'महाराष्ट्राचे कृषिनायक'

    दिनांक : 20-May-2022
Total Views |
‘विवेक’ प्रकाशित ‘महाराष्ट्राचे कृषिनायक’ या ग्रंथाचे प्रकाशन ‘कृषी विवेक’ व ’पार्क’ (पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर)च्यावतीने आज शुक्रवार, दि.२० मे रोजी सायं. ५ वाजता मुंबईतील माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमध्ये करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ग्रंथाचा परिचय करून देणारा हा लेख.
 
 
krushi1
 
 
 
महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाची समृद्धी वाढावी यासाठी येत्या काळात शेतकरी केंद्रभूत धरून आजच्या ज्या शासकीय योजना, नवे तंत्रज्ञान, भांडवली गुंतवणूक, बाजारपेठीय समज, विविध प्रकारच्या व्यावसायिक धोक्याचा विचार यावर वास्तवदर्शी व प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे विचारमंथन व्हावे व त्यासाठी या सर्व क्षेत्रात काम करणार्‍या विश्वासार्ह घटकांना ’कृषी विवेक’ व ’पार्क’ (पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर) च्या व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
 
ग्रामीण क्षेत्रातला अनुभव असा आहे की, प्रत्यक्ष उदाहरणे पाहूनच विकासाला चालना मिळत असते. यादृष्टीने ‘कृषी विवेक’ व ‘पार्क’ या दोन संस्थांच्यावतीने शेतकर्‍यांसाठी दीपस्तंभ ठरू शकतील अशा यशस्वी, प्रयोगशील शेतकर्‍यांचे दस्तावेजीकरण ‘महाराष्ट्राचे कृषिनायक’ या ग्रंथाद्वारे करण्यात आले आहे. नव्या पिढीसमोर त्यांच्याच आजूबाजूची काही प्रेरक उदाहरणे ठेवणे आणि त्यांच्या आशा -आकांक्षाना, प्रयत्नांना दिशा देणे, हा ग्रंथ प्रयोजनामागचा हेतू आहे.
 
४३२ पृष्ठांचा हा ग्रंथ एकूण १६ कृषी घटकांत विभागला गेला आहे. या ग्रंथाचे सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे हा ग्रंथ माहितीपर असला तरी तो रूक्ष झालेला नाही. प्रत्येक विभाग हा सुटसुटीत, नेमक्या शब्दांमध्ये मांडण्यात आला असून, त्याची शीर्षकेही तितकीच लक्षवेधी आहेत. प्रत्येक शीर्षकातून त्या त्या विभागातील शेतकर्‍यांचे यश प्रतित होते. ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचा प्रस्तावनापर लेख कृषी अभ्यासक, विद्यार्थी व कृषी धोरणकर्त्यांनी अवश्य वाचण्याजोगा आहे. भारत सरकारचे माजी कृषी आयुक्त डॉ. चारूदत्त मायी हे ग्रंथास अतिथी संपादक म्हणून लाभले आहेत.
ग्रंथाच्या पहिल्या तीन विभांगामध्ये तृणधान्य, कडधान्य आणि नगदी पिकांचा समावेश आहे. यात खपली गहू, हातसडी तांदूळ, ज्वारी, तूर, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, ऊस, हळद, कापूस आणि कांदा पिकांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकर्‍यांच्या प्रयोगाची माहिती देण्यात आली आहे.
 
विभाग चारमध्ये ’फळबाग’ हा घटक समाविष्ट आहे. यामध्ये दुष्काळी जत तालुक्यात नारायण देशपांडे यांच्या प्रकल्पाने राबविलेला ५५० एकरांवरचा ‘ड्रॅगन फ्रुट’ प्रयोगाची गोष्ट वाचायला मिळते. दौंड तालुक्यातील मळद गावात राबविण्यात येत असलेला १३० एकरांवरील डाळिंब शेतीचा प्रयोग असो किंवा कोकणातील हरिश्चंद्र देसाई यांच्या फणसाची शेतीची गोष्ट वाचायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे, उस्मानाबादसारख्या दुष्काळी भागात नितीन सावंत या शेतकर्‍याने सफरचंद व ‘ड्रॅगन फ्रुट’ची यशस्वी शेती करून दाखवली आहे. नाशिकच्या कृष्णा भामरे यांच्या १०० एकरांवरील द्राक्ष शेतीचा प्रयोग, सोलापूर जिल्ह्यातील राजेंद्र देशमुख यांनी खजूर शेतीतून आपली प्रयोगशीलता सिद्ध केली आहे. शिवाय, केळी, आंबा, सीताफळ, पेरू, संत्री, अंजीर, स्ट्रॉबेरी, चिंच, सुपारी, चिकू, मोसंबी, बांबू आणि शेवगा या फळबाग लागवडीतून शेतकर्‍यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सर्वांची दखल या विभागात घेण्यात आली आहे.
 
पाचवा विभाग हा भाजीपाला घटकावर आधारित आहे. विनायक गेडेकर हे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात बारमाही भाजीपाल्याची शेती विकसित केली आहे. जळगावची भरीत वांगी, पुण्याच्या सचिन गायकवाडची पुदिना शेती, औरंगाबादच्या अजय जाधवची गावरान पालेभाजी, नंदुरबारच्या कैलास पाटलांची मिरची शेतीची दर्शन या विभागात घडते.
 
सहावा आणि सातवा विभाग हा एकात्मिक/शाश्वत शेती व सेंद्रिय शेतीवर आधारलेला आहे. सध्याचा काळ हा शाश्वत/सेंद्रिय शेतीचा काळ समजला जातो. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करताना दिसताहेत. मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी अंकुश पडवळे व औरंगाबाद येथील जगन्नाथ तायडे यांचा शाश्वत/सेंद्रिय शेतीचा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. तसेच, राज्यातला सेंद्रिय शेतीसाठीचा पहिला पुरस्कार प्राप्त करणारे बीड जिल्ह्यातील शेतकरी शिवराम घोडके यांच्यासह अनेक प्रेरककथा या विभागात आहेत.
 
आठवा विभाग हा औषधी व फुलशेतीवर आधारीत आहे. पुणे जिल्ह्यातील तरुण शेतकरी विरेंद्र कुट्टी यांची ऑर्किड शेती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदय वेलणकर यांची चाफ्याची शेती, नांदेड जिल्ह्यातील डॉ. कदम यांच्या औषधी शेतीचे प्रयोग या विभागात वाचायला मिळतात. नववा भाग हा आधुनिक शेती तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. यामध्ये पीक, पाणी व्यवस्थापानात मॉडेल विकसित करणारे डॉ. दत्तात्रय वने, आधुनिक शेतकरी राहुल रसाळ, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे पॅटर्न निर्माण करणारे हेमंत जयस्वाल आदींच्या यशकथा या विभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
आशेचे आणि बदलाचे बीज पेरणार्‍या २० हून अधिक महिला शेतकर्‍यांच्या गाथा ’आधुनिक भूमिकन्या’ या दहाव्या भागात वाचायला मिळतात. सलग ३३ वर्षे गवार शेती करणार्‍या कोल्हापूरच्या महिला शेतकरी सुरेखा पाटील, महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या अनिता माळगे, दीड एकरांत कृषिक्रांती घडवून आणणार्‍या वैशाली घुगे यांच्यासह अनेक यशस्वी महिला शेतकर्‍यांच्या कथा आहेत.
 
११ व १२ हा विभाग शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योग यावर आधारित आहे. यामध्ये मत्स्य, दुग्ध, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी, वराहपालन, लाकडी घाणा, गांडूळ खत अशा विविध शेतीपूरक व्यवसायात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या शेतकर्‍यांच्या कथा आहेत. कोल्हापूरच्या आकाश मोटके पाटील यांचा दूध प्रक्रिया उद्योग, नांदेडच्या मारोतराव कवळे गुरुजींचा दूध आधारित उद्योग, जळगावचा केळी प्रक्रिया उद्योग, तात्यासाहेब फडतरेंचा ज्वारी प्रक्रिया उद्योगासह विविध प्रकल्पाची गाथा आहेत.
 
विभाग १३ मध्ये महाराष्ट्रातील काही यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश करण्यात आला, तर विभाग १४ मध्ये राज्यातील देवणी, लाल कंधारी, खिलार, गवळाऊ आदी देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनासाठी कार्य असलेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांची माहिती मिळते.
 
विभाग १५ हा ’कृषिग्राम’ वर आधारलेला आहे. यामध्ये बारीपाडा, हिवरेबाजार, कडवंची, खाणू, राजूरी, आरोली, केंदूर आदी गावांनी शेतीमधून ग्रामविकास कसा साधला आहे, हे लक्षात येते. महाराष्ट्राला महान व्यक्तींची परंपरा लाभली आहे. त्यामुळेच आपले राज्य विविध क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. शेतीमातीसाठी नेहमीच तत्पर असलेले व नवनवीन प्रयोग करणारे चंद्रशेखर भडसावळे, ‘पद्मश्री’ राहीबाई पोपरे, ‘पद्मश्री’ शरीफ सय्यद, मराठवाड्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून कृषिक्रांती घडवून आणणारे कृषी उद्योजक बी. बी. ठोंबरे यांच्यासह अनेक महनीय व्यक्तींचा परिचय ’कृषी चिंतक’ या शेवटच्या विभागात करून देण्यात आला आहे.
 
एकूणच कृषी अभ्यासक, विद्यार्थी व नव्याने शेतीत उतरू पाहणार्‍यांनी हा ग्रंथ वाचालाच पाहिजे, शिवाय कृषी घडामोडी विषयी कुतूहल बाळगणार्‍या वाचकांना हा ग्रंथ नक्कीच पंसतीस उतरेल, याचा विश्वास वाटतो.