कायद्याच्या मर्यादा

    दिनांक : 21-May-2022
Total Views |
कायदे जर का खरोखरच जनमानसांच्या नैतिक संवेदनांचे मूर्त स्वरूप असतील, तर या बदल्यात काळाला सुसंगत बदलही त्यात करून घेतले पाहिजे. आज जे काही मागितले जात आहे, ते अत्यंत सनदशीर मार्गानेच मागितले जात आहे. मात्र, त्यांच्या भावनांची जर अशी बेअदबी केली गेली, तर कायद्यांवरचा विश्वास उडून जाईल!
 
Limitations of law 
 
'जनमानसाच्या नैतिक संवेदनांचे मूर्त स्वरुप म्हणजे कायदा’ अशा आशयाचे विल्यम ब्लॅकस्टोन यांचे विधान आहे. विधीतज्ज्ञ ते कायदेमंडळाचा सदस्य व इंग्रजी राज्यघटनेच्या कायदे अंमलबजावणीत ब्लॅकस्टोन यांचे मोठे योगदान आहे. ब्लॅकस्टोन यांनी लिहिलेल्या चार खंडांतल्या कायदेविषयक पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या आहेत. दुसर्‍या महायुद्धापर्यंत त्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत होत्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यात भर घालून त्या वाचकांसमोर आल्या. सध्या कायद्यांच्या बाबतचे जे प्रश्न निर्माण होत आहेत, ते पाहिले की, कायद्यांच्या ठरावीक कालखंडानंतर केल्या जाणार्‍या मूल्यमापनाची गरजही लक्षात येते. ज्ञानवापी मशिदीपासूनते घडणार्‍या निरनिराळ्या घटनांपर्यंत आपल्याला हाच समान धागा दिसून येईल. ज्ञानवापी किंवा अन्य महत्त्वाच्या हिंदूंच्या प्रार्थनास्थळांबाबतीत याचा पुन्हा विचार करावा लागेल.
 
हिंदू कायद्यासमोर झुकतात, मात्र त्यांच्या झुकण्याचा न्यायालये कसा अर्थ लावतात, हे समजायला वाव नाही. ज्ञानवापीचा ढाचा ज्याप्रकारे उभा केला गेला आहे, तो पाहिला की, तिथे पूर्वी मंदिर होते, हे कुणा सामान्य माणसालाही कळावे. थोडा विचार केला आणि ऐतिहासिक संदर्भ शोधायचा प्रयत्न केला, तर जे समोर येते तेही सगळ्यांसमक्ष आहे. नानासाहेब पेशवे ते अहिल्याबाई होळकरांपर्यंत अनेकांच्या वाटाघाटीत व दप्तरांमध्ये या प्रार्थनास्थळांबाबत चर्चा आढळून येते. न्यायासाठी आज जे काही सुरू आहे, ते पाहाता यातून कोणाचे मनोबल उंचावेल, याचा विचार केला पाहिजे.
 
ज्ञानवापी मशिदीतल्या वजूखान्यात जे शिवलिंग सदृष्य अस्तित्वात आहे, ते कारंजे असल्याचा दावा मुस्लीम पक्षकारांनी केला. आता मुद्दा असा की, मग त्याला पाणीपुरवठा करणारी छिद्रे काही नाहीत, यावर अद्याप काहीच चर्चा होताना दिसत नाही. न्यायालयाने हे सगळे ‘आस्ते कदम’ चालविले आहे. न्यायदानाची गरिमा कायम राहावी, हा त्यामागचा उद्देश दिसतो. मात्र, ज्या प्रकारच्या कायद्यांच्या आधारावर हे आता चालू आहे, ते एक दिवस बालीश भासू लागेल, ही त्यामागची खरी भीती आहे. १९९१च्या धार्मिक स्थळे संरक्षण कायद्याचा आधार घेऊन विरोधी पक्षकारांचे सबब मांडणे चालू आहे. मूळ मुद्दा हा की, अशा तकलादू तर्कावर हा ऐतिकासिक लढा कसा मागे लोटता येणार? एक तर १९९१ साली हिंदू समाजाची जी मानसिकता होती, ती आज नाही. आज २०२२ आहे आणि हिंदू समाज त्याच्या न्याय आणि हक्कांसाठी न्यायालयासमोरच्या घंटा वाजवित आहे. खरंतर हा प्रश्न कायद्याचा नाही. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जे प्रयोग या देशात झाले, त्यात हिंदूंनीच सर्वाधिक सोशिक भूमिका घेतली आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात यंदा जे काही घडले, त्यावर कडी म्हणून आपला ‘सर्वधर्मसमभाव’ आळविण्यासाठी शरद पवारांची पाटी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आता असले प्रयोग यशस्वी होतातच. मात्र, एखाद्या मशिदीत हनुमान जयंती साजरे करण्याचे प्रयोग का यशस्वी होत नाहीत? त्यांचे अनुयायी सुद्धा असे का करीत नाही? हिंदू समाजाच्या घटनादत्त अधिकारांवर हल्ला करून त्यांची मंदिरे पाडून त्यांवर मशिदी चढवून त्यांचा मानभंग केला जातो. हिंदूंना डिवचण्यासाठी त्याचे काही अवशेष मुद्दाम मागे ठेवले जातात.
 
काहींना यात अडाणीपणा दिसतो. पण, हा केवळ राजकीय संदेश असतो. संकटात जर तुम्ही परमेश्वराचे स्मरण करणार असाल, तर आम्ही त्यांचाही मानभंग करू शकतो. बामियानच्या बुद्ध मूर्तीचे काय झाले? यामागे काय मानसिकता असते, हे समजून घ्यायचे असेल, तर झाकीर नाईक नावाच्या माथेफिरुची भाषणे ऐकली पाहिजेत. या देशावर मुघलांचे राज्य होते आणि ब्रिटिशांनी हा देश मुघलांच्या ताब्यातून घेतला. त्यामुळे तो परत मिळविण्याचे व त्यावर राज्य करण्याचे नैतिक कर्तव्य आमचे आहे, असे मुस्लिमांमधल्या एका वर्गाला सतत वाटते. समाजमाध्यमांवर तसे बरेचसे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हाच धर्मांधांच्या विचारांचा केंद्रबिंदू ठरतो. हिंदूंच्या या लढ्यात या पक्षकारांचे साथीदार कोण असतात, तर बिनबुडाचे छद्मपुरोगामी लोक. या मंडळींना अशा लोकांना चाव्या मारून समाजातील तेढ निर्माण करण्यात व ती कायम ठेवण्यातच रस असतो. तसे झाले तरच यांच्या ‘अमन की आशा’छाप कार्यक्रमांना जागा मिळते. आता मुसलमानांनाच ठरवावे लागेल की, आपण काय सिद्ध करणार आहोत? हिंदू गेली अनेक वर्षे केवळ ही तीन-चार प्रार्थनास्थळे मागत आहेत. ती अत्यंत मोठ्या मनाने हिंदूंना सोपविणे, हेच मुस्लिमांसाठी सगळ्यात श्रेयस्कर आहे. कायदे जर का खरोखरच जनमानसांच्या नैतिक संवेदनांचे मूर्त स्वरूप असतील, तर या बदल्यात काळाला सुसंगत बदलही त्यात करून घेतले पाहिजे. आज जे काही मागितले जात आहे, ते अत्यंत सनदशीर मार्गानेच मागितले जात आहे. मात्र, त्यांच्या भावनांची जर अशी बेअदबी केली गेली, तर कायद्यांवरचा विश्वास उडून जाईल!