केशवस्मृती प्रतिष्ठान .. तीन दशके सेवाभावाची...

    दिनांक : 09-May-2022
Total Views |
समाजावर आईसारखे नि:स्वार्थ प्रेम करण्याच्या अभिवचनासह प्रारंभ झालेल्या केशवस्मृती प्रतिष्ठान नामक सेवाकार्याने तीन दशकांचा टप्पा पार केलाय. मातृहृदयी आणि दूरदृष्टीचे डॉ.अविनाशदादा आचार्य यांनी तत्कालीन गरज म्हणून काही सहकार्यांसह १९७९ मध्ये जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना करून स्वावलंबनाची दिशा जशी दाखवली तशीच आर्थिक शिस्तीची सवयही लावली.
 
 
page 7 
 
‘सब समाज को साथ लिये आगे है बढते जाना’ या ध्येयवाक्यासह बँकेने काम करताना तळागाळातील व्यक्तीच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रघात पाडला. काळानुरूप निर्णय घेत आणि नवतंत्रज्ञानाचा अवलंब करीत अल्पावधीतच हजारो ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला. दोन खोल्यांमधून सुरू झालेल्या या बँकेच्या आज चार दशकानंतर राज्यात अर्धशतकाच्या आसपास शाखा आहेत. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बचत गटाने महिलांची आर्थिक सक्षमता जशी सांभाळली तसेच त्यांना जगाच्या बाजारपेठेशीही जोडले. ३३००० हून अधिक बचत गटातील सुमारे ७० हजारांच्या आसपास महिला यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या.
 
जळगाव जनता सहकारी बँकेच्या नफ्यातील लाभांशाच्या दोन टक्के रकमेच्या आधारावर केशवस्मृती प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचे प्रारंभीचे नाव होते जळगाव जनता केशवस्मृती प्रतिष्ठान. कालांतराने केशवस्मृती प्रतिष्ठान हे नाव रूढ झाले. विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्यकर्ते प्रतिष्ठानशी जोडले गेले आणि त्यातूनच आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार विभागातील सुमारे २८ सेवाभावी प्रकल्पांच्या माध्यमातून हा सेवायज्ञ तसाच प्रज्वलित आहे.समाजाला दिशादर्शन करतो आहे.
 
प्रतिष्ठान केवळ आर्थिक विषयातच अडकून पडले नाही तर १९९० मध्ये ‘विवेकानंद प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून सुरू झालेला ज्ञानयज्ञ आज बहुआयामी बनला आहे. मायबोली मराठी सोबतच विद्यार्थ्यांना इंग्रजीचाही सराव व्हावा म्हणून या दोन्ही माध्यमातील शाळा आज केवळ ज्ञानदानाची केंद्रेच नव्हे तर ज्ञान आणि तंंत्रज्ञानयुक्त नवी पिढी घडविणार्या जबाबदार संस्था समजल्या जातात.येथील अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यशाचा आणि लौकिकाचा झेंडा फडकावला आहे. आता त्यात एका कनिष्ठ महाविद्यालयाची भर पडली आहे.
 
जळगावला बाहेरून येणार्यांना अल्पदरात शुध्द, सात्विक आणि ताजे भोजन मिळावे म्हणून प्रतिष्ठानने नवीन एस.टी. स्टँडच्या शेजारी ‘श्री क्षुधाशांती सेवा केंद्र’द्वारे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कार्यरत असलेल्या या केंद्राने बदलत्या काळाची गरज म्हणून विविधांगी खाद्यपदार्थांची उपलब्धता करून देत आपले वैशिष्ट्य आणि लौकिक आजही टिकवून ठेवला आहे.
 
समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि क्षुधा समस्या सोडविल्यानंतर प्रतिष्ठानने समाज प्रबोधनातही आपला वाटा उचलला. समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेसाठी १९९६ मध्ये माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानची स्थापना करून ( आता सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा.लि. ) त्याद्वारे ‘तरूण भारत’ या राष्ट्रीय विचारांची समाजात पेरणी करणार्‍या वृत्तपत्राची खान्देश आवृत्ती सुरू केली. राष्ट्रीय विचारांच्या प्रतिष्ठापनेसाठी कार्यरत असलेले हे दैनिक यावर्षी रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि संग्राह्य पुरवण्या आणि राष्ट्राच्या संरक्षणाशी निगडीत विषयांवरील विशेषांक याची परंपरा तरुण भारत ने केवळ जोपासलीच नाही तर ती आपली विशेष ओळख बनविली.चोखंदळ आणि डिसिजन मेकिंग वाचक हे आपले बलस्थान बनविले.
 
केशवस्मृती प्रतिष्ठान आणि आर.सी.बाफना फाऊंडेशन ट्रस्ट संचालित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीनेही नेत्रदान क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीनेही केलीय. १४ जून, १९९८ रोजी प्रारंभ झालेल्या या रक्तपेढीने समाजमनात आपली विश्वासार्हता जपताना आपली उपयुक्तताही सिद्ध केली आहे. यापूर्वी १९९७ ला बँकेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित जळगाव जनता इन्फोटेक (जेजेआयटी) ची स्थापना होऊन तेथे बँकांसाठी लागणारे सॉफ्टवेअर निर्मिती करण्यात येते. आज महाराष्ट्रभर जेजेआयटीचा याबाबतीत बोलबाला आहे. बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेनेही अशीच अडीअडचणीच्या काळातील मदतनीस अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. २००० मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेने ‘हातात हात गरजूला साथ’ हे आपले ब्रीदवाक्य सत्यात उतरविले आहे.
 
आनंदाश्रम (वृध्दाश्रम) सुध्दा असाच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतारवयातील भरवशाचे आणि सुरक्षित निवास ठरते आहे. या वृध्दांमध्ये जीवनाविषयीची सकारात्मकता जोपासण्यासाठी राबविले जाणारे विविध उपक्रम लक्षणीय असतात. गतिमंद मुलांसाठी ‘आश्रय-माझे घर’, कर्ण व मूकबधिरांसाठी त्यानुसार शिक्षण, हस्तकला प्रशिक्षण या माध्यमातून या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठानव्दारे करण्यात येणारे प्रयत्न या घटकांमध्ये विश्वास निर्माण करणारे ठरते.
 
‘समतोल’ प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर भरकटलेल्या सुमारे २५ राज्यातील २०० हून अधिक ठिकाणच्या २ हजार मुलांना त्यांच्या घरी पालकांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. तसेच सेवावस्ती विभागही संस्कारवर्गासोबतच या परिसरातील गरजू महिलांना काम मिळवून देण्यात यशस्वी ठरला आहे. विशेषत: कोरोना काळात या विभागाने मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती करून लक्षणीय आर्थिक उलाढाल केली होती. त्यातून अनेक कुटुंबांना हातभार लावता आला.
 
केवळ शिक्षण घेवूनच भागणारे नसल्याचे लक्षात घेत कौशल्यविकास शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची प्रतिष्ठानने व्यवस्था केली असून जळगावच्या ‘कबचौ उमवि’शी हा अभ्यासक्रम संलग्न आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना विविध क्षेत्रात नोकरीची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे ‘चाईल्ड लाईन-१०९८’ या उपक्रमांतर्गत २ वर्षांपासून काम सुरु आहे. याद्वारे बालविवाह रोखण्यात प्रतिष्ठानला लक्षणीय यश मिळाले आहे. कुठेही असा प्रकार आढळल्यास हेल्पलाईनवर त्वरित माहिती दिली जाते, इतका समाजाचा विश्‍वास या सहकार्‍यांनी मिळविला आहे.
 
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठान पाठ्यपुस्तक सहयोग योजना राबविते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिष्ठानने ‘जलसंधारण योजना’ राबवून हा परिसर जलयुक्त केला आहे. प्रदीर्घ काळ खंड पडलेल्या ‘कुस्ती’च्या दंगलीला प्रतिष्ठानने पुनरूज्जीवन देवून ही परंपरा पुन्हा सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या बंधनांमुळे ती पुन्हा खंडित झाली.
 
भुलाबाई महोत्सवही असाच प्रतिष्ठानची वेगळी ओळखच ठरला आहे. गणपती विसर्जनप्रसंगी शिस्तबध्द मिरवणुकीला दिला जाणारा पुरस्कार आणि आदर्श मंडळांचा होणारा सन्मान प्रतिष्ठानच्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ‘अविनाशी सेवा’ पुरस्कारसुद्धा प्रतिष्ठानचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. समाजात सेवाभावाचा वेगळा आदर्श निर्माण करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांना काही वर्षांपासून डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृत्यर्थ डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी कुठलाही प्रस्ताव अथवा अर्ज न मागविता पुरस्कार समिती संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून मूल्यमापन करते. उच्च गुणवत्तायुक्त व्यक्ती आणि संस्थेच्या पारदर्शक निवडीमुळे दरवर्षी पुरस्कार विजेत्याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
 
जळगाव शहरासह जिल्ह्यातील नाट्यरसिकांची गरज भागविण्यासाठी प्रतिष्ठानने महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह चालविण्यास घेतले आहे. विविध सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमातून या नाट्यगृहाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. नेरी नाक्याजवळील वैकुंठधाममध्ये बसविण्यात आलेल्या गॅसवरील शवदाहिनीव्दारे जळगाववासियांना अल्पदरात अंत्यसंस्काराची व्यवस्था करून देतांनाच वृक्षतोड आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच प्रकल्पांनी आपल्या सेवाभावाचा अधिकाधिक उपयोग सिद्ध केला आहे. त्यामुळे प्रतिष्ठानची प्रतिष्ठा जशी वाढली तसेच संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दलही समाजमनात सन्मानाची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचा हा सेवामय प्रवास असाच सुरू राहून प्रतिष्ठानला ‘चिरंजीवीत्व’ लाभावे, हीच शुभकामना!
 
हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी कार्यकर्त्यांची दुसरी-तिसरी पिढी सिद्ध झाली आहे. भविष्यातही त्यांना असेच असंख्य हातांचे बळ मिळो हीच परमेश्‍वरचरणी प्रार्थना!
 
दिनेश दगडकर
9922919446