टेक्सास शाळेचा धडा आणि भारतातील नीतिमत्तेची घसरण

    दिनांक : 02-Jun-2022
Total Views |
 
अमेरिकेतील टेक्सासच्या शाळेमधील माथेफिरुच्या गोळीबाराची बातमी, ‘गन लायसन्स’ विषयावरील सविस्तर लेखही आपण वाचले. परंतु, या घटनेचा भारतीय समाजमनाशी अर्थोअर्थी संबंध नसला तरी गेल्या काही काळातील भारतातील तरुणाईसंबंधीच्या काही विदारक घटनाही तितक्याच मन विषण्ण करणार्‍या आहेत. तेव्हा, टेक्सासच्या शाळेचे प्रकरण आणि भारतातील एकूणच युवांच्या नीतिमत्तेची घसरण याचा उहापोह करणारा हा लेख...
 

texas
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी अमेरिका येथील टेक्सासच्या एका शाळेत १८ वर्षे वयाच्या माथेफिरू मुलाने गोळीबार करून अनेक शाळकरी मुलांना ठार मारले. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. त्या बातम्यांची दृष्ये हृदयद्रावक अशीच आहेत. म्हणूनच प्रश्न पडतो की, जग नेमके कुठल्या दिशेने चालले आहे? निसर्गनिर्मित विषाणूपेक्षाही हा विकृत मानवनिर्मित विषाणू पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे. पाश्चात्य संस्कृतीत जे स्वातंत्र्य अभिमानाने शेखीने मिरवले जाते, त्या मोकळ्या स्वातंत्र्याचे पुरेपूर धिंडवडे निघाले आहेत.
 
भारतासारख्या देशात जे पारंपरिक संस्कार, शिक्षण, दिले जाते, त्याला नावे ठेवणार्‍या, नाक मुरडणार्‍या पाश्चात्य मंडळींना ही चांगली चपराक आहे. १५-१६ वर्षे झाली की, मुले स्वतंत्र होतात, आई-वडिलांपासून वेगळी राहतात, कमवायला लागतात या गोष्टींचे कौतुक आहेच. पण, बहुतांशी तरुण-तरुणी मद्य, ड्रग्जच्या आहारी जातात. खुले लैंगिक व्यवहार नैसर्गिक गरज मानतात, मुली सर्रास गर्भपात करतात, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात, त्याचे काय? या मुक्त व्यवस्थेचे फायदे कमी अन् तोटे जास्त आहेत, हे या नव्या पाश्चात्य पिढीला समजत नाही. समजून घेण्याची इच्छा नाही. विशेष म्हणजे त्यांचे पालक, शिक्षक यांनादेखील ती गरज वाटत नाही.
 
वाटत असली तरी त्याचा काही उपयोग नाही, या जाणिवेपोटी ते हतबल झाले आहेत. शाळेत नैतिक मूल्याचे धडे ‘कम्पल्सरी’ दिले जावेत, हा आपला आग्रह. तिकडे मुलांना मोठी झाल्यावर हवे तसे वागू द्या, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या हा युक्तिवाद. इतक्या भयंकर घटनानंतर देखील सरकारला ‘गन लायसेन्स’ संबंधी कायदा बदलावासा वाटत नाही. इथे पालक, शिक्षकांची नव्हे, तर सरकारची हतबलता दिसून येते. आपण देखील यापासून वेळीच धडा घेणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेले खून, त्यामागची कारणे, तरुण पिढीत वाढत चाललेली बेजबाबदार प्रवृत्ती, गावातून शहरांत गेलेल्या तरुण तरुणीची शीघ्र वेगाने बदलत चाललेली मानसिकता, समाजातील विषमतेमुळे आलेले नैराश्य, सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे वाढलेली सैरभैरता, अवतीभवतीच्या दूषित राजकारणामुळे भरकटलेली वैचारिक क्षमता हे सारे दुर्लक्षित करण्यासारखे नाही.
काही महिन्यांपूर्वी कुणा एकाच्या फोनवरील मेसेजच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून हजारो मुले अल्पावधीत परीक्षेसंबंधी आंदोलनाकरिता मुंबईत एकत्र जमली होती. सरकारची गाळण उडाली होती. ही घटना काय दर्शविते? गावाखेड्यातील मुले शिक्षण, अध्ययन यापेक्षा एखाद्या नेत्याच्या मागे उपरणे घालून, झेंडे हाती घेऊन उसने नारे मारण्यात घोषणा देण्यात धन्यता मानतात. शाळा-महाविद्यालयाची मुलं कुणा राजकीय पुढार्‍यांना हाताशी घेऊन नको त्या मागण्या मान्य करण्यास सरकारला, विद्यापीठाला भाग पाडतात. त्यात त्यांचेच नुकसान आहे, हे त्यांना कळत नाही. त्यांना ‘शॉर्टकट’ हवा असतो. तात्कालिक फायदा हवा असतो. आपले खरे भले कशात आहे, हे त्यांना कळत नाही. राजकारणी नेते या तरुणाईला हाताशी धरून आपली पोळी भाजून घेतात. या मुलांना पुढे करून ते आपला कार्यभाग साधत असतात.
 
आता तर ‘न्याय’ संस्थेऐवजी राजकीय पुढारी, पक्ष यांना हाताशी धरून जोरजबरदस्ती करून कार्यभाग साधायचा किंवा मीडिया चॅनलला हाती धरून तिथल्या अभिरूप न्यायालयात खटला चालवायचा, असे प्रकार चालू आहेत. चॅनलवर चर्चेत एखाद्या लहान मुलाला घास भरवावा तसे सूत्रधार आलेल्या तज्ज्ञांना शब्दांचे घास भरवतात, अन् तज्ज्ञदेखील ते उष्टे घास खाण्यात धन्यता मानतात! एकीकडे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, अशी बोंब मारायची अन् दुसरीकडे सोशल मीडियावर वाटेल तशी गरळ ओकायची असा प्रकार सुरू आहे.
 
गेल्या काही महिन्यांत नागपूर, औरंगाबाद येथे घडलेले खूनसत्र चिंता करण्यासारखेच आहे. तिथेही बहुताशी तरुण मुलांचा हात आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून खुनापर्यंत मजल जावी हे चिंताजनक आहे. काही ठिकाणी सहृद्यांना मारले आहे निर्घृणपणे.घरचे दूषित कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील हरवलेला संवाद, शिक्षकाचा नसलेला प्रभाव, शाळा महाविद्यालयातील बदललेले वातावरण, समाजातील एकूणच नीतिमत्तेची घसरण हे सारे याला कारणीभूत आहे. शहरात ‘आयटी’ क्षेत्रात गेलेली तरुण पिढी देखील अचानक हाती आलेल्या पैशांमुळे बदलली आहेत. त्याच्या पार्ट्या, ऑफिसच्या कामाने बाहेर गेल्यावर मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर हेदेखील फारसे चर्चिले न जाणारे, पण चिंतेचे विषय आहेत. या वर्गात तसेच, सिने नाटक क्षेत्रात एकट्या राहणार्‍या तरुण वर्गात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चेप्रमाण वाढले आहे. तिथेही नैराश्यातून होणार्‍या आत्महत्या, द्वेषातून एकमेकांचा काटा काढणे हे प्रकार वाढले आहेत. एकूणच नीतिमत्तेची घसरण सर्व क्षेत्रांत चालली आहे.
 
अजून आपल्या शाळेतील मुलांच्या हातात ‘गन’ आलेली नाही. पण, त्यांच्या हातातले दगडदेखील कमी घातक नाहीत. काश्मीरमध्ये तरुणाईला हाताशी धरून जे घडले, ‘उडता पंजाब’मध्ये जे चालले आहे, तेदेखील दुर्लक्ष करण्यासारखे नाही. केवळ नद्या-तलाव दूषित होत नाहीत, तर अख्खा तरुणाईचा सागर दूषित होत चाललाय. गंगेच्या ‘स्वच्छता मोहीम अभियाना’पेक्षा तरुण पिढी नीट मार्गी लावण्याचे अभियान अधिक जरुरी, महत्त्वाचे आहे.
 
यामागची कारणे शोधावी लागतील. समाजशास्त्रज्ञ, मनोविकास तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन या गंभीर विषयावर विचार मंथन करायला हवे. यामागची खरी कारणे, बदलती समाजव्यवस्था, संस्कृती, मूल्य विचार याचा सर्वांगाने अभ्यास व्हायला हवा. एरवी कोरोनासारखे आग लागल्यावर विहिरी खणत बसल्यासारखी स्थिती होईल. हा कर्करोगासारखा रोग आहे. तो पहिल्या स्टेजवरच आवरायला हवा. पुढच्या स्टेजमध्ये परिस्थिती गेली की, हाती काहीच राहत नाही. पाश्चात्य देशात अशीच अवस्था आहे. दिलेले स्वातंत्र्य परत घेणे, निर्बंध सोडल्यावर, लगाम लावण्याचा प्रयत्न करणे अवघड असते. आपण या घटनांपासून शिकायला हवे.
 
वेळीच सावध व्हायला हवे. सोशल मीडिया वापरावर कुठे तरी नियंत्रण हवे. घरातील माणसांनी निदान जेवायच्या वेळी एकत्र यायला हवे. एकमेकांशी बोलायला हवे, अडचणी असल्या तर मोकळेपणाने त्यावर चर्चा करायला हवी. संवादाने प्रश्न सुटतात निदान सोपे तरी होतात. घरातील वडिलांनी पोलिसांसारखेनियंत्रण ठेवले नाही, तरी विचारपूस करायला हवी.मुलांना ते कुठे जातात, काय करतात, त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, ही माहिती हवी. याला ‘कंट्रोल’म्हणता येणार नाही. ‘स्वातंत्र्यावर आघात’ म्हणता येणार नाही. ज्यात काही गैर नाही, असे आपल्याला वाटते तसे करण्यात अडचण ती काय? जी गोष्ट लपवून करावीशी वाटते ती वाईट, ही साधी व्याख्या समजून घ्यावी. मुलांवर विना कारणनियंत्रण नको हे खरे तसेच नको तितके स्वातंत्र्यदेखील नकोच! शेवटी सुवर्णमध्य महत्त्वाचा. समन्वय साधणे महत्त्वाचे. अतिरेकानेच अतिरेकी निर्माण होतात.म्हणूनच टेक्सासचा धडा महत्त्वाचा. तो ‘ऑप्शनल’लाटाकण्याचा विषय नाही एवढे समजले तरी पुरे!
 
लेखक: डॉ. विजय पांढरीपांडे