हिंदूंना जाचणार्‍या प्रतिकांचे काय?

    दिनांक : 04-May-2022
Total Views |

मशिदीचे नाव ज्ञानवापी कसे, नंदीचे तोंड मंदिराकडे नव्हे, तर मशिदीकडे कसे? ही हिंदूंना जाचणारी प्रतीकेच नव्हे, तर काय आहेत? मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर आणि शाही ईदगाह मशिदीचा मुद्दाही असाच आहे. अनेक ऐतिहासिक पुराव्यांतून इथली मशीद मंदिर उद्ध्वस्त करून बांधल्याचे समोर आलेले आहे. हिंदूंनी त्या प्रतीकांचे जाच किती दिवस सहन करायचा?
 
 
hindu
 
 
 
बुलडोझर मुस्लिमांविरोधातील सरकारी दहशतीचे प्रतीक झाले असून, भाजपची सरकारे मुस्लिमांना बुलडोझरच्या माध्यमातून घाबरवण्याचे काम करत असल्याचा आरोप पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीप्रमुख मेहबुबा मुफ्तींनी केला. मात्र, बुलडोझरने होणार्‍या कारवाईचे लक्ष्य मुस्लीम नसून दंगल घडवणारे, हिंसाचार माजवणारे समाजद्रोही आहेत. आता तशी कामे करणार्‍यांत मुस्लिमांचाच भरणा असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर त्याचा दोष सरकार वा सरकारी यंत्रणांच्या माथी मारण्याचे काम कसे करता येईल? मेहबुबा मुफ्तींना आपल्या धर्मबांधवांची इतकीच फिकीर वाटत असेल, त्यांची घरेदारे जमीनदोस्त होऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी तथाकथित शांतिदुतांना खरोखरीच्या शांततेचा पाठ पढवावा, कायद्याच्या राज्याचे, न्यायव्यवस्थेचे, राज्यघटनेचे, लोकशाहीचे महत्त्व पटवून द्यावे.
 
उठसुट छोट्या-मोठ्या कारणावरून दंगलीसाठी उतावीळ होणार्‍या, हिंदूंच्या सणोत्सवांना-मिरवणुकांना विरोध करणार्‍या इस्लामी कट्टरपंथीयांच्या १४०० वर्षांपूर्वीच्या टोळीवाल्यांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. पण, त्या तसे करत नाहीत, त्यांना तसे करावेसे वाटत नाही. उलट त्यांच्या बोलण्याचा अर्थ, धर्मांध मुस्लिमांना हिंदूघातकी, राष्ट्रघातकी गतिविधी करू द्याव्या, त्यात कोणीही अडथळा आणू नये, असाच होतो. पण, मेहबुबा मुफ्तींची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. कारण, आता इस्लामी कट्टरपंथीयांनी वाट्टेल ते करुनही दाढी कुरवाळणार्‍यांचा काळ राहिलेला नाही. तर जो जो दंगल, हिंसाचार माजवेल, त्याला कायद्याच्या चौकटीत राहून आयुष्यभराची अद्दल घडवणारे सत्तेवर आहेत. इथे काल बुलडोझर चालला, आज चालतोय, उद्याही चालेलच अन् दंगलखोरांची, हिंसाचार्‍यांची खाज मिटवल्याशिवाय तो थांबणार नाहीच.
 
मेहबुबा मुफ्तींनी बुलडोझरला मुस्लिमांविरोधातील सरकारी दहशतीचे प्रतीकही म्हटले. पण, संबंधितांनी केलेल्या कुकृत्यांविरोधातील कारवाईसाठी वापरल्या जाणार्‍या बुलडोझरला मेहबुबा मुफ्ती मुस्लिमांविरोधातील सरकारी दहशतीचे प्रतीक मानत असतील, तर अशी अनेक प्रतीके आहेत, ज्यांचा त्रास शेकडो वर्षांपासून हिंदूंना होत आहे. त्या प्रतीकांचे काय? त्यांना मिरवणे कधी थांबवले जाणार? विशेष म्हणजे, या प्रतीकांची उभारणी हिंदूंनी केलेल्या दंगली वा हिंसाचार वा इतर कुठल्याही गुन्ह्याच्या शिक्षेखातर झालेली नाही, तर त्यांचे बांधकाम हिंदू असल्याने हिंदूंच्या मंदिरांना तोडून, इतिहासाला मिटवून व हिंदूंना तुच्छ लेखण्यासाठीच झालेली आहे. त्यातले पहिले प्रतीक असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीस्थळी बांधलेल्या बाबरी ढाँचाचा मेहबुबा मुफ्तींसह तमाम धर्मांध मुस्लिमांना मोठा अभिमान वाटत असे.
 
दि. ६ डिसेंबर, १९९२ रोजी हिंदुत्वाच्या शंखनादात लाखो कारसेवकांनी त्या पारतंत्र्याच्या प्रतीकाची धुळधाण केली. आता तिथे भव्य श्रीराम मंदिराची निर्मितीही होत आहे. पण, अजूनही इस्लामी कट्टरपंथीय आणि मेहबुबा मुफ्तींसारख्यांना बाबरी ढाँचाची स्वप्ने पडत असतात. पण, यातून आपण हिंदूंचा स्वाभिमान दुखावत असल्याचे, त्यांना कधी वाटत नाही. काशिविश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीबाबतही हाच प्रकार झालेला आहे. मशिदीचे नाव ज्ञानवापी कसे, नंदीचे तोंड मंदिराकडे नव्हे, तर मशिदीकडे कसे? ही हिंदूंना जाचणारी प्रतीकेच नव्हे, तर काय आहेत? मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर आणि शाही ईदगाह मशिदीचा मुद्दाही असाच आहे. अनेक ऐतिहासिक पुराव्यांतून इथली मशिद मंदिर उद्ध्वस्त करून बांधल्याचे समोर आलेले आहे. हिंदूंनी त्या प्रतीकांचे जाच किती दिवस सहन करायचा?
 
याव्यतिरिक्त गुजरातच्या पाटणमधील सिद्धपूरच्या रुद्र महालय मंदिराचे जामी मशिदीत केलेले रुपांतरही हिंदूंसाठी वेदनादायकच. १२व्या शतकात सिद्धराज जयसिंह यांनी रुद्र महालयाची निर्मिती केली होती, पण अल्लाउद्दीन खिलजीने त्याची मोडतोड करून तिथे मशिदीची रचना केली. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील भोजशालेचे रुपांतर कमल मौला मशिदीत केलेले आहे, तर पश्चिम बंगालमधील आदिना मशिदीचे बांधकाम आदिनाथ मंदिरातून केलेले आहे. अहमदाबादमधील जामा मशीदही भद्रकाली मंदिराचा विध्वंस करून बांधलेली आहे. मध्य प्रदेशच्या विदिशातील विजय मंदिरही बिजमंडल मशिदीत रुपांतरित केलेले आहे. ती हिंदूंचा मानभंग व्हावा, हिंदूंमध्ये धर्मांध मुस्लिमांची दहशत बसावी म्हणून तयार केलेली प्रतीकेच आहेत. अशीच प्रतीके मेहबुबा मुफ्तींचे गृहराज्य जम्मू-काश्मीरातही आहेत. पण, या हिंदूविरोधी प्रतिकांना पुन्हा मूळ रुप द्यावे, अशी मागणी कधी मेहबुबा मुफ्तींनी केल्याचे दिसले नाही. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतील समाधीखाली खरोखर काय आहे, हे पाहण्यासाठी उत्खनन करण्याचे तारे तोडणारे महाभाग होते. मुद्दा हिंदूंचा असल्याने त्याला पुरोगामी, धर्मनिरपेक्षवाद्यांचा जोरदार पाठिंबा होता. पण, त्याच्याउलट केले तर?
 
ताजमहाल तेजोमहालय असल्याचा दावा सातत्याने केला जातो. त्यासाठी ताजमहालातील तळघरे बंद असल्याचे व ते उघडल्यास, उत्खनन केल्यास मंदिराचे दर्शन होईल, असेही म्हटले जाते. पण, त्यावर इस्लामी कट्टरपंथीयांबरोबर एकजात सारेच पुरोगामी, धर्मनिरपेक्षवादीही तुटून पडतात. आता ध्रुवस्तंभ-कुतुब मिनार आणि त्याभोवतीच्या २७ हिंदू-जैन मंदिरांचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. पण, ताजमहाल, कुतुबमिनार परिसराचेही उत्खनन व्हावे आणि धर्मांध मुस्लीम आक्रमकांनी उभारलेली हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी प्रतीके नष्ट व्हावीत, असे मेहबुबा मुफ्तीसारख्यांच्या टोळक्याला वाटत नाही. त्यांना दिसते ते दंगलखोर, हिंसाचार्‍यांवर कारवाई करणारे बुलडोझर. पण, कोणी कितीही चेवचेव केली तरी बुलडोझर दंगल पसरवणार्‍या, हिंसाचार माजवणार्‍यांविरोधातील कारवाईचे प्रतीक म्हणून कायम राहीलच.
 
महाराष्ट्रात तर धर्मांध मुस्लिमांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांना बाटवण्याचा आणि तिथे आपली धार्मिक ओळख सांगणारी प्रतीके बांधण्याचा उद्योग केलेला आहे. वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर मुस्लीम पीर-फकिरांचे थडगे, मजारी, दर्गे बांधायचे, तिथे उरुस भरवायचे आणि नंतर त्याचे मशिदीत रुपांतर करायचे, असा हा हिंदूंना डाचणार्‍या प्रतीक उभारणीचा प्रकार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी तर शिवछत्रपतींच्या हिंदू साम्राज्यावर चाल करून आलेल्या अफझलखानाचे भलेमोठे थडगे बांधलेले आहे, तिथे उरुसही भरवला जातो. अशाप्रकारे परकीय आक्रमकांच्या उदात्तीकरणाचे, गड-किल्ल्यांच्या विद्रुपीकरणाचे, इस्लामीकरणाचे कारस्थान हिंदूंच्या माथी मारले जात आहे.
 
गोव्यातदेखील सेंट झेवियर्सपासून हिंदूंवर अत्याचार करणार्‍या अनेक परकीय आक्रमकांची प्रतीके उभारलेली आहेत. हिंदू सहिष्णू असल्याने त्याने आतापर्यंत या गोष्टी सहन केल्या. आज एका बुलडोझरने दंगलखोर, हिंसाचार्‍यांच्या आणि त्यात समावेश असलेल्या मुस्लिमांच्या घरादारांना जमीनदोस्त केले, तर मेहबुबा मुफ्तींना त्रास व्हायला लागला. पण, भारतभरातील मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी वा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना गराडा घालत चाललेल्या थडगे, मजारी, दर्ग्यांचा हिंदूंना किती त्रास होत असेल? त्यामुळे इस्लामी कट्टरपंथीय वा हिंदूविरोधी प्रतीके उभारणार्‍यांनी आणि त्याचे समर्थन करणार्‍यांनी हिंदूंच्या सहिष्णूतेचा अंत पाहू नये.