शंभराव्या ‘युनिकॉर्न’पर्यंत झेप

    दिनांक : 09-May-2022
Total Views |

कोणी कसली नशा करावी, हे आपण सांगू शकत नाहीच. पण, देशातील तरुण मोदीविरोधी टोळक्याच्या नादी लागण्याऐवजी नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे, हे आश्वासक आणि यातूनच येत्या काळात १५०, २०० आणि आणखी कितीतरी ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ उदयाला येतील व भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, याची खात्री वाटते.
 
 
 
unicorn
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासूनच त्यांनी ‘स्टार्टअप’ क्षेत्राला सोईसुविधा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली. परिणामी, देशातील स्टार्टअप क्षेत्र वेगाने वाढतानाच ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये झेप घेणार्‍या ‘स्टार्टअप्स’च्या संख्येतही लक्षणीय वाढ होत गेली. आज भारत उभरत्या ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ असलेल्या देशांच्या यादीत चीनला पछाडून जगात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. आता केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरद्वारे यासंबंधीची माहिती दिली. “आपली मजबूत आणि अभिनव परिसंस्था भारतीय ‘स्टार्टअप्स’ला ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये पोहोचविण्यासाठी सक्षम आहे.
 
भारतात ३२ उभरत्या ‘युनिकॉर्न’ कंपन्या तयार झाल्या आहेत, तर चीनमध्ये भारताच्या तुलनेत २७‘युनिकॉर्न’ कंपन्या तयार झाल्या आहेत,” असे ते म्हणाले. तसेच “भारतातील ‘स्टार्टअप’ परिसंस्था ‘युनिकॉर्न’च्या संख्येच्या बाबतीत जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. दि. ५ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात १०० ‘युनिकॉर्न’चे मूल्य ३३२.७ अब्ज अमेरिकी डॉलर्सएवढे आहे,” असे त्यांनी सांगितले. भारताचे १००वे ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ म्हणून ‘ओपन’नामक ‘नियो बँकिंग’ कंपनीची नुकतीच नोंद झाली आहे.
 
भारत विकसनशील देश असला, तरी भारताची विकास मानके जागतिक स्तरावर दिवसेंदिवस विकसित देशांच्या तोडीसतोड असल्याचे दिसत आहे. त्यात सर्वाधिक योगदान ‘स्टार्टअप’ क्षेत्राचे आहे. भारतात ‘स्टार्टअप’ क्षेत्र अधिक प्रभावी होत आहे. गेल्या वर्षी भारतात तब्बल ४४ ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची नोंद झाली, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६ ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ देशाला मिळाले. ‘स्टार्टअप’ क्षेत्राच्या प्रगतीने जगदेखील भारताकडे तिसरी सर्वात मोठी ‘स्टार्टअप’ परिसंस्था म्हणून पाहात आहे. खरे म्हणजे २०२१ मधील ४० पेक्षा जास्त ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’च्या नोंदीतूनच आता एकूणातील १०० व्या ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ची नोंद दूर नाही, हे दिसत होते. कारण, गेल्यावर्षी भारताच्या एकूण ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची संख्या ८४ इतकी होती आणि शंभरी गाठायला आणखी फक्त १६ ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची आवश्यकता होती. ती यंदा मे महिन्यातच पूर्ण झाली.
 
१००वे ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ म्हणून नोंद झालेली ‘ओपन’ नामक कंपनी ‘नियो बँकिंग’ क्षेत्रात काम करते. ‘ओपन’ या कंपनीने ‘आयआयएफएल’, ‘टेमासेक’, ‘टायगर ग्लोबल’ आणि ‘थ्रीवनफोर कॅपिटल’च्या भागीदारीने ‘डी फंडिंग राऊंड’ जमा केला आहे. भारतातील १०० ‘युनिकॉर्न स्टार्टअप’च्या नोंदीने गेल्या एका दशकभरात देशातील ‘स्टार्टअप’ क्षेत्राने शानदार प्रदर्शन केल्याचे दाखवून दिले आहे. त्यामागे अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने ‘स्टार्टअप’ क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांचा, राबवलेल्या योजनांचा मोठा वाटा आहे.
 
कारण, देशात २०१४ आधी फक्त चारच ‘स्टार्टअप्स’चा ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये समावेश झाला होता. ‘युनिकॉर्न क्लब’ म्हणजे, एक अब्ज डॉलर्स मूल्याची कंपनी. विशेष म्हणजे, त्यावेळी देशात फक्त ५०० ‘स्टार्टअप्स’ होते, तर आज त्यांची संख्या वाढून ६८ हजार, २२२ वर पोहोचली आहे. नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची सुरुवात केली होती. तेव्हापासून मोदी सरकारने ‘स्टार्टअप्स’च्या विकासासाठी उत्तम वातावरण तयार केले, त्यातून ‘स्टार्टअप’ क्षेत्रात क्रांती झाली. तरुणांचा नोकरीपेक्षाही स्वतःचा उद्योग सुरू करण्याकडे अधिक कल असल्याचे या काळात पाहायला मिळाले. केंद्र सरकारनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व भारतीय ‘स्टार्टअप’ परिसंस्था अधिक मजबूत झाली.
 
आज देशातील जवळपास ६२५ जिल्ह्यांमध्ये किमान एक ‘स्टार्टअप’ असून निम्म्यापेक्षा अधिक ‘स्टार्टअप’ दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्गातील शहरांमध्ये आहेत. ‘मॅप माय इंडिया’ आणि ‘ईझ माय ट्रीप’सारख्या ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’नी तर भांडवली बाजारातही आपली नोंद केली आहे. याव्यतिरिक्त इतरही अनेक ‘स्टार्टअप’ कंपन्या भांडवली बाजारात नोंदणीसाठी तयारी करत आहेत. भारतीय ‘स्टार्टअप’ क्षेत्राचा विकास पाहून त्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. आता ‘स्टार्टअप्स’मधील वार्षिक गुंतवणूक ११ अब्ज डॉलर्सवरुन वाढून ३६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. २०१० ते २०१४ दरम्यान ‘स्टार्टअप्स’मध्ये केवळ ३.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. पण २०१४ ते २०२१ पर्यंत यातील एकूण गुंतवणूकही ३८.४ अब्ज डॉलर्सवर गेली, यावरुनच या क्षेत्राचे महत्त्व लक्षात येते.
 
देशातील व महाराष्ट्रातीलही मोदीविरोधी महाभाग सदानकदा टीकेचा सूर आळवत असतात. कोणी जाहीर सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घसा फाडताना दिसतो, तर कोणी लेख, अग्रलेख खरडून. त्यांना सगळ्यांनाच नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेसाठी, रोजगारासाठी काहीही केले नाही, हा खोटारडा प्रचार करण्यातच रस असतो. पण, देशातील ‘स्टार्टअप’ क्षेत्राच्या होत असलेल्या विकासाकडे लक्ष द्यायला या लोकांकडे अजिबात वेळ नसतो. आपल्या शहरातले, राज्यातले तरुण नव्या संकल्पनांसह वेगळ्या वाटेने जात आहेत, त्यात यश मिळवत आहेत व इतरांचेही भले करत आहेत, याची माहिती घ्यावीशी त्यांना वाटत नाही.
 
खरे म्हणजे, ‘स्टार्टअप्स’च्या निर्मितीतून बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होत असतो. तसेच एका नव्या कंपनीच्या स्थापनेने त्याला पूरक क्षेत्रात काम करणार्‍यांचाही व्यवसाय होत असतो. अशी ही एक साखळीच असते. डावी मंडळी रोजगार, बेरोजगारीवरून छाती पिटण्याचे काम सतत करत असतात. त्यावर उपाय म्हणून क्रांतीच्या गप्पाही ते मारतात. पण, ‘स्टार्टअप’ क्षेत्रच मुळात सर्वसामान्यांनी केलेल्या क्रांतीचे उत्तम उदाहरण आहे. यातले जवळपास सर्वच उद्योजक सर्वसामान्य घरातून आलेले, साधारण सांपत्तिक पार्श्वभूमी असलेले आहेत. पण, देशात असे काही होत आहे, हे डाव्यांच्या गावीही नसते. ते आपल्याच मनोराज्यात गुंग असतात. अर्थात, कोणी कसली नशा करावी, हे आपण सांगू शकत नाहीच. पण, देशातील तरुण या टोळक्याच्या नादी लागण्याऐवजी नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे, हे आश्वासक आणि यातूनच येत्या काळात १५०, २०० आणि आणखी कितीतरी ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ उदयाला येतील व भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, याची खात्री वाटते.