स्वयमेव मृगेन्द्रता

    दिनांक : 25-May-2022
Total Views |

जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते.
 
 

modiji1 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड ‘व्हायरल’ झाले असून, लाखो भारतीयांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, फेसबुक टाईमलाईनवर ते मोठ्या अभिमानाने पोस्ट केले. त्यातल्या अनेकांनी ‘विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता’ या संस्कृत श्लोकातील ओळीही नरेंद्र मोदींच्या छायाचित्राला दिलेल्या आहेत. कारण, त्या छायाचित्रात मोदी जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्याबरोबर सर्वात अग्रभागी, तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अ‍ॅँथनी अल्बानीज व अन्य नेते मागे मागे चालत असल्याचे दिसते.
 
श्लोकाच्या अर्थाप्रमाणे सिंह स्वतःच्याकर्तृत्वाने राजा होतो, तसे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या छायाचित्रात दिसत आहेत व अन्य देशही तसे समजूनच मागे मागे चालत आहेत, अशी भारतीयांची भावना होती. त्या छायाचित्रातून नरेंद्र मोदींचा आपण १३५ कोटी जनतेच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आत्मविश्वासही स्पष्टपणे दिसून येतो. भारतीयांनाही जगासमोर आपल्या देशाचे तडफदार प्रतिनिधित्व करणार्‍या, स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवणार्‍या, कोणाच्याही दबावासमोर न झुकणार्‍या शीर्ष नेतृत्वाची आस होती व ती आस मोदींच्या रुपात पूर्ण झाल्याचे पटले आणि म्हणूनच जपानमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्राने सर्वसामान्यांच्या मोबाईलची स्क्रिन व्यापली.
 
इथे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंची एक गोष्ट आठवते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुंनी दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले. अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानशी संबंध प्रस्थापित करण्यासाठीही जवाहरलाल नेहरूंनी प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे त्यांनी दि. १ ऑक्टोबर, १९४९ रोजी इंदिरा गांधींच्या नावावरून नामकरण केलेल्या ‘इंदिरा’ हत्तीला जपानच्या प्राणीसंग्रहालयाला भेट म्हणून दिले. जपानमधील लहान मुलांच्या इच्छापूर्तीच्या माध्यमातून तेथील सरकारशी संबंध सुधारले जातील, असे नेहरुंचे यामागचे मत होते. तरीही जपानने भारतावर फारसा विश्वास दाखवल्याचे नंतरच्या काळात दिसले नाही.
 
उलट १९५२ साली जपानशी राजनयिक संबंध सुरू करूनही जपान अनेक दशकांपर्यंत भारतावर विश्वास ठेवण्याबाबत हातचे राखून होता. शीतयुद्धकाळात जपान अमेरिकेबरोबर होता, तर भारत मात्र सोव्हिएत संघाबरोबर असल्याचे म्हटले जाते. यामुळेच जपानने भारताशी दृढ संबंध तयार केले नाहीत. पण, यातून जवाहरलाल नेहरूंचे अलिप्ततेचे व परराष्ट्र धोरण फसल्याचेही दिसते. कारण, नेहरूंनी ते धोरण प्रामाणिकपणे राबवले असते, तर जपानसारख्या देशाच्या मनात भारताबद्दल शंका, कुशंका उद्भवण्याचे व भारत अलिप्त नव्हे, तर सोव्हिएत संघाबरोबर असल्याचे मत तयार झाले नसते. परिणामी, भारत कितीतरी वर्षे जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्यात कमी पडला आणि दोन्ही देशांत दृढ संबंध प्रस्थापित होण्यासाठी सन २००० उजाडावे लागले.
 
आता तर अवघा जपान मोदीमय व पर्यायाने भारतमय झाल्याचे पंतप्रधानांच्या दौर्‍यावरून दिसून आले. इथल्या भारतीयांनी नरेंद्र मोदींचे स्वागतच ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी केले. त्यानंतर मोदींनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीर्ष अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यात ‘ऑटोमोबाईल’, ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘सेमीकंडक्टर’, ‘इस्पात’, ‘तंत्रज्ञान’, ‘स्टील’, ‘व्यापार’, ‘बँकिंग आणि वित्ता’सह इतरही कंपन्यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन’, ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टीव्ह’आणि ‘सेमीकंडक्टर’विषयक धोरण व मजबूत ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’वर प्रकाश टाकला. त्याचा फायदा आता भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढण्यावर होईल.
 
चालू आर्थिक वर्षात भारतात विक्रमी 84 अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक आली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौर्‍याने व भारतात गुंतवणुकीसाठीचे आमंत्रण दिल्याने आणखी वाढ होईल. नरेंद्र मोदींनी यावेळी ‘सुझुकी मोटार कॉर्पोरेशन’चे वरिष्ठ सल्लागार ‘ओसामु सुझुकी’, ‘सॉफ्टबँक कॉर्पोरेशन’चे संस्थापक ‘मासायोशी सोन’, ‘फास्ट रिटेलिंग कंपनी लिमिटेड’चे अध्यक्ष तदाशी यानाई, ‘एनईसी कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एंडो यांचीही भेट घेत चर्चा केली. त्यात सर्वच कंपन्यांच्या निर्णयक्षम अधिकार्‍यांनी सकारात्मकता दाखवली. मोदी सरकारच्या परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठीच्या उपक्रम व योजनांसह परराष्ट्र धोरणाचे हे फलित. तसेच, यातून येत्या काळात भारत व जपानमधील संबंध आणखी उन्नत होतील, हेही स्पष्ट होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य १२ देशांशी सोमवारी जो बायडेन यांनीही व्यापार करार केला. त्याचाही फायदा भारताला होईल, तर जपान दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी नरेंद्र मोदींनी ‘क्वाड’ शिखर संमेलनाला संबोधित केले व आपले म्हणणे ठामपणे मांडले. ‘क्वाड’ गट अपयशी ठरेल, असे म्हणणार्‍या चीनला, ‘क्वाड’ने जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान निर्माण केल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले, तर रशिया-युक्रेन संघर्षात तटस्थ राहणार्‍या भारतावर युक्रेनच्या बाजूने उभे राहण्यासाठी अमेरिका-जपानने दबाव आणूनही भारताने भूमिका बदलली नाही. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘क्वाड’ परिषदेत मित्रांसोबत असल्याने आनंद वाटत असल्याचे म्हणत रशियाबाबत तटस्थ असलो तरी आपण अमेरिका व जपानचे महत्त्व जाणत असल्याचे स्पष्ट केले.
 
पंतप्रधानांनी हिंदी-प्रशांत क्षेत्रात परस्पर सहकार्यासह मुक्त हिंदी-प्रशांत संबंधांचाही ठळक उल्लेख केला. त्यातून त्यांनी हिंदी-प्रशांत क्षेत्रात सर्व देशांना व्यापाराचा मार्ग मोकळा असल्याचे ठणकावत विस्तारवादी चीनलाही थेट संदेश दिला. नरेंद्र मोदींचा जपान दौरा, तेथील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांशी केलेली चर्चा आणि ‘क्वाड’ गटाला केलेल्या संबोधनातून भारताचे परराष्ट्र धोरण योग्य मार्गावर असल्याचे दिसते. यातून आगामी काळात भारत-जपान संबंध आणखी मजबूत तर होतीलच, पण ‘क्वाड’ गटातील अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियामधील सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण, व्यापाराने चीनच्या आव्हानालाही तोंड देता येईल, हे स्पष्ट होते. जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते.