आता गुवाहाटीही ‘हात’चे गेले!

    दिनांक : 05-May-2022
Total Views |

गुवाहाटी महानगरपालिकेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, काँग्रेसचा सुपडा साफ होणे आणि आम आदमी पक्षाचा (आप) चंचुप्रवेश होणे! विधानसभेत काँग्रेसचे २९ आमदार आहेत; मात्र गुवाहाटीत एकही जागा त्या पक्षाला जिंकता आलेली नाही.
 

guvahati 1 
 
 
 
काँग्रेसमध्ये आपल्या भवितव्याविषयी चिंतनाचे वारे वाहू लागावेत आणि त्याचवेळी गुवाहाटी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही, हे वर्तमान जाहीर व्हावे, हा विचित्र योगायोग म्हटला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्थानिक मुद्दे असतात हे खरे; मात्र मोठ्या शहरांच्या महानगरपालिका निवडणुकांचा कौल हे काही अंशी तरी त्या राज्यातील जनमताचा कल कोणत्या दिशेने आहे, याकडे अंगुलीनिर्देश करीत असतो. तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीत द्रमुकची सत्ता आल्यांनतर चेन्नई आणि कोईम्बतूर येथे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत देखील द्रमुकने दणदणीत विजय मिळविला. तेलंगणात ‘टीआरएस’ पक्षाची सत्ता असली,तरी हैदराबाद महानगरपालिकेसाठी दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ‘टीआरएस’ला त्याअगोदरच्या तुलनेत ४३ जागांचा फटका बसला; त्याउलट भाजपने ४८ जागा जिंकत मुसंडी मारली. त्यानंतरच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजपविरोधी आघाडीच्या प्रयत्नांना लागले आणि उकड्या तांदळाच्या खरेदीवरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हा गुवाहाटी महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे.
 
गुवाहाटी महानगरपालिकेसाठी नऊ वर्षांनी निवडणूक झाली आहे. यापूर्वी ती ३१ सदस्यीय होती आणि 2013च्या निवडणुकीत काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. आता जागांची संख्या ६० झाली आहे. त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यात तीन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याने उर्वरित ५७ जागांवर मतदान झाले आणि एकूण ६० पैकी ५८ जागा या भाजप-आसाम गण परिषदेने जिंकल्या. त्यातही भाजपने ५२ आणि आसाम गण परिषदेने सहा जागांवर विजय मिळविला. आसाममध्ये नुकत्याच नगरपालिका मंडळांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यातही ९७७ पैकी ७५९ मतदारसंघांत भाजपने बाजी मारली होती. गुवाहाटीत त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली आहे, असे म्हटले पाहिजे. तेव्हा या निकालांचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहेच; पण तितकेच ठळक वैशिष्ट्य म्हणजे, काँग्रेसचा सुपडा साफ होणे आणि आम आदमी पक्षाचा (आप) चंचुप्रवेश होणे! विधानसभेत काँग्रेसचे २९ आमदार आहेत; मात्र गुवाहाटीत एकही जागा त्या पक्षाला जिंकता आलेली नाही. ईशान्य भारतातील सर्वांत मोठे शहर म्हणजे गुवाहाटी. मात्र, प्रदूषण, पावसाळ्यात येणारे पूर, पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षता या गुवाहाटीच्या समस्या आहेत आणि सर्वच पक्षांनी जरी या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, तरीही अखेरीस मतदानाचे विश्लेषण केले, तर त्यात या नागरी समस्यांबरोबरच धार्मिक समीकरणांचा पगडा दिसतो.
 
काँग्रेसला केवळ एकही जागा जिंकता आलेली नाही असेच नाही, तर बहुतांशी मतदारसंघांत काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यातही ज्या दोन जागा भाजप आघाडी जिंकू शकली नाही, त्या मतदारसंघात मुस्लीमबाहुल्य आहे आणि परंपरेने त्या जागा काँग्रेसकडे जात. तथापि, आता त्या जागाही काँग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत आणि एकावर ‘आप’ तर दुसर्‍यावर गेल्याच वर्षी स्थापन झालेल्या ‘आसाम जातीय परिषद’ या पक्षांनी विजय मिळविला आहे. मौलाना बद्रुद्दीन अजमल यांच्या ‘एआययूडीएफ’ या पक्षाची स्थापनाच मुळी निर्वासित मुस्लिमांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या इराद्याने झाली होती. मुस्लिमांच्या मतांची विभागणी होऊ नये, म्हणून काँग्रेसने या पक्षाशी हातमिळवणी यापूर्वी केली होती; मात्र दोन्ही पक्षांना आपली मते गमवावी लागली. तेव्हा काँग्रेस आणि ‘एआययूडीएफ’या पक्षांच्या पलीकडे जाऊन अल्पसंख्याक नव्या पक्षांना कौल देत आहेत. दिल्लीपाठोपाठ पंजाब राज्यही काबीज केल्याने ‘आप’ने अन्य राज्यांत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. गोव्यात ‘आप’ने नशीब आजमावले आणि आसाममध्येही ‘आप’ने प्रवेश केला आहे. अप्पर आसाममध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत तिनसुखिया आणि धेबाजी येथे आपने दोन जागा जिंकल्या होत्या. तेव्हा गुवाहाटीत देखील ६० पैकी ३८ जागांवर ‘आप’ने उमेदवार उभे केले होते. दिल्ली आणि पंजाबमधील यशामुळे ‘आप’चा उत्साह वाढला असणार यात शंका नाही; आणि बहुधा त्याचमुळे मतदारदेखील आपला संधी देत असावेत. ‘आसाम जातीय परिषद’ हा तुलनेने नवीन पक्ष. पण, काँग्रेससारख्या जुन्या पक्षाकडे असलेली मतपेढी या पक्षाने खेचून घेतली. पण, या सगळ्या घडामोडीत काँग्रेसला मात्र चिंताजनक अवस्थेत नेऊन उभे केले आहे, यात शंका नाही आणि याचे कारण हे काँग्रेसकडे नेतृत्वाचा, संघटनात्मक ताकदीचा आणि धोरणांच्या स्पष्टतेचा असलेला अभाव!
 
देशभर जेथे काँग्रेस एकेकाळी प्रबळ होती, त्या राज्यांत काँग्रेसची रया कायमची गेली आहे, असेच चित्र आहे. मग तो उत्तर प्रदेश असो किंवा पश्चिम बंगाल. विरोधी पक्ष म्हणून देखील इभ्रत राहणार नाही, अशी काँग्रेसची केविलवाणी स्थिती अनेक राज्यांत झाली आहे. आसामची त्यात भर पडली आहे. वास्तविक तरुण गोगोई यांच्यासारख्या नेत्याने आसाममध्ये काँग्रेसला सावरले होते. मात्र, त्यानंतर वेळीच उगवत्या नेतृत्वाकडे काँग्रेस श्रेष्टींनीं लक्ष दिले नाही आणि परिणामतः काँग्रेसमधून हिमंता बिस्वा सर्मा बाहेर पडले आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर भाजपने आसाममध्ये नेतृत्व आणि संघटन यांच्या आधारावर सलग निवडणुका जिंकल्या आहेत आणि काँग्रेसची मात्र सातत्याने घसरण सुरू आहे. त्या पक्षाची जागा अन्य पक्ष घेऊ लागले आहेत. याचाच अर्थ काँग्रेसविषयी मतदारांमध्ये कमालीचा भ्रमनिरास आहे. तसे असल्याखेरीज मतदार पर्याय शोधत नाहीत. गेल्या वर्षी गुजरातच्या सुरत महानगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नव्हती; उलटपक्षी ‘आप’ने 27 जागा जिंकता आलेल्या होत्या. पंजाबात तर ‘आप’ने सत्ता मिळवत काँग्रेसला घरी बसवले! तेव्हा त्या त्या राज्यातील पक्ष नसूनही ‘आप’ काँग्रेसची पोकळी भरून काढतो आहे, याचे चिंतन काँग्रेसने करणे गरजेचे.
 
काँग्रेसकडे एका बाजूने मतदार पाठ फिरवत आहेत आणि दुसरीकडे पक्षाला गळती लागली आहे. सर्मा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरदेखील काँग्रेसने गळती थांबविण्यासाठी काहीही केलेले नाही. परिणामतः ही गळती सुरूच आहे. गटबाजीनेही काँग्रेसला पोखरले आहे. काँग्रेसचे तत्कालीन राज्यसभा खासदार कुजूर यांनी २०१९ साली भाजपमध्ये प्रवेश केला. सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गौतम रॉय यांनीही त्याच वर्षी भाजपला जवळ केले. आसाममधून राज्यसभेच्या दोन जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या आणि दोन्ही ठिकाणी भाजप आघाडीने बाजी मारत राज्यसभेत भाजपचे बलाबल १०० पर्यंत नेण्यास हातभार लावला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रिपन बोरा हे या निवडणुकीत उमेदवार होते आणि त्यांना ‘एआययूडीएफ’ पक्षाचा पाठिंबाही होता. पण, काँग्रेसची मते फुटली आणि ती किमान नऊ ते दहा असावीत, असा अंदाज खुद्द मुख्यमंत्री सर्मा यांनीच व्यक्त केला आहे. पराभूत झालेले बोरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांची नियुक्ती तृणमूलचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या सुश्मिता देव यांनीही यापूर्वी काँग्रेसमधून तृणमूलच्या तंबूत प्रवेश केलेलाच आहे.
 
देशभरच काँग्रेसचा जनाधार आक्रसत असताना आसाम त्यास अपवाद नाही. आसाममध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेसची भिस्त ही ‘अली (मुस्लीम मतपेढी), कुली (चहाच्या मळ्यांमधील कामगार) आणि बंगाली’ यांवर होती. तथापि आता हा मतदारवर्ग अन्य पक्षांकडे वळला आहे. बंगाली आणि चहाच्या मळ्यांवरील कामगार अशी मतपेढी भाजपकडे वळली आहे आणि मुस्लीम काँग्रेस आणि ‘एआययूडीएफ’ ऐवजी ‘आप’ आणि ‘आसाम जातीय परिषदे’ला पसंती देत आहेत. हाच क्रम चालू राहिला, तर आसाममध्ये देखील काँग्रेसचे स्थान नगण्य ठरेल. आसाममध्ये भाजपची सत्तेवरील मांड पक्की झाली आहे, हा जसा गुवाहाटीच्या निकालांचा अन्वयार्थ आहे, तद्वत काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे हाही आहे!
- राहूल गोखले