अखेर सत्य प्रकटले!

    दिनांक : 22-May-2022
Total Views |

अग्रलेख

 

होय, अखेर सत्, चित्, आनंद स्वरूप स्वत: काशी विश्वनाथ प्रकट झाले. न्यायालयाच्या प्रतिनिधींच्या साक्षीने काशीच्या ग्यानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणात शिवलिंग gyanvapi प्रकट झाले.

 
kashi

 

मात्र, धडधडीत सत्य प्रकटले तरी त्याला असत्य ठरविण्याचे मोगलाई प्रयत्न अजून संपलेले नाहीत. न्यायालयाने नेमलेल्या प्रतिनिधींनी न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर अंतिम निर्णय न्यायालयात होईल; पण आता जवळ जवळ सगळेच रहस्य बाहेर पडले आहे. gyanvapi वर्षानुवर्षे अयोध्या, काशी आणि मथुरा ही हिंदूंची तीन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे अन्यायी अतिक्रमण सहन करीत होती. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीच्या निमित्ताने देशभरातील हिंदू जागृत व संघटित झाले आणि परिवर्तनाचे चक्र गतिमान झाले. 'अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा अभी बाकी है...'' अशा घोषणा अयोध्या आंदोलनाच्या काळात आंदोलक देत होते. मात्र, वादग्रस्त ढाचा कोसळला आणि प्रचंड असा एक प्रेरणादायी विजय हिंदूंच्या नावाने नोंदला गेला. त्यातच सर्वोच्च न्यायालयातही ती रामजन्मभूमीच असल्याचा निर्वाळा आल्यानंतर आंदोलनातील सर्व कृती न्याय आणि उचित ठरल्या.
 
वास्तविक, या सर्व गोष्टीनंतर मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून राजकारण करणारे ओवैसींसारखे नेते आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सारख्या मुस्लिमांचे पुढारपण करीत असल्याचा आव आणणा-या लोकांनी काशी, मथुरा येथील प्रश्नही चर्चा करून, संवादाने सोडवायला हवा होता. gyanvapi श्रीराम जन्मभूमीवर भव्य राममंदिर उभे करणे हे मोठे काम समोर असल्याने विश्व हिंदू परिषद किंवा संत संमेलन यांनी काशी, मथुरेचा विषय हाती घेतलेला नाही. मात्र, अचानक वाराणसी न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेने काशी विश्वेश्वराच्या मुक्तीचा मार्ग सुरू केला.  या याचिकेवर सत्र न्यायालयाने ग्यानवापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांच्या मार्फत करण्याचा आदेश दिला. अखेर सर्वेक्षण सुरू झाले आणि अचानक ती बातमी आली. या ग्यानवापी मशिदीत शिवलिंग सापडले. तेही बारा फूट आठ इंच इतके मोठे !
 

ही बातमी बाहेर येताच सगळा देश आनंदित झाला आहे.  या मशिदीत जेथे वजूखाना आहे. तेथे पाण्याखाली हे शिवलिंग सापडले. वजूखाना याचा अर्थ मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी हात-पाय धुण्याची जागा. जेथे हातपाय धुतात तेथे शिवलिंग ठेवून हा श्रद्धेचा घोर अपमानच करण्यात आला होता. आपल्याला मान्य नसलेल्या श्रद्धा संपविण्यातच जे शौर्य मानतात ते अशा प्रकारचा अपमान अगदी निर्ढावलेपणाने करणार, यात आश्चर्य नाही. मात्र, याच विचारांची काही मंडळी आणि त्यांचे समर्थन करणारे काही भंपक जेव्हा मानवता, उदात्त विचारांची जोड या विचारांना चिकटवून मांडणी करू लागतात तेव्हा हे असे वजूखान्याचे संतापजनक अनुभव त्यांच्या तोंडावर फेकावे लागतात. हिंदू समाजाने शिवलिंगाचा इतके दिवस जाणीवपूर्वक होत असलेला अपमान संयमाने गिळला आहे. याउलट तेथे शिवलिंग सापडले, अशी बातमी बाहेर आल्यानंतरही ज्या प्रकारे मुस्लिम धुरिणांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या अशाच अपरिपक्व आणि मुद्दाम चिथावणी देणा-या आहेत.

 

एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी हे शिवलिंग नाहीच; तो तर तेथील कारंजा आहे, असे म्हटले. आधी तर हे महाशय म्हणत होते की, आपण २० वर्षांचे असताना बाबरीच्या नावाने एक मशीद पाडली गेली. आता आणखी मशीद आपण पाडू देणार नाही. म्हणजे काय करणार? कोणाला यात सुप्त चिथावणी आहे? हा काही देण्याघेण्याचा व्यवहार आहे काय? मशीद न देण्यासाठी शिवलिंग हा कारंजा असल्याचा बनाव करणार की काय? कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान केवळ सत्तेच्या बळावर आणि तलवारीच्या टोकावर उद्ध्वस्त करण्यात आले. अपवित्र करून तेथे मशिदी बनविण्यात आल्या. त्याचे धडधडीत पुरावे समोर आल्यावरही इतका उद्दामपणा दाखवत प्रतिक्रिया देणार? कारंजा असेल तर त्याचे इतर अवशेष कुठे गेले? पाणी कोठून येत होते? शिवलिंगावर सिमेंट, दगड लावून कारंजासारखे बनविण्याचा जबरदस्तीने प्रयत्न कोणी व केव्हा केला? असे अनेक प्रश्न आहेत; ज्याची उत्तरे न्यायालयात मिळणार आहेत.  मात्र, त्या आधीच भडक विधाने करणे म्हणजे मस्ती आहे. महबुबा मुफ्ती यांनी तर पाकिस्तानची भाषा बोलत राहण्याचा चंगच बांधला आहे. त्या म्हणाल्या की, आमच्या मशिदीतच यांचे भगवान सापडतात. अरे व्वा! याला म्हणतात, 'चोराच्या उलट्या...' जेथे हिंदूंचे भगवान आहेत तेथेच नेमके हल्ले करून जर इस्लामलाही मान्य नसलेल्या मशिदी बनविल्या असतील तर भगवान तेथेच तर सापडणार!

१९९१ च्या कायद्याचा संदर्भ देत आधी ओवैसी यांनी आक्षेप घेतला आणि मग त्यातील संकेत लक्षात घेऊन कोणीतरी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ग्यानवापी मशिदीत शिवलिंग सापडताच फिर्यादीच्या मागणीवरून वाराणसी न्यायालयाने शिवqलग सापडलेली जागा संरक्षित करून तेथे इतर कोणाला प्रवेश करू न देण्याचे निर्देश दिले होते. त्याला आव्हान देत मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही शिवलिंग सापडले ती जागा संरक्षित करावी, असे म्हटले आहे. या विषयातील अन्य निर्णय जिल्हा न्यायालयातच होतील, असे स्पष्ट करून याचिका फेटाळली आहे. १९९१ चा कायदा स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची धार्मिक स्थळे जैसे थे ठेवण्याचा आहे. अयोध्येचा श्रीराम जन्मभूमीचा विषय अगदी ऐरणीवर आला तेव्हा तथाकथित सेक्युलर पक्षांनी सोयीसाठी हा कायदा केला. त्याचा गैरफायदा किती घेणार? काँग्रेसचे उत्तरप्रदेशातील नेते सलमान खुर्शीद यांनी १९९१ चे तुणतुणे लावत ग्यानवापी मशिदीतील सर्वेक्षण करणेच चुकीचे असल्याचे म्हटले आहे. १९९१ च्या कायद्याचा आधार घेत इतिहासात केलेल्या अन्यायावर पांघरूण घालत उद्दामपणे इतरांची श्रद्धास्थाने अवमानित करीत राहण्याचे स्वातंत्र्य कोणी घेता कामा नये.

 

मात्र, काही नवीन तथ्ये समोर आली तर, न्यायालयात त्याबाबत निर्णय झाला तर त्यात गैर काही नाही. कायद्याचा अर्थ लावणे हेच तर न्यायालयाचे काम आहे. न्यायालयाने नेमलेले आयुक्त अजय मिश्रा यांना न्यायालयानेच हटविले आहे. त्यांनी सर्वेक्षणादरम्यान खाजगी छायाचित्रकारासोबत घेऊन माहिती फोडल्याचा आरोप आहे. असले उपद्व्याप करण्याची गरज नव्हती. ग्यानवापी मशीद आणि काशी विश्वनाथाचे मंदिर यामध्ये एक प्राचीन नंदी आहे. नेहमीप्रमाणे नंदीचे तोंड आज असलेल्या मंदिराकडे नाही तर मशिदीत जेथे शिवलिंग सापडले त्या जागेकडे तोंड करून आहे. ते शिवलिंग काशी विश्वनाथाचेच आहे, याचा हा एक पुरावाच म्हटला पाहिजे. कारण, शिवमंदिरात नंदीचे तोंड शिवलिंग सोडून भलतीकडे कधीच नसते. ग्यानवापी मशिदीत आणखी बरीच हिंदू मंदिरे आहेत, अशी चिन्हे आढळून आल्याची माहिती बाहेर आली आहे. मशिदीत भिंतीवर मगरीचे चित्र, स्वस्तिकसारखी चिन्हे आढळून आली आहेत. या संदर्भात आणखी एक याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी सापडलेले शिवलिंग आणि बाहेरील नंदी यांच्यातील भिंत पाडावी आणि शिवलिंगाचे अंतर, आकार यांचे मोजमाप करावे, अशी मागणी केली आहे. अर्थात या सर्वांचा अंतिम निर्णय न्यायालयानेच केला पाहिजे आणि तो सर्वांनी मानला पाहिजे. विश्व हिंदू परिषदेने न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार असल्याची भूमिका घेतली आहे. जूनमध्ये हरिद्वार येथे होणा-या संत संमेलनात यावर विचारविनिमय होणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेने जाहीर केले आहे. अजून या प्रकरणात तथाकथित पुरोगामी आणि ढोंगी सेक्युलर यांनी हस्तक्षेप केलेला नाही. काँग्रेसने अजून या विषयात अधिकृत भूमिका घेतलेली नाही.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर अत्यंत देखण्या पद्धतीने विकसित केला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील राजकीय क्षेत्रात हिंदुत्वाचा विचार अग्रस्थानी पोहोचला आहे. राजकीय निर्णयशक्ती हिंदू विचारांवर केंद्रित होत आहे, असे दिसताच अनेक राजकीय पक्षांचे नेते जानवेधारी हिंदू असल्याची जाहिरात करण्यापर्यंत गेले आहेत. मंदिरांचे उंबरठे नेतेमंडळी झिजवत आहेत. निवडणूक प्रचाराची सुरुवात अयोध्येतून केली जात आहे. अयोध्येला जाण्यासाठी स्पर्धा लागल्यासारखे चित्र दिसते आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाने या सगळ्या व्यवहाराला आणखी बळ मिळणार आहे. हिंदू विचारांची जागृती करण्यासाठी पिढ्या खपविणा-या संघटना आणि कार्यकर्ते यांच्या परिश्रमाचे परिणाम जणू दिसू लागले आहेत. ग्यानवापी मशिदीतील अनेक वर्षे दबून राहिलेले सत्य बाहेर आल्याने देशातील विश्वासाला, निखळ श्रद्धा व्यवहाराला, विकासाला गती मिळणार आहे.