शिवभक्त - स्वातंत्र्यवीर सावरकर

    दिनांक : 28-May-2022
Total Views |
शि-वा-जी ही तीन अक्षरे म्हणजे साधे शब्द नव्हेत, हा राष्ट्ररक्षणाचा महामंत्र आहे. सकल हिंदु समाजाचा संजीवनीमंत्र आहे. याच तीन अक्षरांनी आम्हाला अहद् तंजावर ते तहद् पेशावर श्रींचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली.आम्ही पारतंत्र्यात असतांना त्याविरुध्द लढा देण्याचे बळ आम्हाला याच तीन अक्षरांनी दिले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्जा मिळाली. अशा महानायकांपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
 
 
savarkar 2
 
पुण्यक्षेत्र भगूरच्या तपस्थलीत विनायक दामोदर सावरकर या क्रांतीसूर्याचा उदय झाला. कोण होते सावरकर? ज्यांनी आपल्या दोन्ही हातांनी देशाला सावरले ते सावरकर! ज्यांची लेखणी इंग्रजांपुढे खड्ग बनून उभी राहिली ते लेखक सावरकर. इतिहास लिहीणारेच नव्हे तर इतिहास घडवणारे इतिहासकार सावरकर. आपल्या ओजस्वी वाणीने राष्ट्रजागरण करणारे महानायक सावरकर. असे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलु होते. त्यापैकी छत्रपती शिवरायांविषयी भक्तीभावाचाही एक पैलु त्यांच्या जीवनाचा होता.
 
शिवरायांची आरती
 
सावरकरांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल विलक्षण आदर होता. तो त्यांच्या लेखनातुन आणि कृतीतूनही व्यक्त झाला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना सावरकरांनी छत्रपती शिवरायांची आरती लिहिली होती. दर आठवड्याला ही आरती म्हटली जात असे.
 
जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया ॥
आर्याच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गगदिता भूमाता दे तूज हाकेला
करुणारव भेदुनी तव ह्रदय न का गेला?
 
या आरतीतून सावरकरांचे शिवप्रेम व्यक्त झाले आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार केल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या हयातीतच त्यांना अवतार म्हणून संबोधले गेले होते. साधुपरित्राण आणि दुष्कृतीनाश करुन हे शिवराया, तुम्ही भगवतगीतेचे वचन सार्थ करा, असे अवाहन सावरकर करतात. ही आरती म्हणजे उत्कट शिवभक्तीचा काव्यरुप आविष्कार आहे.
 
लंडनमध्ये पहिली शिवजयंती
 
सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यांचे वास्तव्य इंडिया हाऊसमध्ये होते. त्यावेळी प्रत्यक्ष इंग्रजांच्या राजधानीत, लंडनमध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली जयंती साजरी करण्यासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला.फ्री इंडिया सोसायटीच्या वतीने शिवजयंतीचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला.त्यांच्या उच्चासनास्थित मुर्तीपुढे आणि त्यांच्या स्वतंत्र (भगव्या) निशाणाखाली मद्रास ,बंगाल, मुंबई, पंजाब आदी ठिकाणच्या लंडनस्थित भारतीयांनी या जयंतीत सहभाग घेतला. देशभक्त अय्यर यांनी शिवचरित्रावर तात्विक भाषण केले ते म्हणाले शिवरायांसारख्या विभूतींचे जन्म म्हणजे आमची आर्यजाती अजून वेदकालाइतकीच व जरुर त्याहून जास्तही चैतन्याने युक्त आहे असे प्रथित करणारी गर्जना होय. युरुलकर (यहूदी) मास्तर (पारशी) या गृहस्थांचीही छत्रपती शिवरायांवर समयोचित भाषणे झाली.या शिवजयंती उत्सवात शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तासभर आध्यक्षीय भाषण केले. शिवभूपाच्या जयजयकाराने अवघी लंडननगरी दुमदुमली असेच त्या उत्सवाचे स्वरुप होते.
 
छत्रपती शिवरायांवर लेखन
 
छत्रपती शिवाजीमहाराजांचा त्रिशतसांत्सरिक महोत्सव महाराष्ट्रात साजरा करण्यात आला.त्यावेळी सावरकरांनी ५ मे १९२७ रोजी श्रध्दानंद या पत्रात शिवरायांवर गौरवपूर्ण लेख लिहिला. शिवछत्रपतींचा जयजयकार या शिर्षकाच्या या लेखात सावरकर शिवरायांचा पराक्रम,त्यांचे आरमार, गनिमी कावा आणि भाषाशुध्दी आदी कार्यांचा गौरव करतात. ते लिहीतात जर शिवरायांनी भाषाशुध्दीचा प्रयत्न करुन मराठीभाषेला संस्कृतातून नवजीवन दिले नसते, तर आज मराठी भाषा कुठल्या कुठे विकृत झाली असती.परंतु त्यांनी राजव्यवहारकोश करवून आणि उर्दु शब्द काढून टाकण्याची प्रवृत्ती वाढवून मराठी भाषेची मोठी सेवा केली. कवींना, ग्रंथकारांना उत्तेजन देणे ही राष्ट्रोध्दाराचीच कामे समजून शिवरायांनी तीही पार पाडली.
 
सावरकर शिवरायांच्या समाजसुधारणेबाबत लिहितात शिवरायांनी केवळ राजकीय दृष्ट्याच आपल्या राष्ट्राचे पुनरुज्जीवन केले असे नाही, तर सामाजिक उदारता दाखवून बदलत्या काळाप्रमाणे रुढीला बदलून आपली परंपरा अविकृत ठेवण्याची तत्परता दाखवली ती पाहून आजच्या सुधारकाला सुध्दा खाली मान घालावी लागेल.
 
बजाजी निंबाळकर, नेतोजी पालकर यांना पुनश्च हिंदु करुन हिंदुसंघटन आणि शुध्दी या दोन अमूल्य संजीवनी त्यावेळी शिवरायांनी उपयोगात आणल्या होत्या. असे सावरकर लिहितात. श्रध्दानंदमध्येच सावरकरांनी शिवरायांच्या यशस्वी राजनीतीचे एक सुत्र हा लेख लिहिला होता. या लेखात महाराजांच्या यशस्वी राजनीतीचे सुत्र सावरकर मांडतात.
 
साप विखारी देशजननीचा, ये घेऊ चावा
अवचित गाठूनी ठकवूनी भुलवूनी कसाही ठेचावा ॥
 
वरील लेखाप्रमाणेच त्यांनी शिववीर नावाची कविता त्र्यम्बकेश्वर येथे १९०३ साली रचली होती. त्यातही सावरकरांची शिवरायांविषयीची भक्तिभावना व्यक्त झाली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांप्रमाणे तानाजी मालुसरे,बाजीप्रभु देशपांडे या शूर मावळ्यांच्या पराक्रमावरही सावरकरांनी पोवाडे लिहिले. सावरकरांनी १९०५ साली सिंहगडाचा पोवाडा रचला.त्यावेळी स्वराज्य हा शब्दही उच्चारणे अपराध होता. तरीही सावरकरांनी सशस्त्र क्रांतीच्या प्रचारासाठी मित्रमेळा सुरु केला.या मेळ्यासाठी स्वातंत्र्यकवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे संवाद,पद्य आणि पोवाडे रचत. त्या मेळ्यासाठी सावरकरांनी तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभु यांच्यावर पोवाडे लिहिले होते. १९०५-०६ च्या गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवात हे पोवाडे म्हटले गेले. पुढे बाबाराव सावरकर यांनी हे पोवाडे छापले. अवघ्या महाराष्ट्रात हे पोवाडे लोकप्रिय झाले. अबालवृध्दांच्या मुखी हे पोवाडे गाईले जाऊ लागले. पण जेव्हा अभिनव भारताच्या क्रांतीकारी प्रकाशनांची जप्ती झाली तेव्हा, हे दोन पोवाडेही साधारणत: १९०९ च्या आसपास इंग्रज सरकारने जप्त केले. ही जप्ती इतकी कडक होती की हे पोवाडे कुठेही तोंडी म्हटले की म्हणणारासही लगेच अटक केली जात असे. कारण पोवाड्यात वर्णन केलेला शिवचरित्रातील पराक्रम जनतेला स्वाधिनतेची आणि ब्रिटीश सत्तेविरुध्द उठावाची प्रेरणा देईल, ही भीती ब्रिटीशांना वाटत होती.
 
सावरकरांनी या पोवाड्यात लिहिले होते,
 
धन्य शिवाजी तो रणगाजी
धन्यची तानाजीश्र
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी श्रश्र
 
या वीररसपूर्ण पोवाड्यात सावरकरांनी तानाजी मालुसरे यांचा त्याग,मुलाच्या लग्नाआधी स्वराज्याप्रती कर्तव्याला प्रथम स्थान आणि उदयाभानाशी झालेल्या युध्दाचे रोमहर्षक वर्णन केले आहे. शेवटी ते लिहीतात,
 
धन्य मराठे पुनित झाले अरिरुधिरस्नाने
आणि विनायक त्यांच्या निर्मल यश:सुधापाने
असो समाप्ति छत्रपतींच्या सरस्वती माजीश्र
गड आला परि सिंह हरपला आमुचा तानाजीश्र
 
तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणे बाजीप्रभु देशपांडे यांच्यावरही सावरकरांनी पोवाडा लिहिला. या पोवाड्यात घोडखिंडीतील युध्दाचे वीरश्रीयुक्त वर्णन सावरकर करतात. या पोवाड्यात शेवटी सावरकर जनतेला अवाहन करतात की बाजीप्रभुंनी त्या काळी खिंडीत रक्त सांडले म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला.बंधुनो,असे आपले पराक्रमी पूर्वज असतांना आम्ही आज त्यांचे वंशज शोभतो का? स्वराज्य नाही,स्वदेश नाही तर या देहाचा धिक्कारच केला पाहिजे.
 
छत्रपती शिवाजीमहाराजांचा पराक्रम पाहून सावरकरांची प्रतिभा गंगासागराप्रमाणे उफाळून आली आणि हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा हे विदग्ध काव्य जन्माला आले. रत्नागिरी येथे १९२६ साली लिहिलेले हे गीत आजही हिंदु मनाला प्रेरणा देणारे आणि चिरंतन स्फूर्ती देणारे आहे. सावरकरांचे छत्रपती शिवरायांविषयीचे लेखन हे मूळातुनच वाचावे इतके अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे.
 
केवळ वाचावीर नव्हे तर कृतीशील
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ शिवरायांवर कविता ,पोवाडे आणि लेखच लिहीले असे नाही,तर त्यांच्या कार्याचे अनुसरणही केले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी मुघल आधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे त्याचप्रमाणे सावरकरांनीही तोच आदर्श ठेवत मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. प्रदीर्घ काळ बंदीवास भोगला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भाषाशुध्दीचे कार्यही सावरकरांनी पुढे नेले. परधर्मात गेलेल्या हिंदुना पुनश्च हिंदु करुन घेण्यासाठी सावरकरांनी शिवरायांप्रमाणे शुध्दीकार्याचे समर्थन केले. छत्रपती शिवरायांनी समुद्रबंदीची घातक रुढी धुडकावुन मराठ्यांचे बलाढ्य आरमार उभे केले. सावरकरांनीही सिंधुबंदी ही राष्ट्रासाठी घातक असल्याचे म्हटले.
छत्रपती शिवाजीमहाराज हे अवघ्या हिंदु समाजाचे आराध्यदैवत आहेत. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थानही शिवरायच आहेत. अशा महान राजांच्या चरित्राचा प्रभाव सावरकरांवर पडल्यावाचुन कसा राहणार? सावरकरांच्या जीवनाचे अनेक पैलु आहे,त्यापैकी एक पैलु म्हणजे शिवभक्त सावरकर.
 
सावरकरांचा आदर्श ठेवत छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करणे आणि त्याचे युगानुकुल अनुसरण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती या महान क्रांतिकारकाला आणि त्याच्या शिवभक्तीला विनम्र अभिवादन!!
 
- रवींद्र गणेश सासमकर