अतिदुर्गम भागात शैक्षणिक परवड थांबली; शिक्षकांची नियुक्ती

नर्मदा काठावरील जि.प.च्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |
नंदुरबार : वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहणार्‍या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरच्या मुलांची शैक्षणिक परवड आता थांबली असून, जिल्हा परिषदेच्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
 
 
akkal 
 
 
नर्मदाकाठ नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचा टोक समजला जातो. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरा करीत असतांना अद्यापपर्यंत परिसरात पुरेशा प्रमाणात दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड असून सुद्धा त्यांच्या हक्काच्या शैक्षणिक अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.
 
जि.प.भांग्रापाणी गटाच्या सदस्या बाजूबाई किरसिंग वसावे यांनी सर्वसाधारण सभेत नर्मदा काठावरील दुर्गम भागात शाळा सुरू करण्याच्या प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून अध्यक्षा ऍड सीमा वळवी, उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजित नाईक यांना निवेदने दिली. माजी सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील पदाधिकारी व अधिकार्‍यांशी वेळोवेळी भेटीगाठी घेत समस्या मांडल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाच्या लाभ देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अतिदुर्गम भागातील नर्मदाकाठवरील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन देत उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शिक्षण विभागाने नुकतीच ४ शाळांना प्रशासकीय मान्यता दिली. सिपानपाडा, दुडापाडा, पिपलापाडा, उंबरपाड या शाळांना मान्यता देण्यात आली.
 
अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवा केंद्रात ४ शाळांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिपानपाडा येथे रोहिदास सरदार पावरा, दुडापाडा येथे कांतीलाल अग्रेशा पावरा,पिपलापाडा येथे परमानंद सारख्या कोकणी,उंबरपाड येथे अमोल मनोहर ठीगले यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे.