भाऊ ‘निशांत’च्या ‘बोन मॅरो’ने माहीरला मिळाले जीवनदान

    दिनांक : 08-May-2022
Total Views |
आई-वडील दोघेही मायनर थॅलेसेमियाग्रस्त असल्याने या आजाराचा मेजर ग्रस्त ठरलेल्या माहीर शकील तडवीला लहान भावाने दिलेल्या ‘बोन मॅरो’चे ऑपरेशन यशस्वी झाल्याने त्याला जणू जीवनदान मिळाले. सर्वार्थाने स्वस्थ असलेला माहीर रविवार, ८ मे रोजी आपला आठवा वाढदिवस साजरा करतोय. विशेष म्हणजे रक्तदान चळवळीला गतीशील करणारा जागतिक रेडक्रॉस दिन सुध्दा आज आहे.
 
 

chotu 4
 
 
 
 
या संदर्भात वाघनगर नवजीवन कॉलनीतील रहिवासी माहीरच्या आई तबस्सुम यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले की, मी आणि माझे पती शकील हे दोघेही मायनर थॅलेसेमियाग्रस्त आहोत. त्यामुळे माहीरचा जन्म झाल्यावर त्याला सुद्धा हा विकार जडला. परंतु आम्हाला या आजाराची काहीच माहिती नव्हती. तो साडेतीन महिन्याचा असतांना खूप आजारी झाल्याने त्याला चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्या रक्ताचे नमुने मुंबईवरून टेस्ट करून आणल्यानंतर या विकाराची कल्पना आली. त्यानंतर दरमहा रक्त बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी गृहिणी तर शकील हे यावल तालुक्यात नायगाव येथे शिक्षक आहेत.
 
डॉ.सई नेमाडे यांचे मार्गदर्शन
 
या संदर्भात थॅलेसेमियामुक्त समाजासाठी विविध शिबिरे आणि चर्चासत्राच्या माध्यमातून ‘कोसला फाउंडेशन’व्दारे जनजागरण करणार्‍या या फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.सई नेमाडे यांचे खूप सहकार्य लाभले. आमची मानसिक तयारी करतांना ज्या महागड्या टेस्ट मुंबईला कराव्या लागणार होत्या त्या त्यांनी मोफत करून दिल्या. त्यामुळे खूप दिलासा मिळाला. आम्ही पुणे, मुंबई, नाशिक येथे डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र त्यांच्या मते अशी मुले अल्पवयीन असतात आणि ती फार काळ जगत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हिंमत खचत होती. मात्र डॉ.सई नेमाडे मदतीसाठी ठाम होत्या. ‘बोन मॅरो’ ट्रान्सप्लांट हाच एकमेव उपाय असल्याचे सर्व म्हणत. तो सुद्धा मॅच व्हायला हवा, आणि तो भावाचा किंवा बहिणीचाच मॅच होऊ शकतो, असे कळले. त्यामुळे आम्ही दुसर्‍या बाळाचा निर्णय घेतला.
 
 
 
 c2
 
 
निर्णय ठरला योग्य
 
हा बाळाचा गर्भ ३ महिन्याचा असतांना मुंबईला टेस्ट केली असता ती नॉर्मल आल्याने आम्ही दुसर्‍या बाळाला जन्म देण्याचे ठरविले आणि ‘निशांत’चा जन्म झाला. या बाळाचा जन्म हा माहीरला जीवनदान देण्यासाठी झाला होता. आमच्या आयुष्यातील अनिश्‍चिततेची काळी रात्रही संपणार होती. हे बाळ सहा महिन्याचे असताना त्याची एच.एल.ए. टेस्ट केली. तो रिपोर्ट तीन महिन्यांनी आला. ते १०० टक्के मॅच होत होते. या बाळाचा ‘बोन मॅरो’ मॅच झाल्याने आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी एक महिना मुंबईला रहावे लागणार होते. यात शारीरिक आणि मानसिक दगदगही होती. दोन्ही मुलांचे आरोग्यही सांभाळायचे होते. म्हणून आम्ही दीड वर्षांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेवून अहमदाबादला २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी हे ‘बोन-मॅरो’ ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वी झाले. सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्चाचे ऑपरेशन संकल्प फाउंडेशनमुळे १० लाखात झाले. या फाउंडेशनचे शिवाल गांधी आणि कृती जोशी या कार्यकर्त्यांनी आमची मानसिक तयारी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
 
माहीर आणि निशांतही आहेत स्वस्थ
 
‘बोन-मॅरो’ ट्रान्सप्लांट ऑपरेशननंतर माहीर आता अगदी स्वस्थ आहे. या सर्व प्रक्रियेत त्यालाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. मात्र त्याने हिंमत खचू दिली नाही. ऑपरेशनला आता ५ महिने झाले आहेत. या काळात त्याला एकदाही रक्ताची गरज पडली नाही. छोटा निशांत आता ३ वर्षांचा आहे. या अत्यंत अडचणीच्या काळात आमचे सर्व कुटुंबीय आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानेच आम्ही ही धडपड करू शकलो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
 
खचून न जाता उपचार करा
 
आपल्या जिल्ह्यात अनेक कुटुंबात ही समस्या आहे. मात्र त्यामुळे खचून न जाता डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घ्या, उपचार नियमित करा आणि आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळा म्हणजे यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी विवाहापूर्वी थॅलेसेमियाची रक्तचाचणी करून घेतल्यास भविष्यात होऊ शकणारा हा आजार वेळीच थांबवता येईल, असेही तबस्सुम तडवी यांनी सांगितले.