देणार्‍याने देत जावे...

    दिनांक : 10-Jun-2022
Total Views |
 
समाजासाठी देव ठरलेल्या आणि ज्या मुलांची कळी उमलताच नियतीने खुडून टाकली, अशा लहानग्यांच्या आयुष्यात आनंदाची ‘पालवी’ फुलवणार्‍या मंगलताई शाह यांच्याविषयी...
 
 
 
 tai
 
 
 
नशिबात आलेल्या आपल्याच बाळाच्या यातना स्वीकारायची ताकद नसेल, तर आपल्याच पोटच्या बाळाला वार्‍यावर सोडून देणार्‍या अशा कित्येक असंवेदनशील माणसांची कीव करावी तेवढी कमीच. अशाच साध्यासुध्या आजाराने नाही, तर ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ सारख्या आजाराने ग्रासलेल्या या लहानग्यांची आई झाल्या पंढरपूरच्या मंगलताई शाह. ध्यानीमनी नसताना कदाचित या बालकांसाठी गाभार्‍यातल्या पांडुरंगानेच मंगलताईंची निवड केली असावी.
 
एकविसाव्या शतकात अगदी आजही ‘एचआयव्ही-एड्स’ म्हटले तरी लोक डोळे विस्फारतात, दोन हात लांब राहतात. पण, कुठलाही दोष नसताना निर्दयी अशा आजाराने ग्रासलेल्या या निरागस मुलांना मंगलताईंनी मायेची ऊब दिली. २००१ साली दोन बालकांपासून सुरुवात झाली. मंगलताईंनी बालकांना आश्रय दिला आणि आज त्या जवळजवळ १४० मुलांचा सांभाळ करत आहेत. पंढरपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ही लहान बालके त्यांना सापडलीत ती स्मशानभूमीजवळ! जणू समाजाने त्यांना मरणासाठीच येथे आधीपासून पाठवले होते. परंतु, त्यांनाही जगण्याचा हक्क आहे आणि त्या बाळांना जगवणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून मंगलताई शाह यांच्या ‘प्रभाहिराप्रतिष्ठान’ची ’पालवी’ उमलली.
 
सुरुवातीस अनेक आव्हानांना मंगलताईंना सामोरे जावे लागले. पण, या सगळ्या आव्हानांना त्या तितक्याच भक्कमपणे सामोर्‍या गेल्या. जसे वादळात एखादे वृक्ष न डगमगता आपल्या फाद्यांवरच्या घरट्यांना धक्का लागू देत नाही अगदी तसे. सुरुवातीला मंगलताईंनी आणि नंतर त्यांच्या जोडीने त्यांची कन्या डिंपल घाडगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या उमलेल्या पालवीचा महावृक्ष केला आहे. त्यांची संस्था त्या लहान मुलांवर योग्य ते संस्कार करत त्यांचे संगोपन करते. या बालकांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचा योग्य आहार, औषधोपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यांची योग्य काळजी घेत त्यांना या संस्थेद्वारा शिक्षण दिले जाते. येथील मुले उत्तम गुणांनी उत्तीर्णही होतात. त्यांना जमेल, शक्य होईल ती कामे त्यांना शिकवली जातात. एवढेच नाही, तर तिथे गेल्यावर एवढे गोड दृश्य पाहायला मिळते की, आठ वर्षांचे मुल पाच वर्षांच्या मुलाची, पाच वर्षांचे मूल दोन-अडीच वर्षांच्या बाळाची काळजी घेत आहेत आणि ही सर्व बालके एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. नियतीने त्यांच्या पदरात जेवढे आयुष्य दिले, त्यात आनंदाचे चार क्षण जोडण्याचे हे दैवीकार्य मंगलताई आणि त्यांचे ‘प्रभाहिरा प्रतिष्ठान’ करत आहे.
 
मंगलताईंचे कार्य जसे वृद्धिंगत होऊ लागले, पंढरपुरातील विठुरायाच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचा गजर आसमंतात होऊ लागला तसे त्यांच्या कार्याची दखल घेतली जाऊ लागली. मंगलताई या सर्वांच्या माऊली तर झाल्या आहेतच, पण एवढ्यावरच त्यांचे कार्य थांबले नाही, तर त्यांच्या संस्थेला विविध कार्याच्या फांद्या फुटू लागल्या. ‘प्रभाहिरा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आज जवळपास नऊ वेगवेगळे प्रकल्प चालवले जात आहेत. ’पालवी’ संस्थेत ‘एचआयव्हीग्रस्त’ मुलांची काळजी घेतली जाते, तर ’ज्ञान मंदिर’ प्रकल्पात या मुलांना शिक्षण दिले जाते आणि मागील तीन ते चार वर्षे या प्रकल्पाअंतर्गत शिकणार्‍या मुलांचा दहावीचा निकाल हा १०० टक्के लागला आहे व आता ही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांचा तिसरा अतिशय स्तुत्य असा प्रकल्प म्हणजे ’सेल्फ रिलायन्स प्रोजेक्ट.’ यातून या ‘एचआयव्ही’ बाधितांना ‘आत्मनिर्भर’ बनविले जाते.
 
शिलाई करणे, गोधडी शिवणे, शेती, प्लंबिंग असे विविध व्यवसाय त्यांना शिकवून त्यांना सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे केले जात आहे. याचबरोबर या ’पॉझिटिव्ह’ मुलामुलींची त्यांच्यातील जोडीदारांशी लग्न लावून दिले आणि याहूनही मोठी बाब म्हणजे त्यांनी जन्म दिलेली मुले ही पूर्णतः ’निगेटिव्ह’ आहेत, याहून मोठा दैवी चमत्कार काय असू शकतो!
त्यांचा चौथा प्रकल्प म्हणजे, या मुलांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून त्यांनी गोशाळा सुरू केली आहे, तर ’माहेर’ या प्रकल्पातून विधवा, परित्यक्त्या, मनोरुग्ण, वृद्ध महिलांना ’माहेर’ आधार देते, त्यांचे समुपदेशन करते. ’हिरकणी’ या प्रकल्पातून त्यांनी या महिला जगण्याचे बळ दिले, तर ’परीसस्पर्श’ सारख्या प्रकल्पातून कुसंगतीत राहणार्‍या- व्यसनाधीन, चोर्‍यामार्‍या करणार्‍या मुलांना एकत्र करून त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून, शिस्त, शिक्षणाचे धडे त्यांच्याकडून गिरवले जातात. असेच ’श्रावण’ आणि ’अपना घर’ हे प्रकल्प आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक अपंगत्वापेक्षा जास्त मानसिक अपंगत्व जास्त वाढलेले दिसत आहे, जगण्याची इर्षा माणूस गमावून बसला आहे. अशांसाठी ’अपना घर’ सारखा प्रकल्प काम करतोय. 
 
मंगलताईंसमोर जसजशा समस्या येत गेल्या, तसतसे उपाय आखत, आपली मुलगी ज्या आता स्वतः या संस्थेच्या सचिव आहेत डिंपल घाडगे यांच्या मदतीने त्यांची ’पालवी’ बहरत गेली. विंदांच्या ’देणार्‍याने देत जावे...’ या कवितेप्रमाणे त्या आजही समाजाला फक्त देत आहेत आणि आज त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी डिंपल यादेखील या मुलांसाठी, महिलांसाठी अखंडपणे लढत आहेत, त्यांना स्वबळावर उभे करत आहेत. त्यामुळे आपल्याला खरेच देव शोधायचा असेल, तर तो मंगलताईंसारख्या माणसात शोधा, त्यांच्या ’पालवी’रुपी गाभार्‍याला भेट द्या.