अधोगती होऊनही सुधारणार नाहीच!

    दिनांक : 02-Jun-2022
Total Views |
 
काँग्रेसला अजिबात सुधारायचे नाही, तर जे आतापर्यंत करत आलो, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात हिंदूंना धुडकावण्याचे अन् मुस्लिमांना गोंजारण्याचे राजकारण काँग्रेसला करायचे आहे, असा पक्ष स्वतः बुडता बुडता दुसर्‍याला घेऊन बुडणार नाही तर काय होणार? प्रशांत किशोर तेच सांगत आहेत.
 

gandhi 
 
हम तो डूबे हैं सनम,
तुम को भी ले डूबेंगे!
 
अगदी याच शब्दांत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे वर्णन केले. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांचे हे अनुभवाचे बोल आहेत, टीका करायची म्हणून ते बोललेले नाहीत. प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये ‘जनसुराज्य यात्रे’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत, यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले. प्रशांत किशोर २०१२ सालापासून गुजरातमध्ये नरेंद्र मोदींसाठी काम करत होते. त्यानंतर त्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनीतिकाराचे काम केले. नंतर त्यांनी अनेक पक्षांसोबत काम केले, त्यातल्या सर्वांनाच निवडणूक जिंकून देण्यात प्रशांत किशोर यशस्वी झाले, अपवाद फक्त २०१७ सालच्या काँग्रेससोबतच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा. त्याचे कारणही प्रशांत किशोर यांनी सांगितले. काँग्रेस स्वतःमध्ये कसलीही सुधारणा घडवून आणत नाही आणि यामुळेच माझा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ खराब झाला, असे ते म्हणाले. प्रशांत किशोर यांचे म्हणणे काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास पाहता योग्यच असल्याचे दिसते.
 
नुकतेच काँग्रेसने राजस्थानच्या उदयपूरमध्ये चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. त्यात निवडणुकीच्या राजकारणात विजयाची रणनीती आखण्यासंबंधी, पक्षात आमूलाग्र सुधारणा घडवण्याविषयी चर्चा व निर्णय होईल, अशी अपेक्षा काँग्रेसी गुलामांना होती. पण, तसे काही झाले नाही आणि फक्त तात्त्विक चर्चा करण्यात काँग्रेसने शहाणपणा मानला. देशातले सध्याचे वातावरण नेमके कसे आहे, जनतेच्या आशा-आकांक्षा काय आहेत, जनतेला कोणती विचारसरणी हवी आहे, आपणही त्याला अनुसरुनच जनतेसमोर गेलो पाहिजे, यापैकी कोणत्याही विषयावर कृतीआराखडा काँग्रेसने जाहीर केला नाही. उलट जनतेला जे हवे, त्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेसने या चिंतन शिबिरात चालवला.
 
आज जनतेला विकास तर हवाच आहे, पण त्यासोबतच राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ राज्यकर्तेही हवे आहेत. काँग्रेसकडे या दोन्ही गोष्टींची सतत वानवाच होती व आजही आहे. उलट काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व म्हणजेच राहुल गांधी भारताला राष्ट्रच मानत नाहीत. भारत म्हणजे युरोपप्रमाणे ‘युनियन ऑफ स्टेट्स’ असल्याचे ते म्हणतात. त्याचा अर्थ देशातील विविध राज्यांची जोपर्यंत मर्जी आहे, तोपर्यंत ते देशात राहतील आणि मर्जी संपली की, फुटून निघतील असा होतो, ही आहे काँग्रेसची फुटीरतावादी विचारसरणी! काँग्रेसला हिंदूदेखील निवडणुकीच्या काळात मठ, मंदिरांचे उंबरे झिजवतानाच आठवतो. पण, आज काशीतील ज्ञानवापी मशीद विश्वेश्वराचे मूळ मंदिर असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा मुद्दा न्यायालयात गेलेला आहे, इतरही अनेक मशिदी मंदिरे पाडून बांधल्याचे दावे न्यायालयात दाखल केले जात आहेत, अशा परिस्थितीत काँग्रेस मात्र मुस्लीम लांगूलचालनासाठी हिंदूंच्या न्याय्य, हक्क, अधिकार, संघर्षाला लाथाडण्याचेच काम करत आहे. यापैकी कुठल्याही याचिकेला काँग्रेसने पाठिंबा देत हिंदू पक्षाचे समर्थन केलेले नाही. 
 
१९९१ सालच्या प्रार्थनास्थळ कायद्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्या कायद्याने हिंदू, बौद्ध, जैन, शीखांच्या धार्मिक अधिकारांना कायमचे डावलले गेल्याचे म्हटले जात आहे. त्यावर प्रार्थनास्थळ कायदा आणून आमच्याकडून चूक झाली, तो कायदा रद्दच केला पाहिजे, असे म्हणून खरे म्हणजे काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदू जनमानसाचा विश्वास जिंकायला हवा होता. पण, एकगठ्ठा मुस्लीम मतपेटीसाठी आपले दाढी कुरवाळू राजकारण सुरू ठेवत काँग्रेस यापैकी काहीही करताना दिसत नाही. म्हणजेच काँग्रेसला अजिबात सुधारायचे नाही, तर जे आतापर्यंत करत आलो, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात हिंदूंना धुडकावण्याचे अन् मुस्लिमांना गोंजारण्याचे राजकारण काँग्रेसला करायचे आहे, असा पक्ष स्वतः बुडता बुडता दुसर्‍याला घेऊन बुडणार नाही तर काय होणार? प्रशांत किशोर तेच सांगत आहेत.
 
२०१७ सालीदेखील प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी रणनीती आखून दिली होती. पण, काँग्रेसमध्ये सर्वज्ञान फक्त गांधी घराण्यालाच असल्याने प्रशांत किशोर यांच्या सल्ले, सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जनतेसमोर नेल्यास यश मिळेल, असेही त्यांचे म्हणणे होते. पण, गांधी घराण्यात फक्त पंतप्रधानच जन्माला येत असल्याने त्यातला एखादा वारस मुख्यमंत्री कसा होऊ शकेल, याच विचाराने प्रशांत किशोर यांचा सल्ला ऐकला गेला नाही. त्यानंतरही प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये अनेक बदल सूचवले होते, पण त्यावरही काँग्रेसने अंमलबजावणी केली नाही. परिणामी, प्रशांत किशोर यांनी रणनीती आखायची पण, कार्यवाही मात्र गांधी घराण्याच्या मनमानीचीच व्हायची. त्याने काँग्रेसचा उत्तर प्रदेशात पार बट्ट्याबोळ झाला अन् नाव घेण्यासारख्या जागाही त्या पक्षाला मिळाल्या नाहीत.
 
गेल्याच महिन्यात प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानुसार प्रशांत किशोर यांची काँग्रेस नेतृत्वाशी चर्चाही झाली, पण ती फळली नाही. कारण, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा तो सर्वोच्च नव्हे, तर दुसर्‍या क्रमांकाच्या नेतृत्वासाठी अन् गांधी घराण्याच्या तालावर नाचावे, अशी अपेक्षा होती. अर्थात, ते प्रशांत किशोर यांनी मान्य करणे शक्य नव्हते. कारण, ते स्वतः निवडणूक रणनीतिकार आहेत, त्यांना निवडणुका जिंकून देण्याचा चांगला अनुभव आहे, ते स्वतः संघटनेचा, संघटनेतील नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा कुठे व कसा वापर करुन घ्यायचा हे जाणतात. हे काम सर्वोच्च नेतृत्वपदी आल्यानंतरच करता येऊ शकेल, हे प्रशांत किशोरना ठावूक होते. म्हणूनच त्यांनी काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेतृत्व नाकारले. त्यावरुन काँग्रेसला फक्त गांधींची घराणेशाही टिकवून ठेवायची आहे, कितीही अधोगती झाली, तर पक्षात कसलीही सुधारणा करायची नाही, हे स्पष्ट होते. प्रशांत किशोर यांची टीका म्हणूनच सार्थ ठरते.