प्रश्न केवळ काशी-मथुरेचा नाही!

    दिनांक : 26-May-2022
Total Views |
रमेश पतंगे
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. अयोध्या हे त्याचे पहिले पाऊल होते.

mashid
 
 
‘ज्ञानवापी मशीद’ हे नाव सध्या ज्याच्या- त्याच्या मुखी आहे. हे नाव ऐकल्यावर आणि वाचल्यावर पहिलाच प्रश्न निर्माण होतो की, मशिदीचे नाव ‘ज्ञानवापी’ असे संस्कृत कसे असू शकेल? जामा मशीद, बाबरी मशीद, मक्का मशीद, ताज-उल-मशीद, नगीना मशीद इत्यादी मशिदींची नावे असतात. ‘ज्ञान’ हा शब्द अरबी नाही, फारशी नाही आणि उर्दूदेखील नाही.
वापीचा अर्थ होतो विहीर किंवा तलाव. ‘ज्ञानवापी’ म्हणजे ज्ञानाचा तलाव किंवा विहीर. जिचे पाणी प्राशन केले असता ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान पोट भरण्याचे ज्ञान नव्हे, तर अध्यात्मिक ज्ञान. ‘मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार आहे’ या प्रश्नांची उत्तरे म्हणजे ज्ञान. असे ज्ञान मशिदीतून होते की नाही, हे मला माहीत नाही. पण, मंदिरातून होते, अशी माझी श्रद्धा आहे.
ज्ञानवापी मशिदीचा विषय सुरू झाल्यापासून औरंगजेबाने १६६९ साली काशिविश्वेश्वराचेमंदिर कधी पाडले, का पाडले, त्याजागी मशीद कशी बांधली, त्या मशिदीच्या शेजारी १७८० साली देवी अहिल्याबाई होळकर यांनी आजचे काशिविश्वेश्वराचे मंदिर बांधले, हा सर्व इतिहास वाचकांच्या वाचनात नक्कीच येऊन गेला असेल. भारतात भगवान शंकरांची असंख्य मंदिरे आहेत आणि पिंडीच्या समोर नंदी असतो. नंदी नसेल, तर ते शंकराचे मंदिर होत नाही. काशिविश्वनाथाच्या मंदिरातही पिंडीसमोर नंदी आहे, पण त्याचे तोंड मशिदीकडे आहे, तो पिंडीकडे पाहत नाही. म्हणजे ज्याजागी शंकराची पिंड होती, त्या स्थानाकडे तो पाहतो आहे.
 
आतुरतेने पाहतो आहे. माझे स्वामी भगवान शंकर त्यांच्या मूळस्थानी पुन्हा परत कधी येणार, याची हा नंदी वाट पाहतो आहे. हा नंदी सुमारे ३५० वर्षे एकाच जागी स्थिर आहे. तो क्षण आता फार दूर राहिला आहे, असे वाटत नाही. मशिदीचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण झाले आणि विहिरीत शंकराची पिंड आढळली. अलाहाबाद उच्च न्यायालय ते सर्वोच्चन्यायालय अशा सुनावण्या चालू आहेत. १९९१ साली नरसिंहराव यांनी एक कायदा केला. हा कायदा हे सांगतो की, दि. १५ ऑगस्ट, १९४७ साली प्रार्थनास्थळे ज्या स्थितीत होती, त्याच स्थितीत ती राहतील, त्यात बदल करणे हा गुन्हा ठरेल. या कायद्याचादेखील आता कीस पाडला जात आहे.
 
सगळे सेक्युलॅरिस्ट, मानवतावादी, सर्वधर्मसमभाववादी वगैरे वगैरे हमखास १९९१च्या ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याचा उल्लेख करतात आणि हिंदूंना आठवण करून देतात की, आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, म्हणून कायद्याचे पालन आपण केले पाहिजे. मूळ काशिविश्वनाथ मंदिराचा नाद सोडून दिला पाहिजे. औरंगजेब कुणी धर्मांध नव्हता, तो राज्यकर्ता होता. काशिविश्वनाथ मंदिरातील पुजार्‍यांनी काही राजकन्यांचा विनयभंग केला म्हणून औरंगजेबाने हे मंदिर पाडले, असे सेक्युलर मंडळी सांगतात. त्यांच्या भाषेत हे ‘मंदिर नॅरेटिव्ह’ आहे. ते आणखी काय काय शोध लावतील, हे येणार्‍या काळात दिसेलच.
 
अयोध्या आंदोलन चालू असताना त्यांनी असे एकापेक्षा एक भारी शोध लावले. ‘राम’ ही काल्पनिक संकल्पना आहे, ‘रामायण’ हा इतिहास नाही, रामाचा जन्म अयोध्येत झाला, याला कोणताही पुरावा नाही, राम नावाचा कुणी राजा होता, यालादेखील ऐतिहासिक पुरावा नाही. बाबराने रामाचे मंदिर पाडले, याला ऐतिहासिक पुरावा नाही. रामजन्मस्थानावरील बाबरी मशीद सर्वधर्मभावाचे प्रतीक आहे, त्याचे जतन केले पाहिजे. मशिदीच्या घुमटात रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या आहेत, त्या काढून घेतल्या पाहिजेत. हा सर्व सेक्युलर ‘बाबरी राग’ होता. परंतु, या रागाचे सूर अत्यंत बेसूर होते. त्यामुळे त्यातून मधुर संगीत येण्याऐवजी कर्णकर्कश संगीत आले. हिंदू समाजाने कानात बोळे घातले आणि आमचे सेक्युलर बंधू या रागात मशिदीत अजान देत बसले. आता तोच राग ‘औरंगजेबी घाटात’ नव्याने ही मंडळी गात बसली आहेत. त्यांचा दम भारी आहे, त्याला सलाम केला पाहिजे.
 
आता ते काय सांगत आहेत? तर ते म्हणतात, “२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार अधिकारावर आल्यापासून वांशिक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. हिंदूंचे वांशिक श्रेष्ठत्व दाखविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे सुरू झालेला आहे. ‘अयोध्या एक झाँकी है, काशी, मथुरा बाकी हैं’ ही अयोध्येच्या काळातीलच घोषणा होती. मुसलमान परकीय समाज आहे. त्याने हिंदू संस्कृतीवर अतिक्रमण केले. वांशिक श्रेष्ठत्वासाठी या मशिदी पाडल्या पाहिजेत आणि त्याजागी मंदिरे उभी केली पाहिजेत. भारताची वाटचाल वांशिक लोकशाहीकडे चालू झाली आहे, हा एक नवीन शोध मानला पाहिजे. डावी डोकी युक्तिवाद करण्यात फार सुपीक असतात. त्यांच्या सुपीक भूमीत मुस्लीम हिताचे पाणी ओतावे लागते. हिंदू विद्वेषाचे खत घालावे लागते. त्यानंतर जे पीक येतं, ते वरील गुणवत्तेचं असतं.
 
‘हिंदू हा एक वंश आहे,’ यासारखी विसंगत अनैतिहासिक आणि धादांत खोटी संकल्पना जगात कुठली नसेल. हिंदू समाज हा अनेक मानववंशाच्या मिश्रणातून तयार झालेला समाज आहे. हे समजण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ हे पुस्तक वाचायला पाहिजे. पण, जगातील जी काही अक्कल आहे ती आपल्याकडेच आहे, असे सेक्युलर डोके असल्यामुळे त्यांना सांगण्याच्या भानगडीत पडण्यात काही अर्थ नसतो. भारतातील मुसलमान हा वेगळ्या वंशाचा नाही, तो इराणी वंशाचा नाही, मंगोल वंशाचा नाही, अरबी वंशाचा नाही आणि मुघल वंशाचादेखील नाही. सर्वसाधारण हिंदू ज्या रक्ताचा आणि वंशाचा आहे, त्याच वंशाचा तोदेखील आहे.
 
हिंदू आणि मुसलमान यांच्यात फरक फक्त एवढाच आहे की, जे हिंदू, मुसलमान झाले आहेत ते परकीय आक्रमकांनी त्यांच्यावर लादलेल्या गुलामीत जगत आहेत आणि गुलामी हीच आपली ओळख आहे, असे ते मानतात. कुठलाही समाज त्याच्यावर आक्रमण करणार्‍या आक्रमणकारी लोकांना आपले मानत नाही. तो त्यांचा द्वेषच करतो. रशिया, जर्मनांचा द्वेष करतो. फ्रान्सदेखील जर्मनांचा द्वेष करतो. कारण, जर्मनांनी आक्रमण करून या देशांचा खूप विध्वंस केला होता. मंगोल लोकांनी रशियावर तीन-चारशे वर्षे राज्य केले.
 
आपल्या देशाप्रमाणे तेथे ‘अकबर महान, औरंगजेब महान आणि शहाजान कलेचा भोक्ता’ असली विधाने कुणी करीत नाही. मंगोल आक्रमकांच्या सर्व खाणाखुणा रशियाने धुवून काढल्या आणि पार पुसून टाकल्या. आक्रमणकारांशी आपले नाते सांगण्याचे पाप भारतातील तथाकथित सेक्युलर हिंदूच करू शकतात. पापाचा घडा भरेपर्यंत त्यांनी ते करीत राहावे. कारण,परमेश्वरदेखील पापाचा घडा भरल्याशिवाय शासन करीत नाही.
 
या सेक्युलर मंडळींनी अयोध्या आंदोलनाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करू नका, न्यायपालिकेचे पावित्र्य राखा, वगैरे खूप उपदेश केला आणि आता हीच मंडळी म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण हाती घ्यायला नको होते. ज्ञानवापी मशीद हिंदूंनी ताब्यात घेणे, हे घटनाबाह्य होईल. १९९१च्या कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जे विधान केले आहे, त्यावरही या मंडळींनी आक्षेप घेतला आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड म्हणाले "The १९९१ Act does not stop the ascertainment of the religious character of the place'.. याचा अर्थ असा होतो की, १९९१चा कायदा एखाद्या स्थळाचे धार्मिक स्वरुप निश्चित करण्यास प्रतिबंध करीत नाही.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर आक्षेप घेणारे लिखाण सेक्युलर पंडित आशुतोष यांनी केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, संकट निर्माण करणारे हे मत आहे. मथुरा, कुतबमिनार, ताजमहाल यांच्या बरोबरीने विश्व हिंदू परिषदेने ३० हजार मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचा दावा केला आहे. ही सर्व स्थाने जर हिंदूंच्या ताब्यात देण्याचा विषय झाला, तर देशात काय होईल? मुसलमान समाज त्यावर कोणती प्रतिक्रिया देईल? त्यातून अतिरेकी निर्माण होणार नाहीत का? देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल? अशा प्रकारे सुतावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न पंडित आशुतोष यांनी केला आहे.
 
(हे आशुतोष एकेकाळी ‘आप’चे मोठे नेते होते आणि केजरीवाल यांचे भक्त होते.) शेवटी हे पंडित म्हणतात की, "It is high time that the Supereme Court corrects its mistake and Hindutvavadis should be asked to put a full stop to their endeavour.'' - अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपली चूक दुरूस्त करून हिंदुत्त्ववाद्यांना वेसण घालावी. गाडीखालून चालणार्‍या कुत्र्याला असे ते की, गाडी आपणच ओढतो आहोत, त्याचा हा प्रकार समजला पाहिजे.
 
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. अयोध्या हे त्याचे पहिले पाऊल होते. मुसलमानांनी स्वतःला प्रथम ‘भारतीय’ म्हटले पाहिजे. आपल्या भारतीयत्वाचा त्यांनी शोध घेतला पाहिजे. मोहम्मद बिन कासीम ते औरंगजेब हे सर्व आक्रमक होते. त्यांच्याशी धार्मिक नात्याने स्वतःला जोडून घेणे त्यांनी बंद केले पाहिजे. नेपोलियन ख्रिश्चन होता, हिटलर ख्रिश्चन होता, रशियादेखील ख्रिश्चन आहे. नेपोलियन आणि हिटलर यांनी रशियावर आक्रमण केले. रशियन लोक नेपोलियन आणि हिटलरला आपला धर्मपुरुष मानीत नाहीत.
 
औरंगजेबाशी आमचा संबंध काय? बाबराशी आपला संबंध काय? मुसलमानांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आम्ही भारतीय मुसलमान आहोत, याचा त्यांनी एक भारतीय म्हणून अभिमान बाळगला पाहिजे आणि भारतीयत्वाची जी प्रतीके आहेत, त्याचा मनापासून स्वीकार केला पाहिजे. त्यातील एक प्रतीक संविधान आहे. आम्ही संविधाननिष्ठ आहोत आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थाना बांधिल आहोत, हे त्यांनी स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारले की, आपली ओळख पक्की होते आणि भांडण धार्मिक होत नाही. यासाठी प्रश्न केवळ काशी आणि मथुरेचा नाही. परंतु,हे डाव्या डोक्यात शिरणे फार कठीण आहे. आपण मात्र सर्वांनी त्याचे आकलन करून घ्यायला पाहिजे.