रोजगाराभिमुख शिक्षण देणारी गोशाळा

    दिनांक : 28-May-2022
Total Views |

आम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे हे एकदा निश्चित झाले की ते पूर्णत्वास नेण्याची जिद्दच यशाची वाट तयार करते.

 

gosala 
 
शासकीय कर्मचारी मात्र कायम आजचे काम उद्यावर ढकलतात किंवा अंगावर पडलेले झुरळ झटकावे तसे काम झटकतात. त्यातही केंद्राच्या अखत्यारीत येणार्‍या कार्यालयातील कर्मचारी सरकारचे जावईच झाल्या सारखे वागतात हा सर्वानुभव आहे. त्यांच्या येण्याच्या, जाण्याच्या, वेतनाच्या आणि वेतनवाढीच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे त्यांना कशाचीच तमा नसते. मात्र, या कोळशाच्या खाणीत काही हिरे दडलेले असतात. त्यामुळेच त्या कोळशाच्या खाणीला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले असते. अशीच केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणात येत असलेल्या वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचीही कथा आहे. येथील 212 एकर जागेवर उभ्या असलेल्या हिंदी विश्व विद्यापीठाचा जवळपास तीन वर्षांपूर्वीपर्यंत गावाशी काहीही संबंध नव्हता. तेथील अधिकारी साधा किराणाही वर्धेतून घेत नव्हते. त्यासाठीही ते नागपुरातील मॉल गाठत होते.
 

ग्रामपंचायतचा करही या  विद्यापीठाने भरला नसल्याची ओरड होती. मात्र, दिशा बदलली की दशा बदलते असे जे काही म्हटले जाते ते हिंदी विश्वविद्यापीठाला तंतोतंत लागू होते. येथे माणूस बदलला आणि अख्ख्या विद्यापीठाच्या कारभाराची दिशाच बदलली आणि ती देखील सामान्यांसाठी होऊ लागली. या विद्यापीठावर डाव्या विचारसरणीचा पगडा घट्ट बसू लागला होता. दिल्लीतील जेएनयुची चळवळ येथे सुरू झाली होती. विद्यार्थीही त्याच मार्गावर जाऊ लागले होते. या विद्यापीठात औरंगजेबाची नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली होती. तेव्हा महाराष्ट्रातील या आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर साधे पुस्तकही नव्हते. मग महाराजांवर नाटिका सादर होणे तर फारच दूरची गोष्ट. ही अशी स्थिती असताना आता त्याच विद्यापीठात गोशाळेची निर्मिती झाली. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन काम करण्याची पद्धत या विद्यापीठात सुरू झाली आणि तेथीलच एका टेकडीवर महाराष्ट्रातील संतांचा मेळा उभारला जाणार आहे.

 

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात आता जवळपास 50 पेक्षा जास्त अभ्यासक्रम सुरू आहेत. केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणावर या विद्यापीठात काम सुरू झाले आहे. त्याच धोरणावर आधारित शिक्षण अभ्यासक्रमातील एक भाग म्हणजे गोशाळा! विद्यापीठ आणि गोशाळा हे न पटणारे समीकरण! विद्यापीठात आजपर्यंत पुस्तकी अभ्यासक्रम आपण बघत आलो आणि गोशाळेत दूध! पण, या विद्यापीठाने आता रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर दिला आहे. येथे गो अनुसंधान केंद्र देवलापार येथून वेगवेगळ्या प्रजातींच्या 25 गाई आणण्यात आल्या. त्या दुग्ध उत्पादनासाठी नव्हे तर येथे उभारण्यात आलेल्या गोशाळेच्या माध्यमातून शेणखत व गोमूत्र आधारित रोजगार प्रशिक्षणासाठी. शिक्षणाचे सर्वात शेवटचे ध्येय म्हणजे नोकरी! हातात कोणत्याही विषयाची पदवी पडली की बेरोजगारीच्या यादीत येऊन त्याची म्हणा वा तिची नोकरीसाठी भटकंती सुरू असते. आता हिंदी University विश्वविद्यापीठाने पदवी घेतानाच स्वयंरोजगाराचे शिक्षण देणे सुरू केले. त्यामुळे पदवी हाती येताच तो/ती आपल्या गावात जाऊन छोटामोठा व्यवसाय सुरू करू शकेल, अशी योजना ठरवलेली आहे. ज्या विद्यापीठात हिंदुत्वाचा द्वेष करणारी डावी विचारसरणी फोफावत होती त्याच विद्यापीठात देवलापार येथून आलेल्या गोमातेचे मंत्रोच्चारात स्वागत करून पूजन करण्यात आले. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खादी, हातमागावर आधारित उद्योगापासून ते पर्यावरण व गोआधारित ग्रामीण रोजगार मिळण्यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. हिंदुत्वाचा व्यापक व सर्वस्पर्शी विचार माणसाला रोजगारापर्यंत कसा घेऊन जातो, याचा हा छोटासा दाखला! वर्धेतील महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यापीठ आणि गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने रोजगाराभिमुख शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याचा पथदर्शी उपक्रम हाती घेतला तो या देशातील बेरोजगारी दूर करण्यास हातभार ठरेल, अशी अपेक्षा करू या!

 
- प्रफुल्ल व्यास
 

- 9881903765