पुरातन वास्तू जतन; गंभीर अनास्था!

    दिनांक : 17-Jun-2022
Total Views |

वेध


असे म्हटले जाते, इतिहास विसरून भविष्याकडे केलेली वाटचाल अवघड असते. आपल्या नगरात एकतरी वास्तू अशी असते; जी आपल्याला आपल्या भूतकाळाची आठवण करून देते.

 
 
vastu

 

 
 
 
बहुतांश, तो गौरवशाली असतो. अशा देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणार्‍या पुरातन वास्तू मात्र आज दुर्लक्षित आहेत. गावातले चार-दोन लोकं अशा वास्तूच्या जतनासाठी शासन व प्रशासनाशी गेली अनेक वर्षं लढत आहेत. पण त्यांना ना जनतेची साथ असते, ना पुढार्‍यांची! 'क्यूं गडे मुडदे उखाडते हो' असे काहीसे त्यांना ऐकावे लागते. असाच एक संघर्ष चंद्रपुरात गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. गोंडकालीन Saray 'सराय' इमारत आज अत्यंत जर्जर अवस्थेत कशीबशी उभी आहे. या वास्तूने एकेकाळी जसे वैभव बघितले तसेच स्वत:ला उभे ठेवण्याचा संघर्षही पाहात आहे. गत दोन वर्षांपूर्वी या वास्तूच्या जतनासाठी संघटित प्रयत्न झाले. पत्रव्यवहार, भेटी झाल्या. विविध पक्षांतील नेतेमंडळींनीही प्रसिद्धीपत्रक काढून आपल्याला या पुरातन वास्तूबद्दल किती चिंता आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आश्वासनांची जोरदार बरसात झाली, पण त्यात इमारतीचे छतच कोसळले. शेवटी न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली. त्याची सुनावणी बुधवारी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्याच्या शहरी विकास विभागाचे मुख्य सचिव, पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचे उपसचिव, पुरातत्त्व व संग्रहालय विभागाचे संचालक आणि चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त यांना विचारणा केली. चार आठवड्यात त्यांना उत्तर द्यायचे आहे. Saray 'सराय' पूर्णपणे जमीनदोस्त होण्याआधी काहीतरी निर्णय होणार, अशी आशा आता पल्लवित झाली आहे.
 

Saray 'सराय' वास्तूच्या जतनाची कहाणी केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. अशा अनेक वास्तू विदर्भात कुठल्या तरी जनहित याचिकेची वाट पाहात आहेत. कारण त्या त्या शहरांतून अशा वास्तूंच्या जतनाचे सारे प्रयत्न गळून पडले असतील. वैनगंगेतीरी वसलेल्या आणि विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आठव्या शतकातील 'मार्कंडा' मंदिराच्या जतनासाठीही खूप प्रयत्न करावे लागले. अजूनही तिकडे मोठ्या विकासाची अपेक्षा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील भोवरागड किल्ला, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा गोंडकालीन किल्ला, नागपूर जिल्ह्यातील भिवापूरची पुरातन पायविहीर, भंडारा जिल्ह्यातील कैसर ए हिंद दरवाजा, ऐतिहासिक पांडे महाल, गिरजा पार्वती गुंफा, यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकीची बारव, लाडखेड येथील दक्षेश्वर मंदिर, रंगनाथ स्वामी मंदिर, बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीची गढी, चिंचखेड येथील शिव मंदिर, चिंचपूर-खामगावच्या दोन पुरातन बारव, अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा किल्ला, सांगोळा येथील दशानन रावण मूर्ती, मनसरचे स्तूप आणि चैत्यगृहे, गोंदिया जिल्ह्यातील कामठा किल्ला अशी विदर्भातील अनेक ठिकाणं आहेत, जी जपली गेली पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. एकदा का अशा वास्तूंना पुरातत्त्व विभागाची मोहर लागली की, मग त्या वास्तू दुर्लक्षित होतात. कायद्याने त्याकडे कुणाला बघता येत नाही आणि ज्यांनी बघावे अशी अपेक्षा असते, ते ढुंकूनही पाहत नाहीत. चंद्रपूर महानगराभोवतीचे गोंडकालीन परकोट आणि त्यातील बुरुज जवळपास ढासळलेच होते. शेवटी ईको-प्रोचे बंडू धोतरे यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याची स्वच्छता आणि डागडुजीची परवानगी मिळवली आणि आपल्या संस्थेच्या स्वयंसेवकांकडून ते काम नि:शुल्क केले. आज या परकोटाच्या भिंतीवरून 'हेरिटेज वॉक' केले जाते. त्याची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात'मधून घेतली आणि या कामाचे कौतुक केले; पण हा अपवाद आहे. प्रत्येक गावात असे स्वयंसेवी कार्यकर्ते उभे राहणे कठीण आहे. खरे तर, Saray अशा वास्तूंचे जतन त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढाकारातून व्हायला हवे. त्यासाठी पुरातत्त्व विभागानेही सहकार्य करायला हवे, तेव्हाच अशा वास्तू आम्हाला आमचा इतिहास स्पष्टपणे दाखवतील आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आमच्यात निर्माण करतील, असे वाटते.

 
- संजय रामगिरवार
 

- 9881717832