गोदामातून शेतीमाल चोरणाऱ्या चौघांच्या पिंपळनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    दिनांक : 11-Jun-2022
Total Views |
पिंपळनेर : गोदामातून शेतमाल चोरणारी टोळी पिंपळनेर पोलिसांनी जेरबंद केली आहे. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीचा मालही हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीकडून इतरत्र चोऱ्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. पिंपळनेर ता. साक्री येथील माळी गल्लीत रहाणारे विजय देविदास पेंढारकर यांच्या मालकीचे भाईंदर गावाच्या शिवारात धान्य साठविण्याचे पत्र्याचे शेड असलेले गोडावून आहे.
 
 
 pimpalner
 
 
या गोडावुनमध्ये उघड्यावर असलेला सोयाबिन व वरई (भगर) हा एकूण १ लाख ६२ हजाराचा शेतमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सपोनि सचिन साळुंखे यांना बोढरीपाडा येथील रंजीत योहान देसाई हा २६ वर्षीय तरुण आपल्या इतर साथीदारांसोबत एकांतात असलेल्या गोडावूनसह कांदा चाळीत साठवुण ठेवलेला शेतमाल चोरी करीत असल्याची खबर मिळाली होती.
 
यावेळो सपोनि सचिन साळुंके यांनी तात्काळ रंजित देसाईला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी करता त्याने तिघा साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली त्यानुसार रुवाजी गेंदा गावीत (वय ४५ ) रा. बोढरीपाडा , किरण ईश्वर वळवी (वय २३ ) रा.वार्सा व दावित वन्या राऊऊत (वय २४ ) रा. नांदरखी या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांनी विजय पेंढारकर यांच्याकडे केलेल्या चोरीची कबुली दिली. त्यांनी बाजारात विकलेला ६५ क्विंटल सोयाबिन व ५ क्विंटल वरई ( भगर ) असा एकूण ४ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी धुळे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात सोयाबिन तसेच इतर शेतमाल चोरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.
 
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबीचे निरिक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे असई प्रविण अमृतकर, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाट, राकेश बोरसे,भूषण वाघ यांच्या पथकाने केली आहे.