ताडोबाला ओळख देणारा 'वाघडोह'

    दिनांक : 25-May-2022
Total Views |

वेध


Waghadoh वाघाच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला संपूर्ण जगात ओळख मिळवून देणार्‍या Waghadoh 'वाघडोह' नामक वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याची बातमी सोमवारी सकाळी आल्यानंतर वन्यजीवप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला व ते भावुक झाले.

 
 
 
 
tiger

 

 
 
 
पर्यटकांनीही संवेदना व्यक्त करून Waghadoh वाघडोहच्या यशस्वी जीवन प्रवासाचे स्मरण केले. त्यावरून वाघडोहप्रति असलेली आपुलकीची भावना किती उच्चकोटीची होती, हे स्पष्ट होते. देशात आजमितीला जे वाघ आहेत, त्यापैकी वाघडोह हा सर्वात धिप्पाड वाघ असल्याचे मानले जायचे. त्याच रुबाबात तो आपले जीवनही जगला. सर्वसामान्यपणे वाघाचे आयुष्य 8 ते 12 वर्ष असते, पण वाघडोहने त्यातही विक्रम प्रस्थापित केला. तो तब्बल 17 वर्षांचे आयुष्य जगला. अतिशय कुटुंबवत्सल राहिलेला वाघडोह जवळपास 40 बछड्यांचा पिता होता. बछडे वयात येईपर्यंत त्यांची व त्यांच्या आईंची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव इतर वाघांपेक्षा त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा होता. शेवटची एक घटना सोडली तर Waghadoh वाघडोहने कधी मनुष्यावर हल्ला केल्याची किंवा कोण्या गावात जाऊन धुमाकूळ घातल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच त्याला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक वन्यप्रेमी व पर्यटकांमध्ये होती.
 

Waghadoh वाघडोहच्या नावाचीही एक कथा आहे. ताडोबातच त्याचा जन्म झाला. ते ठिकाण Waghadoh वाघडोह नाल्याजवळ असल्याने व तेथेच त्याचे पहिले दर्शन तेव्हाच्या वन कर्मचार्‍यांना झाल्याने त्याचे नाव 'वाघडोह' असे ठेवण्यात आले होते. अलिकडच्या काळात वन विभागाने प्रत्येक वाघाची सहज ओळख पटावी म्हणून वेगवेगळी नावे दिली आहेत. वाघडोहला टी-33 हे तांत्रिक नाव देण्यात आले होते. पिळदार शरीरयष्टी लाभलेला Waghadoh वाघडोह बरीच वर्षे ताडोबाचा सम्राट होता. शिकार करण्यातही तो वस्ताद होता. एकदा रानगव्याची शिकार करताना त्याला उजव्या डोळ्याजवळ जखम झाली होती. पुढे याच जखमेने त्याच्या सौंदर्यात आणखी भर घातली. त्या जखमेच्या निशाणीवरून वाघडोह लगेच ओळखला जायचा. अन्य कोणत्याही वाघाच्या नशिबी न येणारे समृद्ध जीवन Waghadoh वाघडोह जगला. वयोमानानुसार आलेल्या अशक्तपणामुळे तीन वर्षांपूर्वी त्याला अन्य वाघांनी ताडोबातून हुसकावून लावले होते. तेव्हापासूनच तो बाह्य जंगल आणि त्या शेजारच्या गावांतून अधूनमधून दिसायचा. काही दिवसांपूर्वीच वाघडोहचे एक चित्र समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यातून त्याचे म्हातारपण स्पष्टपणे दिसत होते. वाढलेल्या वयानुसार त्याची क्षमताही संपुष्टात आल्याने त्याला वन्यप्राण्यांची शिकार करणे अवघड झाले होते. परिणामस्वरूप त्याचा अशक्तपणा कमालीचा वाढला होता.

 

सध्या त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. याच परिसरात त्याचा वावर असल्याने आजूबाजूच्या गावातले नागरिकही भयभीत होते. मृत्यूपूर्वी म्हणजेच शनिवार, 21 मे रोजी सिनाळा गावाजवळील जंगल भागात बकर्‍या चराईसाठी गेलेल्या 65 वर्षीय वृद्धावर त्याने हल्ला करून त्याला ठार केले. मनुष्यावर हल्ला करण्याची त्याची ही पहिली व शेवटची घटना ठरली. तीच आपल्या नावावर नोंदवून वाघडोहने जंगलाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे नैसर्गिक मृत्यूचे भाग्य त्याला लाभले. जंगलाच्या विविध भागात वन्यप्रेमींनी वेळोवेळी टिपलेली त्याची वेगवेगळी छायाचित्रे त्याच्या स्मृती जागृत ठेवणार आहे. वाघडोहच्या मृत्यूची बातमी येताच समाजमाध्यमांवर वन्यप्रेमींनी त्याची असंख्य छायाचित्रे प्रसारित करीत शोकसंवेदना व्यक्त करून ते अधोरेखित केले आहे. Waghadoh वाघडोहसारखे आयुष्य अन्य वाघांच्या नशिबी येणार की नाही, हे सांगता येणार नाही. प्रत्येक वाघाची आपली एक शैली असते आणि तीच त्याला ओळख मिळवून देत असते.

 
विद्यमान स्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पूनम, माया वाघीण आणि बलराम नामक वाघ वन्यप्रेमी व पर्यटकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. अन्यही वाघ आहेतच; पण या तिघांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. जंगल सफारी करणारे त्यांची एक झलक पाहण्यासाठी कमालीचे आतुर असतात. एकदा दर्शन झाले नाही तर दुसर्‍यांदा, तिसर्‍यांदा सफारी करणारे पर्यटक आहेत. त्यावरून वाघांप्रती असलेली उत्सुकता लक्षात येते. Waghadoh वाघडोहप्रमाणेच अन्य वाघ आणि वाघिणींना आयुष्य लाभावे व व्याघ्र प्रकल्प समृद्ध राहावे, हीच अपेक्षा.
 
- गिरीश शेरेकर 
 

- 9420721225