मानवतेसाठी योग...

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |

आज २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. ‘युञ्जते इति योग:’ या विशेष लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात मानवाच्या शारीरिक, आध्यात्मिक विकासासासाठी ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेचा केलेला हा सर्वांगीण उहापोह... 
 
 
yog1
 
 
योगेन चित्तस्य पदेन वाचां
मलं शरीरस्य च वैद्यकेन।
यो पाक्करोत्त प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलीरानतोस्मि॥
 
योगशास्त्राच्या साहाय्याने चित्ताचे, व्याकरणाच्या साहाय्याने वाणीचे आणि वैद्यकाच्या मदतीने शरीराचे मल दूर करण्याचा उपदेश देणार्‍या मुनिवर्य पतंजलींना मी दोन्ही हात जोडून नमस्कार करते.
 
योगशास्त्राला सूत्रबद्ध करून ग्रंथरूप देणार्‍या पतंजली मुनींचे स्मरण करणार्‍या या श्लोकातच योगशास्त्राचे उद्दिष्ट आणि फल स्पष्ट दिसते. चित्ताचे मल दूर करून, चित्त निर्मल करून, चित्त शुद्ध करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं हे योगशास्त्राचं साध्य आहे.
 
संत-महंत म्हणतात की, नरदेह हा अतिदुर्मीळ आहे. तो एकदा प्राप्त झाला की, नराचा नारायण करून घेणं हेच त्याचं सार्थक आहे. दुर्दैवानं कलियुगात मनुष्य प्रगत झाला असं म्हणताना, आपल्याला अजून मानवतेसाठीच प्रयत्न करावे लागत आहेत.
 
मानवता हा मानवाचा विशिष्ट गुणधर्म आहे. म्हणजे नक्की काय? दोन पाय, दोन हात अशी देहाची एक विशिष्ट ठेवण म्हणजे मानवता आहे का? तर नाही. कारण, ती ठेवण तर आता जगातील समस्त मानवदेहधारी जीवांकडे आहे. परंतु,कित्येकांची वर्तणूक मात्र मानव असल्यासारखी नाही. नरदेहाकडून ही जी अपेक्षित विशिष्ट वर्तणूक आहे तीच मानवता होय.
 
आहारनिद्राभयमैथुनं च
सामान्यमेतद् पशुभि: नराणां।
धर्मो ही तेषां अधिको विशेष:
धर्मेण हीना: पशुभि: समाना:॥
 
आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे प्राणी आणि मनुष्य यांच्यात समान आहे. धर्म हाच मानवाकडे असलेला विशेष आहे. जे नरदेहधारी जीव धर्मविहीन असतात, ते पशु समानच होत.
 
मनुष्याकडे अन्य सर्व जीवांपेक्षा वेगळी असलेली गोष्ट म्हणजेच त्याचा विशिष्ट गुणधर्म/धर्म. यालाच मानवता असं आपण आजच्या भाषेत म्हणतो.
 
धर्म म्हणजे काय? धारयति इति धर्म:। जो समस्त प्राणीमात्रांचं/जीवांचं/सृष्टीचं धारण करतो, म्हणजे त्यांची स्थिती टिकवून ठेवण्यास मदत करतो तो धर्म होय.
 
धार्यते इति धर्म:। सृष्टीच्या स्थितीसाठी जो धारण करण्यास, अवलंबन करण्यास, अंगीकारण्यास योग्य असतो तो धर्म होय.
 
सोप्या भाषेत सांगायचं, तर धर्म म्हणजे कल्याणकारी आचरण. सर्व प्राणीमात्रांचं/चराचराचं हित होईल असंच आचरण यात अपेक्षित आहे. विवेकबुद्धीने निर्णय घेऊन असं वर्तन करणं केवळ मनुष्यालाच शक्य आहे. म्हणूनच याला ‘मनुष्यधर्म’ किंवा ‘मानवता’ असं म्हणतात. पृथ्वीवर मनुष्य निर्माण झाल्यापासून हा धर्म मनुष्याला चिकटलेला असल्यानं तो सनातन आहे. सनातन म्हणजे प्राचीन असून, रोज नवीन असणारा असा हा मानवता धर्म आहे.
 
मनुष्याला बुद्धी जरी असली तरी तिला संस्कारांची अपेक्षा आहे. बालवयात इतर प्राण्यांच्या मानानं मनुष्याचं संगोपन अधिक काल करावं लागतं. पुढेदेखीलज्ञानप्राप्तीसाठी त्याला गुरूची आवश्यकता असते. हे जाणून, नरदेहातील जीवांना, त्यांच्यामधील सुप्त मानवता जागृत करण्याचं ज्ञान ब्रह्मदेवानं वेदांच्या रुपात, म्हणतात सृष्टी निर्मिती केली तेव्हाच रचून ठेवलं. याच एका स्रोतातून पुढे अनेक दर्शनांची उत्पत्ती झाली. योगशास्त्र हे त्यातलंच एक दर्शन. वेदातील ब्रह्मविद्या उपनिषदात आणखी सोपी करून सांगितली. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत त्याच ब्रह्मविद्येचा उपदेश केला. गीता ही स्मृती असून ती निवृत्तीमार्गाचा उपदेश करणारी आहे. ते योगशास्त्र आहे, असा व्यासांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उल्लेख केला आहे. थोडक्यात, स्वतःच्या आणि समस्त जीवांच्या कल्याणासाठी मनुष्याची वर्तणूक कशी असावी, याचा उपदेश वेदांनी केला आहे. तीच परंपरा पुढे उपनिषद, योगदर्शन, गीता, ज्ञानेश्वरी अशा रीतीने सुगम करत आपल्यापर्यंत पोहोचते. हा वैदिक, सनातन धर्म म्हणजेच मानवता होत.
 
महाराष्ट्र ही संतांची मांदियाळी असणारी भूमी आहे. त्यामुळे हा धर्म संतांनी आपल्याला अधिक उलगडून, सोप्या भाषेत, कमी शब्दांत सांगायचा वारंवार प्रयत्न केला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक! सगळा सनातन मानव धर्म या 205 श्लोकांमध्ये उत्तमरित्या समाविष्ट केला आहे. ते समजून तेवढं आचरण जरी प्रत्येक मनुष्यानं केलं तरी नराचा नारायण झाल्याशिवाय राहणार नाही.
योग आणि मानवता
 
कलियुगात सद्यःस्थिती अशी आहे की, मनुष्यदेहधारी जीवांवर मानवतेचे संस्कार फार क्वचित होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंनी सर्वत्र अक्षरशः थैमान घातलं आहे. स्वार्थीपणा पराकोटीचा बोकाळला आहे. स्वतःचं अस्तित्व टिकून असलं, तरी आत्यंतिक लोभापायी इतर जीवांच्या अस्तित्वावर घाला घालण्यास मनुष्य मागेपुढे बघत नाही. अशा अनावश्यक, आपत्ती नसताना केलेल्या अधार्मिक हिंसेने पृथ्वीवरील कित्येक जीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. प्रत्येक देशातील प्राणी, पक्षी, अन्य पशु, वृक्ष, वेली यांच्या जमाती नष्ट होत आहेत. (केवळ भारतीय गोवंशाचा विचार केला तरी ५० टक्के जमाती नष्ट झाल्या आहेत असं अभ्यासक सांगतात.) त्यामुळे पृथ्वीचे संतुलनदेखील बिघडले आहे. ‘पृथ्वी विनाशाच्या मार्गावर आहे’ असं शास्त्रज्ञच सांगू लागलेत. अगदी ५० वर्षांपूर्वी देखील इतकी भीषण अवस्था नव्हती. मनुष्याच्या धर्महीन वर्तणुकीचा हा प्रताप आहे.
 
आयुर्वेदातील चरक संहितेतदेखील ‘रोगहेतू’ म्हणून अधर्माचरणाचा उल्लेख येतो. विशेषतः नुकत्याच होऊन गेलेल्या ‘कोविड’सारख्या, जनपदांचा विध्वंस करणार्‍या आजारांचं ‘अधर्माचरण’ हेच महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. (कोण्या एका देशात, मनुष्य हिताचा विचार न करता केलेल्या प्रयोगांमुळे, म्हणजेच अधर्मामुळे तो व्याधी पसरला हे सत्य आपण बघत आहोतच.)
 
तात्पर्य काय तर एक मनुष्य अधर्मानं, माणुसकी सोडून वागू लागला की, सृष्टी धारणा धोक्यात येते, हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. याउपर पृथ्वीवर सध्या जी जीवसृष्टी शिल्लक आहे, तीदेखील पूर्वीसारखी आनंदी, टवटवीत, आपल्या गुणांनी संपन्न आणि निरोगी नाही.
 
सुखार्था: सर्वभूतानां मता: सर्वा: प्रवृत्तय:।
 
यच्चयावत् सर्व प्राणिमात्रांच्या सर्व प्रवृत्ती (उद्योग, कर्म) हे सुखासाठीच असतात. असे सतत प्रयत्न करूनदेखील मनुष्याला सुख का मिळत नाही? तर
 
सुखं च न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत्॥
 
धर्माचरण केल्याशिवाय सुख मिळत नाही. म्हणून जे सुखार्थी आहेत त्यांनी धर्मपर असावं. (सर्वांना कल्याणकारी अशा सनातन, योग विदित, मानवता धर्माचं अनुष्ठान करावं.)
 
धर्माचरणासाठी चित्त शुद्ध हवं. त्यावर आपलं नियंत्रण हवं. ही तर आणखी अवघड गोष्ट!
 
अर्जुनासारखा इंद्रियविजयी वीर गीतेत म्हणतो, “हे माधवा, हे मन फार चंचल आणि बलवान आहे. त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे वार्‍यावर नियंत्रण मिळवण्याइतकंच अवघड आहे.”भगवंत म्हणतात, अभ्यासेन च कौन्तेय, वैराग्येण च गृह्यते। अभ्यास आणि वैराग्य यांनी हे नियंत्रण प्राप्त करता येऊ शकतं.
 
योगातून मानवता योगशास्त्राची आठ अंगे आहेत. पैकी धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग आहे. ते मोक्षासाठी उपयुक्त सोपान आहेत.
 
प्रत्याहार हा अंतरंग आणि बहिरंग योगाचा उंबरठा आहे. प्रत्याहारापासून वैराग्य प्रबल होत जातं. त्यापूर्वीची चार अंगं ही ‘अभ्यास’ बळकट करणारी आहेत. त्यातदेखील आसन आणि प्राणायाम हे देहासाठी अधिक उपयुक्त आहेत.
 
योगाचे प्रथम दोन सोपान- यम आणि नियम हेच मानवतेसाठी अधिक उपयुक्त आहेत. आसनादी अन्य सर्वांचा अभ्यास दिवसातून काही ठरावीक वेळच करणं शक्य आहे. यम आणि नियमांचा अभ्यास मात्र दिवसभर सातत्यानं करणं अपेक्षित आणि आवश्यक आहे.
 
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम; तर शौच, संतोष, स्वध्याय, तप आणि ईश्वरप्रणिधान हे नियम यांच्याबद्दल लिहावं तेवढं कमी आहे. या सर्व तत्त्वांचं यथार्थ स्वरूप जाणून घेणं अवघड आहे. उदा. अहिंसा हा परम/श्रेष्ठ धर्म असला तरी धर्मासाठी हिंसा हीदेखील श्रेष्ठ आहे, असं स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. म्हणूनच सत्य, अहिंसा, शौच, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इ. चं योग्य स्वरूप समजून घ्यायचं असेल, तर त्यांचं आदर्श आचरण करणार्‍या थोर व्यक्तींची चरित्रं वाचायला हवी. महाभारत, रामायण यांचा अभ्यास हवा.
कलियुगातल्या सामान्य लोकांसाठी यावर आणखी सोपा उपाय म्हणजे ज्ञानदेव, समर्थ रामदासस्वामी यांचं ऐकावं. कारण त्याच सनातन, भागवत, मानवता धर्माचा ते प्रचार करतात.
 
अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य जर यम नियमांचे पालन करू लागला, तर त्याला ‘महाव्रत’ म्हणता येईल. असं महाव्रत स्वीकारलेला समाज निःसंशयपणे उत्कर्ष पावेल.
 
अनुकंपा, करुणा, सहृदयता, दया, सहानुभूती, आपलेपणा या (दिवसेंदिवस कमी होत जाणार्‍या) मानवी भावना समाजात रुजवायच्या असतील, तर योग हे त्याचं उत्तम आणि सोपं साधन आहे.
- वैद्य सुचित्रा कुलकर्णी