युक्रेन युद्धात रशिया 'पराभूत'!

    दिनांक : 13-Jun-2022
Total Views |

आधुनिक अस्त्र-शस्त्र यांच्या बळावर भूमी तर जिंकता येते, मात्र देश जिंकता येत नाही हे कटुसत्य अमेरिकेनंतर रशियाच्या लक्षात येत आहे.

 

Ukraine war 1 
 
युक्रेनच्या राष्ट्रवादासमोर रशियाची शस्त्रे-प्रक्षेपणास्त्रे बोथट ठरत आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला १०० दिवस लोटल्यानंतरची ही आहे गोळाबेरीज.
 

रशिया 'पराभूत' !

 

भारताचे माजी परराष्ट्र सचिव व माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शामसरण यांनी आपल्या 'हाऊ इंडिया सीज द वल्र्ड' या ताज्या पुस्तकात, Ukraine war युक्रेन युद्धात रशिया पराभूत झाल्याचा जो निष्कर्ष काढला आहे तो बहुधा यामुळेच. या युद्धात रशिया पराभूत झाला आहे, तर चीन चुकीच्या बाजूने गेला आहे, असे प्रतिपादन शामसरण यांच्या या पुस्तकात करण्यात आले आहे. जवळपास असाच निष्कर्ष लंडनमधील एक युद्ध अभ्यासक मायकेल क्लार्क यांनी काढला आहे. युक्रेन युद्धाने राष्ट्रपती पुतिन यांच्यासमोर पराभवाचे फक्त वेगवेगळे पर्याय समोर ठेवले आहेत. आपल्या एका लेखात क्लार्क यांनी या युद्धाचे, भावी परिस्थितीचे फार चांगले विवेचन केले आहे.

 

दोन कारणे

 

Ukraine war युक्रेन युद्धात रशिया पराभूत झाल्याचे प्रतिपादन करताना शामसरण यांनी दोन मुद्दे मांडले आहेत. रशियाने युक्रेनचा काही भाग जिंकला तरी बेचिराख झालेला भाग जिंकून रशिया काय मिळविणार आहे? त्याच्या त्या विजयाला कोणताही अर्थ राहिलेला नाही. दुसरा मुद्दा आहे तो नाटोचा. युक्रेन नाटो संघटनेत जाईल हे युद्ध सुरू होण्याचे एक प्रमुख कारण सांगितले जाते. युक्रेनने तटस्थ राहावे, नाटोत म्हणजे अमेरिकेच्या गोटात जाऊ नये अशी रशियाची भूमिका होती. त्याचकाळात युक्रेनने अमेरिकेशी सलगी वाढविण्याचे धोरण सुरू केले होते. याने संतप्त होत राष्ट्रपती पुतिन यांनी हे युद्ध सुरू केले असे सांगितले जाते. म्हणजे नाटोला बळकट होण्यापासून रोखणे हे या युद्धाचे मुख्य कारण सांगितले जाते. याचा विचार करता रशिया सपशेल चुकला आहे. कारण, युक्रेनने नाटोत दाखल होण्याचा अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आजवर तटस्थ असणारे फिनलॅण्ड व स्वीडन नाटोत दाखल होत आहेत.

 

२०० वर्षांची तटस्थता

 

स्वीडन व फिनलॅण्ड हे दोन्ही देश कोणत्याच गटात सामील नव्हते. मागील २०० वर्षांपासून त्यांनी आपली ही तटस्थता पाळली होती. ही तटस्थता सोडून त्यांनी नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. फिनलॅण्ड हा तर रशियाचा शेजारी. या दोन देशांची सीमा १३०० किलोमीटरची आहे. फिनलँण्डची राजधानी हेलसिंकी आणि रशियाचे सेंट पीटसबर्ग यांच्यात दररोज रेल्वे वाहतूक होत असते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने फिनलॅण्ड बिचकला. स्वीडन व फिनलॅण्ड हे दोन्ही तसे लहानसे देश. बलाढ्य रशिया आपल्याला केव्हाही गिळंकृत करील या भीतीने त्यांनी नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत नाटो ही एक मृतप्राय संघटना मानली जात होती. मात्र, Ukraine war युक्रेन युद्धाने नाटोचे महत्त्व अचानक वाढविले. हे रशियाच्या चुकीने झाले आहे. या साèया पृष्ठभूमीवर शामसरण यांनी रशिया पराभूत झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

 

चीन थंड !

 

राष्ट्रपती पुतिन यांनी Ukraine war युक्रेनवर हल्ला चढविण्यापूर्वी फक्त चीनचे राष्ट्रपती शी जिनपिग यांना विश्वासात घेतले होते. बीजिंगगमध्ये आयोजित हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पुतिन तेथे गेले असता, त्यांनी युक्रेनबाबत जिनपिग यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी चीनने, रशिया- चीन मैत्रीला आता सीमा राहिलेल्या नाहीत असे भाष्य केले होते. Ukraine war युद्ध सुरू होऊन १०० दिवस लोटले असले तरी चीनने रशियासाठी फार काही केलेले नाही. याने राष्ट्रपती पुतिन वैतागले असल्याचे म्हटले जाते. रशिया व चीन यांच्या भूमिकेतील महत्त्वाचा फरक म्हणजे रशियाचा भर लष्करी ताकदीवर राहिलेला आहे तर चीनचा भर आर्थिक ताकदीवर राहिलेला आहे. रशियाच्या नादी लागून आपले हात पोळून घेण्याची चीनची मानसिकता नसल्याचे म्हटले जाते.

 

अमेरिकेची नामुष्की !

 

रशियाला आज Ukraine war युक्रेनमध्ये ज्या नामुष्कीचा सामना करावा लागत आहे, तीच नामुष्की अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये सोसावी लागली. अमेरिकेने अफगाणिस्तानवर कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. तेथील सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे दिली. त्यांना गणवेष सुद्धा तयार करून दिला. अमेरिकन सैन्य माघारी परतल्यावर अफगाण सैन्याने तालिबानचा मुकाबला करावा यासाठी अमेरिकेने हे सारे केले होते. पण, ती स्थिती येताच अफगाण सैन्याने पळ काढला. तालिबानसमोर शरणागती पत्करली. अफगाणिस्तानात राष्ट्रवादाचा विजय झाला. युक्रेनमध्ये अमेरिकेने आपली व्यूहरचना बदलली. तेथे जाण्याची त्याने घाई केली नाही. आपले सैन्यही पाठविले नाही. मात्र युक्रेनला आधुनिक शस्त्रे देण्याचा निर्णय घेतला. हा एक शहाणपणाचा निर्णय होता. याचा अनुकूल परिणाम दिसत आहे. म्हणजे अफगाणिस्तान असो की युक्रेन- दोन्ही ठिकाणी स्थानिक राष्ट्रवादासमोर- अमेरिका व रशिया या जागतिक महाशक्ती पराभूत झाल्या.

 

नवे समीकरण

 

Ukraine war युक्रेन युद्धाने जागतिक समीकरणे कशी बदलत आहेत याचे उदाहरण म्हणजे भारत-अमेरिका आणि अमेरिका-पाकिस्तान यांच्या संबधात होत असलेला बदल. Ukraine war युक्रेन युद्धापूर्वी अमेरिका-पाकिस्तान संबंधाचे शीतपर्व सुरू होते. पाकिस्तान पूर्णपणे चीनचा मांडलिक झाला होता. दुसरीकडे भारत-अमेरिका संबंध दिवसेंदिवस बळकट होत होते. अगदी लडाख प्रकरणातही अमेरिकेने भारताची बाजू घेत, चीनविरोधी भूमिका घेतली होती.

 

युक्रेन युद्धानंतर

 

युक्रेन युद्धानंतर हे चित्र बदलत आहे. भारत-अमेरिका यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तर पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो अमेरिकेत जाऊन, तेथील नेत्यांशी पाकिस्तान-अमेरिका मैत्रीच्या आणाभाका घेत आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी तर अगोदरच ही भूमिका घेतली आहे. म्हणजे मध्यंतरी पूर्णपणे चीनकडे झुकलेला पाकिस्तान आता काही प्रमाणात अमेरिकेकडे झुकला आहे.

 

भारताची योग्य भूमिका

 

युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेत, रशियाच्या विरोधात जाण्यास नकार दिला. ही भूमिका योग्य आहे. भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात तटस्थ भूमिकेचे प्रतिपादन करीत, तत्कालीन सोवियत युनियनशी संबंध बळकट करण्याची जबाबदारी डॉ. राधाकृष्णन यांच्यावर सोपविली होती. त्यासाठी राधाकृष्णन यांना मास्कोत भारताचे राजदूत नियुक्त करण्यात आले होते. प्रारंभी सोवियत युनियन भारताबाबत उदासीन होता. नंतर मात्र, डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रयत्नांनी दोन्ही देशांचे सबंध बळकट झाले आणि त्यावर कळस चढविला तो इंदिरा गांधी- लिवोनिद ब्रेझनेव्ह यांच्यातील संबंधाने !

 

इंदिरा गांधी यांचे ब्रेझनेव्ह यांच्याशी किती प्रगाढ संबंध होते याचे एक उदाहरण सांगण्यात येते. सोवियत युनियनने अफगाणिस्तानात सैन्य पाठविले होते. नंतर ब्रेझनेव्ह यांना ही चूक लक्षात आली. त्यांनी अगतिक होत इंदिरा गांधींना विचारले होते, 'आम्ही अफगाणिस्तानातून कशी माघार घ्यावी हे माझ्या लक्षात येत नाही. तुम्ही मला मार्ग सूचवा.'यावर इंदिरा गांधींनी त्यांना करडे उत्तर दिले होते, ज्या मार्गाने तुम्ही अफगाणिस्तानात आलात, त्याच मार्गाने माघारी जा ! युक्रेन युद्धात भारत-रशिया संबंधाची इमारत न हादरता, ताठ उभी आहे. याचे कारण आहे पं. नेहरू, डॉ. राधाकृष्णन, इंदिरा गांधी यांनी घातलेला या इमारतीचा मजबूत पाया !

 
-रवींद्र दाणी