काँग्रेस-चीन मधुर संबंध

    दिनांक : 18-May-2022
Total Views |

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच्या काँग्रेसच्या कारवाया पाहिल्यास तो पक्ष भारतधार्जिणा नव्हे, तर चीनधार्जिणा झाल्याचेच दिसून येते. आता अशाच एका प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची चौकशी होईलच, पण त्यांनी जे पाप केले त्याची शिक्षाही मिळाली पाहिजे.
 
 
 
chidamaram
 
 
 
 
मोदी सरकारवर बेरोजगारीवरून टीका करणार्‍या काँग्रेसने पी. चिदंबरम गृहमंत्री असताना भारतीयांना सोडून थेट २५० पेक्षा अधिक चिन्यांना ‘व्हिसा’ आणि रोजगार दिल्याचा भयंकर प्रकार नुकताच उघड झाला. केंद्रीय अन्वेषण विभाग पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणात ‘फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’ (एफआयपीबी) ‘क्लिअरन्स’बाबत आधीपासूनच चौकशी करत आहे. ‘एअरसेल-मॅक्सिस करार’ आणि ‘एफआयपीबी’द्वारे ‘आयएनएक्स मीडिया’ला ३०५ कोटींचा परकीय निधी मिळवण्याची मंजुरी देण्याशी संबंधित अनेक प्रकरणांत कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे.
 
त्यांनी हा परकीय निधी आपले वडील पी. चिदंबरम गृहमंत्री असताना वसूल केला होता. ‘सीबीआय’ला ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणाची चौकशी करतानाच कार्ती चिदंबरम यांनी आपल्या गृहमंत्रिपदावरील वडिलांच्या प्रभावाचा वापर करून चिन्यांना ‘व्हिसा’ दिल्याविषयीची माहिती मिळाली. त्यावरुनच कार्ती चिदंबरम यांच्यावर ‘तलवंडी साबो पॉवर लिमिटेड’ प्रकल्पात काम करणार्‍या चिनी अभियंत्यांना ‘व्हिसा’ दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या सत्ताकाळात कार्ती चिदंबरम यांनी ५० लाखांची लाच घेऊन शेकडो चिन्यांना ‘व्हिसा’ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
यावरून आता ‘सीबीआय’ने कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, मंगळवारी कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित चेन्नई, दिल्ली, मुंबई, कर्नाटक, पंजाब आणि ओडिशात छापेमारीही केली. कार्ती चिदंबरम यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर असून, चीनचे मनसुबे आणि कर्तृत्व पाहता काँग्रेसच्या नियतवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याशिवाय राहत नाही. चिनी लोकांना ‘व्हिसा’ देऊन भारतात आणणे आणि रोजगार देण्यापर्यंतचा हा साधा प्रकार आहे असे नाही. त्यामागे नक्कीच भारतविरोधी राजकारण आहे आणि त्याला काँग्रेसची मूकसंमती असल्याचेही म्हणता येते.
 
कारण, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच्या काँग्रेसच्या कारवाया पाहिल्यास तो पक्ष भारतधार्जिणा नव्हे, तर चीनधार्जिणा झाल्याचेच दिसून येते. त्याची अनेकानेक उदाहरणे असून त्यातून पी. चिदंबरम यांच्यासारखे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच नव्हे, तर गांधी कुटुंबही संशयाच्या भोवर्‍यात सापडते. आता कार्ती चिदंबरम यांची चौकशी होईलच, पण त्यांनी जे पाप केले त्याची शिक्षाही मिळाली पाहिजे.
 
महत्त्वाचे म्हणजे, आज कार्ती चिदंबरम आणि चीनमधील संबंध जगजाहीर झाले, पण काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि चीनमध्येही मधुर संबंध असल्याचे सातत्याने समोर येत असते. गलवान खोर्‍यात भारतीय सैनिक चिन्यांनी अचानक केलेल्या कुरापतीला जशास तसे प्रत्युत्तर देत असताना ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला दानाच्या नावाखाली चीनकडून कोट्यवधी रुपये मिळाल्याचे उघडकीस आले होते. चिनी दुतावासाने २००५, २००६, २००७ आणि २००८ मध्ये ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला निधी दिला होता. ‘राजीव गांधी फाऊंडेशन’च्या 2005-06 सालच्या वार्षिक अहवालातही यासंबंधीची माहिती देण्यात आली होती.
 
पुढे, ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ने भारत आणि चीनमध्ये मुक्त व्यापार कराराला पूरक अनेकदा संशोधन, अभ्यास केला आणि २०१० मध्ये दोन्ही देशांत ‘एफटीए’ची आवश्यकता असल्याची शिफारस केली. त्यानंतर मात्र २००३-०४ ते २०१३-१४ मध्ये भारताची चीनबरोबरील व्यापारी तूटीत ३३ टक्क्यांची वाढ झाली. याव्यतिरिक्त २००८ साली काँग्रेस आणि चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात एका करारावर स्वाक्षरीही करण्यात आली. तीदेखील सोनिया गांधींच्या उपस्थित राहुल गांधींच्या हस्ताक्षरात.
 
जगात एखाद्या देशातील सत्ताधारी पक्षाने दुसर्‍या देशातील सत्ताधारी पक्षाशी करार केल्याचा हा पहिलाच प्रकार असावा. कारण असे कधीही होत नाही, करार दोन देशांत होतात. पण, काँग्रेसने तसे केले, त्यामागे काँग्रेसचा आणि गांधी कुटुंबाचा कोणता डाव होता? तो करार गोपनीय का राखला गेला? त्यात भारताविषयची संवेदनशील माहिती चीनला देण्याचे ठरले होते का?, असे प्रश्न उपस्थित होतात, ज्यांची उत्तरे काँग्रेसने कधीही दिलेली नाहीत. डोकलाम वादातही भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना पुढे येण्यापासून रोखले तर त्यावेळी राहूल गांधी मात्र लपून छपून चिनी राजदूताच्या भेटीला गेले होते.
 
पुढे चिनी कम्युनिस्ट पक्षाने राहुल गांधींच्या काँग्रेसाध्यक्षपदावरील निवडीचे अभिनंदन करणारे एक पत्रही पाठवले. त्यातून काँग्रेस आणि चीनमध्ये दृढ संबंध असल्याचे स्पष्ट झाले. राहूल गांधी डोकलाम वादावेळच्या राहुल गांधींच्या भेटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आणि त्याचा फायदा चीनने घेण्याचा उद्देश होता. पण, भारतीय जनता मोदींच्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि राहुल गांधींच्या भारतविरोधी प्रयत्नांना यश आले नाही.
 
आता राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या मालकीच्या काँग्रेस पक्षाचेच ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पुत्राशी संबंधित प्रकरण समोर आले. त्यात चिन्यांना भारतात आणताना कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नाही, असे दिसून येत आहे. पण, हा प्रकार फक्त २५० पेक्षा अधिक चिनी नागरिकांपर्यंतच मर्यादित असेल का? पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून जीव वाचवून भारतात आलेल्या हिंदूंच्या नागरिकत्वाचा काँग्रेस सरकारने कधीच विचार केला नाही.
 
पण, त्यांनी अक्साई चीन हडपणार्‍या, अरुणाचल प्रदेशवर दावा करणार्‍या चीनच्या नागरिकांना भारतात आणले, तसे इतरही देशांतील, प्रामुख्याने भारताशी उभा दावा मांडणार्‍या पाकिस्तानातील लोकांना भारतात आणले असेल का? मागे एकदा काँग्रेसचेच नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदी सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीचे विधान केले होते. ते कशाच्या जोरावर? काँग्रेसचे पाकिस्तानशीही उत्तम संबंध आहेत म्हणून का? नुकतेच राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्यात काँग्रेसींनी नेमके काय चिंतन केले हे जाहीर झालेले नाही. पण, त्या पक्षाने कितीही चिंतन केले आणि चीन, पाकिस्तानशी सलगी केली,तर काँग्रेसच्या कोणत्याही शिबिराचा निवडणुकीच्या राजकारणात काहीही उपयोग होणार नाही. जनता काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, कारण, जनतेने काँग्रसचे नव्हे, तर देशाच्या भवितव्याचे चिंतन केलेले आहे, देश योग्य हाती सोपवला आहे.