सद्यःस्थितीत सावरकर विचारांची गरज

    दिनांक : 28-May-2022
Total Views |
सद्यःस्थितीत सावरकर विचारांची गरज आहे की नाही, ही संभ्रमावस्था नाहीच, खात्रीच आहे की, सद्यःस्थितीत देशाला सावरकर विचारांचीच गरज आहे. कशी आहे सद्यपरिस्थिती? आज सावरकर जयंतीनिमित्त थोडक्यात पाहू...
 

 
VeerSavarkar
 
 
 
आपला देश हिंदुस्थान आहे, पण स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हते, तेवढे हिंदूंचे अस्तित्व आज धोक्यात आहे. ‘निधर्मीवाद’ किंवा ‘सर्वधर्मसमभाव’ या गोंडस नावाखाली कित्येक वर्षं अल्पसंख्याक मुस्लिमांच्या अवाजवी मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. आज हिंदूहित जोपासणार्‍या पक्षाच्या हातात सत्ता आहे, पण त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी राजकीय धोरण, परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, औद्योगिक धोरण, शेतीविषयक धोरण यांची आखणी करून कार्यान्वित केले जात आहे. संरक्षण विषयक धोरणालाही प्राधान्य दिले जात आहे. या सगळ्या धोरणांच्या अंमलबजावणीबरोबरच दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकायची आहेत. आसामचा ईशान्येकडील राज्यांचा, बांगलादेश घुसखोरीचा, पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न यशस्वीपणे सोडवायचा आहे. हिंदुत्व मनामनात रुजवायचे आहे. सैन्याचे सबलीकरण करून शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अद्ययावत बनायचे आहे. भारताला ‘महासत्ता’ बनायचे आहे. हे सगळे मुस्लीम आणि ख्रिश्चनांच्या धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देत करायचे आहे. या सगळ्या मुद्द्यांवर एकमेव रामबाण इलाज म्हणजे स्वा. सावरकरांनी दिलेले विचारधन जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक अमलात आणायचे. त्या विचारांचे चिंतन, मनन करून कृतिशील योगदान द्यायचे. जसे, विशिष्ट रोगावर, विशिष्ट औषधाचीच योजना करावी लागते. डोकं दुखत असेल, तर पोटदुखी थांबण्याचे औषध घेऊन चालत नाही. सर्पदंशावर उपाय करताना सापाचे विष नष्ट करणारे औषधच दिले पाहिजे. तसे आज भारताला ज्या आव्हानांना सामोरे जायचंय, ज्या संकटांना तोंड द्यायचंय, त्याचे निवारण करण्यासाठी स्वा.सावरकरांच्या विचारांचीच अत्यंत गरज आहे. काय होता सावरकरांचा विचार? एका वाक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की, जे जे राष्ट्रहितार्थ ते ते जोपासायचे आणि जे जे राष्ट्रहितास घातक, राष्ट्राच्या प्रगतीस बाधक ते ते त्याज्य! वैयक्तिक जीवनात सावरकरांनी स्वार्थाला कधीच स्थान दिले नाही. पण, राष्ट्राच्या बाबतीत मात्र राष्ट्रीय स्वार्थालाच प्राधान्य दिले. ज्या राष्ट्राशी मैत्री केल्यावर आपल्या देशाचा लाभ होणार, त्याच राष्ट्राशी सख्य जोडायचे.आपल्या प्रगतीच्या आड जो येईल तो शत्रू! हीच त्यांची स्वच्छ, स्पष्ट आणि सुलभ अशी नीती होती.
 
राष्ट्रहितापलीकडे कोणताच विचार नाही. योग्य-अयोग्य ठरवण्याची कसोटी एकच... राष्ट्रहित? मग तिथे कुणाच्या भावना, हितसंबंध जोपासणे नाही की, मतपेट्यांचा विचार नाही. सद्य परिस्थितीत आपल्या सगळ्यांचाच ‘अर्जुन’ झालाय. अशा वेळेस योग्य मार्ग दाखवणार्‍या श्रीकृष्णाची गरज आहे. स्वा. सावरकरांचे विचारच श्रीकृष्णाची भूमिका निभावणार आहेत. स्वा. सावरकरांनी कशाकशाचा विचार केला? १) सावरकरांच्या मते, ‘हिंदुत्व’ हा भारताचा आत्मा आणि तेच त्याचे वेदकाळापासून आजपर्यंत टिकून राहिलेले स्वत्व? याच स्वत्वाचा विचार त्यांनी केला. २) ‘राष्ट्र’ ही काल-आज आणि उद्याही प्रभावी प्रेरणा राहणार असल्यामुळे त्यांनी ‘हिंदू राष्ट्रवादाचा विचार केला. ३) राष्ट्राच्या या मूलभूत विचारांबरोबरच राष्ट्रभाषा, राष्ट्रलिपी, राष्ट्रध्वज या राष्ट्राच्या विविध अंगांचा विचार केला. ४) हे राष्ट्र जागतिक संघर्षात मानाने जगावयास हवे असेल, तर ते विज्ञाननिष्ठ व अद्ययावत पाहिजे, म्हणून विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला. ५) अस्पृश्यता, विटाळ या कल्पनांचा उच्छेद झाल्याशिवाय राष्ट्र संघटित होणार नाही म्हणून जात्युच्छेदनाचा विचार मांडला. ६) सत्य-अहिंसा यांच्या अविवेकी व विपर्यस्त कल्पनांनी हिंदुस्थानची अपरिमित हाती आली असल्यामुळे सत्य, हिंसा-अहिंसा यांच्या सूक्ष्म विचार करून इतिहासातील चुकांचे परीक्षण करून, मर्मस्थाने-बलस्थाने स्पष्ट करण्यासाठी इतिहास लिहिला. त्यातूनच काही त्रिकालाबाधित तत्वे सांगतिली. जसे- जशास तसे, शठास प्रतिशाठ्यम्, सद्गुण विकृती. ७) स्वभाषाभिमान हा राष्ट्रभावनेचा महत्त्वाचा घटक म्हणून भाषाशुद्धीचे विचार मांडले. या सगळ्यातून राष्ट्र सबलीकरणाचा मार्ग सांगितला. म्हणूनच आज या विचारांची आपल्याला सार्वाधिक गरज आहे.
 
सावरकरांचं वैशिष्ट्य हे आहे की, ते केवळ विचार करून वा मांडून थांबले नाहीत, तर त्या विचारांच्या अनुरोधाने समाजपरिवर्तन करण्याकरिता लोकप्रियता तुच्छ मानून सेनापती म्हणून आणि सैनिक म्हणूनही जिवापाड झटले. तलवारीने लिहिले आणि दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन लढले. त्यांच्या विचारांत, आचारांत, उच्चारांत कुठेही विसंगती दिसत नाही. म्हणूनच स्वा. सावरकरांना हिंदुस्थानच्या एका श्रेष्ठ निर्मात्याला समग्रपणे, सम्यकपणे समजून घेणे आवश्यक आहे. आंधळा जयजयकार किंवा कुत्सित उपेक्षा किंवा पूर्वग्रहजन्य राग या गोष्टींना थारा न देता हे समजणे अपेक्षित आहे. आज दहशतवाद सामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त करतोय, हाती सापडलेल्या दहशतवाद्यांना शिक्षा सुनावण्यासाठी वर्षानुवर्ष खटले चालवले जातात, मदरशांसाठी करोडो रुपयांचे अनुदान घोषित केले जाते, हज यात्रेसाठी सवलती दिल्या जातात..... आणि आमच्या अमरनाथ यात्रेकरुंवर मात्र दहशतवादी हल्ले होतात...तेव्हा सावरकरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांची आठवण होते. पाकव्याप्त काश्मीर प्रश्नाचेही असेच. खरंतर दि. २६ ऑक्टाबर, १९४७ रोजी महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरचं भारतात विलिनीकरण करणार्‍या तहनाम्यावर सही केली, तेव्हाच काश्मीर भारताचा एक भाग बनले. फेब्रुवारी १९५६ मध्ये जम्मू -काश्मीर संविधान सभेने या विलिनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब केले, तेव्हा ते विलिनीकरण वज्रलेप बनलं. मग आता पाकिस्तानचा जम्मू-काश्मीरशी संबंधच काय?
 
पण, आजची परिस्थिती अशी आहे की, जम्मू-काश्मीर राज्याच्या एकूण २,२२,२३६ चौ.किमी क्षेत्रफळापैकी ७८,११४ चौ.किमी पाकिस्तानने बेकायदेशीर बळकावलेला आहे. ५,१८० चौ.किमी पाकिस्ताने परस्पर चीनला देऊन टाकला आहे आणि ३७,५५५ चौ.किमी चीनने बळकावला आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त भूभाग शत्रू देशांनीच बळकावलेला आहे. तरीही अद्याप शत्रूराष्ट्रांची भूमी गिळंकृत करण्याची भूक शमलेली नाही. सतत आपल्या सीमा अशांत आहेत. अजून किती अधिकारी आणि जवानांचे यात बळी जाणार? आसाम प्रश्नाचेही असेच! बाहेरून येऊन आसाममध्ये घुसणार्‍या मुसलमानांना प्रतिबंध घातला नाही, तर सिंध आणि बंगालसारखीच आसामची गत होईल, असा इशारा १९४० मध्येच आसामी हिंदूंना सावरकरांनी दिला होता. अगदी, १९४७ मध्ये आसाम पाकिस्तानला जोडला जाण्याचीच पाळी आली होती. पण, सुर्दैवाने त्यावेळेस आसाम पाकिस्तानच्या तावडीतून बचावला. पण, आजही आसाम पूर्णपणे सुरक्षित आहे, असे आपण ठामपणे म्हणूच शकत नाही. बरं, या घुसखोरांना आधारकार्ड, मतदार कार्ड ही मिळतं? आज या विरोधात सरकारने पावले उचलली, तर विरोधकांना पोटशूळ होतोय! आपल्या द्रष्टेपणातून स्वा. सावरकरांनी चीन विषयीसुद्धा सावधानतेच्या सूचना दिल्या होत्या. पण, तत्कालीन पंतप्रधानांनी त्या धुडकावून लावल्या. ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत ‘पंचशील करारा’वर डोळे झाकून विश्वास ठेवून बसले अन् मग युद्धाला सामोरं जावं लागलं. तेव्हा सैनिकी आणि शस्त्रास्त्र सामर्थ्य कमी पडलं. चीनच्या सुसज्ज, अद्ययावत सैन्यबळापुढे माघार घ्यावी लागली.
 
परंतु, आज आमचे पंतप्रधान सावरकरीय सूचनांची अंमलबजावणी करतायेत. शी जिनपिंग यांच्याशी ब्राझीलमध्ये भेट आणि चर्चा सुरू होती. पण, सीमेवर सैन्यही जागरूक होते, शस्त्रसज्ज होते. त्यामुळे इकडे चर्चा सुरू असतानाच तिकडे आमच्या सैन्याने चिनी सैन्याला पळता भुई थोडी केली. आज आमचे प्रयत्न शांततामय मार्गाचे असले तरी सैन्य गाफील नाही, शस्त्रबळाकडे दुर्लक्ष नाही. हीच सावरकरांची रणनीती, हाच सावरकरांचा कृतिशील विचार! नेपाळच्या बाबतीतही भारताने आता नवी पावले उचलली आहेत. ही पावले स्वा. सावरकरांच्या विचारसरणीला आणि नीतिमत्तेला अनुसरूनच आचरली जात आहेत. कारण, चीन नेपाळवर नजर ठेवून आहे. चीनची नेपाळमधली आर्थिक व व्यापारी गुंतवणूक वाढते आहे. चीन सतत कुठून तरी घुरखोरी करणे आणि भारतावर दडपण आणणे याच प्रयत्नात आहे. चीनच्या जैविक महायुद्धाचाही सगळ्या जगाने अनुभव घेतलाच आहे. या सगळ्या पाश्वर्र्भूमीवर स्वा. सावरकरांचे भारत-नेपाळ संबंधीविषयीचे विचार महत्त्वाचे ठरतात. सावरकरांनी सांगितले होते की, नेपाळ या एकमेव हिंदूराष्ट्राशी भारताचे कायम सख्यत्वाचेच संबंध असावयास हवे. म्हणूनच आजच्या चीनच्या नेपाळमधील कारवायांकडे भारताने दुर्लक्ष करून चालणार नाही. नेपाळला चीनपेक्षा भारत अधिक जवळचा आणि विश्वसनीय वाटावा यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावयास हवे. आपल्या पंतप्रधानांनी त्यादृष्टीने पावले उचलली आहेत, हे महत्त्वाचे!
 
नागालॅण्डमधल्या हिंसाचाराच्या घटना पाहिल्या की, सावरकरांच्या ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ या इशार्‍याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज जेव्हा भारत-इस्रायल संबंध नव्याने उभे केले जातात, तेव्हाही स्वा. सावरकरांचीच आठवण येते. त्यांनी १९५६ मध्येच सांगितले होते की, ‘भारत-पाक युद्ध झालेच, तर सगळी मुस्लीम राष्ट्रे पाकिस्तानच्या बाजूने जातील. फक्त पाकिस्तानचा शत्रू असलेला इस्रायल भारताच्या बाजूने उभा राहील. आज इस्रायल आपल्याला आधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे पुरवित आहेच. अणुशक्तीच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त असणार्‍या युरेनियमचा साठा असलेला देश कॅनडा! कॅनडाला भेट देणारे आमचे पंतप्रधान दूरदर्शीच ठरतात. पंतप्रधानांचा परदेश दौरा हा मौजमजेचा, हवापालट नसतोच, तर एक-एक सावरकरीय विचार कृतीत आणणारा असतो. जेव्हा आमच्या सैनिकांनी म्यानमारमध्ये घुसून १०० च्यावर अतिरेक्यांचा खात्मा केला, तेव्हाही आम्हाला स्वा. सावरकरच आठवले. विदेशी हद्दीत घुसून भारतीय लष्कराने अशा प्रकारची कारवाई करण्याची ही अतिशय धाडसी मोहीम! ‘प्रसंगी शत्रूच्या हद्दीत घुसून हल्ला करणं हाच विजयाचा मार्ग ठरतो’ या सावरकरीय विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे उरी सर्जिकल स्ट्राईक’ म्हणूनच महत्त्वाचे ठरते. त्याचा परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवलाच आहे. आज समाजातील बुद्धिजीवी विचारवंतांनी, सुधारणावादी नेत्यांनी प्रबोधनाची कास धरून समाज सुधारणेचे व्रत घेऊन समाजाला विज्ञानवादी व सुशिक्षित सुसंस्कारित करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.कारकुनी करणारी, नाचगाण्यातच रमणारी तरूण पिढी सावरकरांना अभिप्रेत नाही, तर शस्त्रसज्ज तरूण अपेक्षित आहेत. वाणी आणि लेखणी हेही एक प्रकारचे शस्त्रच आहे. मात्र, या शस्त्राच्या एका टोकाला राष्ट्रभक्ती-देशभक्ती चिकटलेली असणं आवश्यक आहे.
 
अशारितीने आजवर स्वा. सावरकरांचे विचार पथदर्शक ठरत आहेत. मृत्यूनंतर ५६ वर्षांनंतरही जनमानसात, समाजात, राजकारणात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे हे व्यक्तिमत्त्व! स्वा. सावरकर कधीही मंत्री नव्हते, राष्ट्रपती नव्हते, पंतप्रधानही नव्हते. पण, देशविदेशातल्या समाजकारण, राजकारण आणि इतिहासावर आपल्या नावाचा अमीट ठसा उमटवणारे हे ऐकमेव अद्वितीय व्यक्तिमत्त्व! ‘३७० कलम’ आधी रद्द करा, असे वारंवार सांगणारे एकमेव नेते त्यांची ही सूचना कृतीत आणल्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वातावरण कसे बदलले, याचा आपण अनुभव घेतच आहोत. स्वा. सावरकर हे केवळ एक हाडामासाचं व्यक्तिमत्त्व नाही, तर तो एक विचार आहे, असा विचार की, जो राष्ट्राला युगानुयुगे प्रेरक ठरतोय. राष्ट्रभक्ती तुझे दुसरे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर!!!
 
- डॉ. शुभा साठे