योगी सरकारचा मोठा निर्णय .. उ. प्रदेशात महिलांची नाईट शिफ्ट बंदचे आदेश

    दिनांक : 28-May-2022
Total Views |
 
संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत महिलांकडून काम करुन घेण्यास मनाई
 
लखनौ – उ. प्रदेशातील महिलांची नाईट शिफ्ट बंद (Night Shift closed)करण्याचा महत्त्वाचा निर्णय योगी आदित्यनाथ ( CM Yogi Aadityanath )यांच्या सरकारने घेतलेला आहे.
 
 

women
 
 
 
आता संध्याकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत महिलांकडून काम करवून घेता येणार नाही, असे आदेश सरकारने काढले आहेत. हा नियम सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांना लागू होणार आहे. जर कोणत्या कारणाने संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत महिलेकडून नोकरी करवून घ्यायची असल्यास याबाबतची अनुमती सरकारकडून घ्यावी लागणार आहे. जर सरकारच्या परवानगीविना एखाद्या महिलेची नाईट शिफ्ट लावली तर संबंधित संस्था, कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. जर एखादी महिला संध्याकाळी सातनंतर काम करण्यास नकार देत असेल, तर कोणतीही संस्था वा कंपनी या महिलेला कामावरुन काढू शकणार नाही.
 
नियमांचा भंग झाल्यास  दंड किंवा जेल
 
जर सरकारची लेखी परवानगी मिळाली तरच महिला संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्ंयत काम करु शकतील अशी माहिती राज्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या काळात ज्या महिलांना नोकरीवर बोलवण्यात येईल, त्यांच्या नेण्या-आणण्याची गाडीची व्यवस्था संबंधित कंपनीला करावी लागेल. हेही स्पष्ट करण्यात आले आहे. जर एखाद्या कंपनीने हे केले नाही तर कामगार कायद्याचे ते उल्लंघन मानण्यात येणार आहे. यासाठी दंड किंवा जेलमध्ये जाण्याची शिक्षा होऊ शकते. असेही सांगण्यात आले आहे.
 
खासगी क्षेत्रालाही नियम लागू
 
हा आदेश सगळ्या जिल्ह्यांमध्ये सक्तीने लागू करण्यात येणार आहे. कॉल सेंटर, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सर्वात जास्त महिला संध्याकाळी सातनंतर काम करतात. कॉल सेंटर आणि हॉटेल इंडस्ट्रीत पूर्ण रात्र घराच्या बाहेर राहावे लागते. रेस्टॉरंटही रात्री ११ पर्यंत सुरु असतात, अशा स्थितीत एखाद्या महिलेला संध्याकाळी सातनंतर ड्युटी करायची इच्छा नसेल तर संस्था तिच्यावर जबरदस्ती करु शकणार नाहीत. अशी तक्रार आल्यास संबंधित संस्थांचे लायसन्स जप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 
खासगी क्षेत्रातील महिलांना सर्वाधिक फायदा
 
या निर्णयाच सर्वाधिक फायदा हा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. उ. प्रदेशात सुमारे ५ लाख महिला या संध्याकाळी ७ वाजल्यानंतर काम करतात, अशी माहिती आहे. यातील बऱ्याच महिलांचे काम रात्री ११ पर्यंत संपते मात्र नाईट क्लब, बार, कॉल सेंटर यातील महिलांना रात्रभर काम करावे लागते. स्रवाधिक चांगली बाब म्हणजे त्यांना घरी सोडण्याची जबाबदारी आता संबंधित कंपनीची असेल, यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मार्गी लागेल असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
 
खालील नियम देखील बंधनकारक आहेत
 
१. रात्री काम करणाऱ्या महिलेला जेवण देणे बंधनकारक आहे .
२. महिला कर्मचारी काम करणाऱ्या ठिकाणी किमान ४ महिला असणे आवश्यक आहे.
३. महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था असणे गरजेची आहे.
४. बाथरुम, चेंजिंग रुम आणि पिण्याचे पाणी कार्यालयात असायलाच हवे.
५. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समिती गठित करावी लागेल.