्या निवडणुकीतील सेनेला मिळालेल्या विजयानंतरही शिंदेनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले. काल पहाटेपासून गायब असलेले एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे हॉटेल ली-मेरिडिअन मध्ये मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. तसेच माविआ सरकारला त्यांचा विरोध असल्याचेही बोलले जाते.
 
राज्यसभेच्या पाठोपाठ विधानपरिषदेत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे. या निवडणुकीत शिवसेनासह मित्रपक्षांची तब्बल १२ मते फुटली. शिवसेनेकडे स्वपकीय ५५ आमदारांचे बलाबल असूनही सचिन अहिर व आमशा पाडवी यांना प्रत्येकी २६ मते म्हणजेच एकूण ५२ मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेची ३ मते फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. एकनाथ शिंदे गायब असल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना खासदारांची बैठक बोलावली असून शिवसेना आमदारांना व नेत्यांना माध्यमांशी संवाद न साधण्याचे आदेश दिला आहे. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात कि आणखी काही निर्णय घेतात, हे महत्वाचे ठरणार आहे.