उत्तर जशास तसे!

    दिनांक : 17-May-2022
Total Views |



उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा पठण करू पाहणार्‍यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्यांना तुरुंगात टाकले. शनिवारच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बिनबुडाचे आरोप केले. अशा हिंदूद्रोही आणि सत्तेला चिकटून राहण्यासाठी सर्व प्रकारची पातळी सोडणार्‍या व्यक्तीला त्याच्या पातळीवर जाऊन भिडणे आवश्यक आणि तेच काम देवेंद्र फडणवीसांनी केले.
 

thakare 
 
 
 
राजकीय सभा कशी असावी, याचा वस्तुपाठ माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारच्या गोरेगावमधील सभेतून दाखवून दिला. त्याआधी शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘बीकेसी’त सभा घेतली, पण त्यात भाजपद्वेषाव्यतिरिक्त काहीही नव्हते. आपण ज्या पदावर आहोत, त्या पदाच्या दर्जाचे बोलायला हवे, याचे भानही त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राखले नाही. त्या उद्धव ठाकरेंना भानावर आणणारी सभा देवेंद्र फडणवीसांनी घेतली. याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा बाबरी ढाँचा पाडणारच, असा खणखणीत इशारा दिला.
 
हिंदूद्वेष्ट्या बाबराने आपल्या राजवटीत देशातील हिंदूंना जगणे असह्य करुन ठेवले. हिंदू मठ-मंदिरांना बाटवण्याचे काम केले. कहर म्हणजे, याच बाबराच्या नावाने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी मशिदीचा ढाँचाही उभारला गेला. त्याविरोधात हिंदूंनी कित्येक शतके संघर्ष केला, प्राणांचे बलिदान दिले, पण हार मानली नाही. आज हिंदूंच्या संघर्षाचा परिपाक म्हणून अयोध्येत श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराममंदिराची निर्मिती केली जात आहे. उद्धव ठाकरेंनी सत्ता हाती घेतल्यापासूनच त्यांचा कारभार बाबराची बरोबरी करणाराच राहिला.
हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे, हिंदू साधूंची दगडाने ठेचून हत्या केली गेली, तरी त्यावर तत्काळ कार्यवाही करायची नाही, हिंदू सण-उत्सवांवर कठोर निर्बंध लादायचे, हिंदुत्ववाद्यांनीच दंगली केल्या असे म्हणणार्‍यांना प्रवक्तेपदावर ठेवायचे, असली कामे उद्धव ठाकरेंनी करुन दाखवली. त्याचवेळी धर्मांध मुस्लिमांना मात्र मोकळे रान मिळाले. रझा अकादमीने धमकी देताच उद्धव ठाकरेंचे सरकार नरमले आणि त्यांनी ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकांची परवानगी दिली. रझा अकादमीने मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये दंगली घडवूनही त्यावर उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंदी घातली नाही. शरजिल इमाम देव, देश आणि धर्माविरोधात वाट्टेल ते बरळून गेला, तरी उद्धव ठाकरेंच्या सरकारने त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून धुंडाळले नाही. या महिन्यात तर उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून ‘एमआयम’च्या अकबरुद्दीन ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला, फुले वाहिली. पण, उद्धव ठाकरे मात्र औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची काय आवश्यकता, असे ओशाळवाणे विचारत राहिले. हा उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा बाबरी ढाँचा नव्हे तर काय? तो ढाँचा समस्त हिंदू समाज उद्ध्वस्त करेलच आणि त्याचाच शंखनाद फडणवीसांनी केला.
 
आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे वा शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी पातळी सोडल्याचा आरोपही केला जात आहे. पण, त्याआधी कोणी पातळी सोडली होती? उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेच्या गल्लीतल्या नेते-कार्यकर्त्यांच्या तोंडूनही देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातला विखार बाहेर पडत असतो. रामायणात वालीने पातळी सोडली, तर त्याचा वध करण्यासाठी प्रभू श्रीरामालाही झाडामागूनच बाण मारावा लागला. समोरचा जसा वागत असेल त्याच्याशी तसेच वागले तरच अनाचाराचा, दुराचाराचा नाश होऊ शकतो, ही यातली शिकवण.
 
देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरे, शिवसेना जसे आहेत, तसेच बोलले, त्यातल्या एका शब्दालाही वावगे म्हणता येणार नाही. त्यांच्याआधीही पातळी सोडण्याचा उद्योग राज्यातील ज्येष्ठ नेत्याने आणि उद्धव ठाकरे सरकारच्या आधारवडाने केला होता. पण याकडे ना संजय राऊतांचे लक्ष गेले, ना सुप्रिया सुळेंचे, ना मराठी माध्यमांचे. कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ शीर्षकाची कविता 90च्या दशकात प्रसिद्ध झाली. पण, त्या कवितेची वाट लावताना शरद पवारांनी त्यात आपल्या मनमर्जीने वाटेल ते शब्द घुसडले आणि ‘साल्यांनो... तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत,’ अशी असभ्य भाषा वापरली. शरद पवारांनी कवितेत नसलेले शब्द उच्चारुन महाराष्ट्रासह भारतातील आणि जगातील कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा इतका मोठा अपमान करणे काय पातळी राखणे होते का? तर नव्हे त्यातून फक्त आणि फक्त हिंदूद्वेषच दिसून येत होता.
 
जसा बाबर, औरंगजेबाने केला तसा. तेच शरद पवार उद्धव ठाकरेंच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. मार्गदर्शकच अशा तर्‍हेचे म्हटल्यावर उद्धव ठाकरेही त्याच पातळीचे असणार हे आलेच. शरद पवारांनी स्वतःला ‘देवाचे बाप’ म्हटले, तर उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा पठण करू म्हणणार्‍यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्यांना तुरुंगात टाकले. शनिवारच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बिनबुडाचे आरोप केले. अशा हिंदूद्रोही आणि सत्तेला चिकटून राहण्यासाठी सर्व प्रकारची पातळी सोडणार्‍या व्यक्तीला त्याच्या पातळीवर जाऊन भिडणे आवश्यक आणि तेच काम देवेंद्र फडणवीसांनी केले.
 
उद्धव ठाकरेंनी शनिवारच्या सभेतून भाजपचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा निराधार दावा केला. कारण, शिवसेनेत धुगधुगी राहावी आणि मराठी माणसाने विकासाच्या मुद्द्याऐवजी भावनिक मुद्द्यावर फक्त शिवसेनेला साथ द्यावी, यासाठी उद्धव ठाकरेंना त्याची गरज आहे. सत्तेत असूनही मुंबईकरांच्या कोणत्याही समस्या सोडवता न आलेल्या अपयशी पक्षाला आणि पक्षप्रमुखाला आता आधार फक्त मुंबई तोडण्यावरून रडारड करण्याचाच आहे. पण, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या दाव्यातली हवाच काढून घेतली. भाजपला मुंबई मुक्त करायचीय ती उद्धव ठाकरेंच्या, शिवसेनेच्या भ्रष्टाचारी, अत्याचारी, अनाचारी, दुराचारी कारभारापासून.
 
जोपर्यंत त्यांच्या हातातून मुंबई मुक्त होणार नाही, तोपर्यंत मुंबई आधुनिक काळातील व शहराच्या गरजांनुरूप विकसित होऊ शकणार नाही. आज मुंबईतील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेली आणि ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती मिळालेली अनेक कामे पाहिली की त्याची खात्री पटते. यापुढेही मुंबई आणखी बकाल होऊ द्यायची नसेल आणि जागतिक दर्जाचे शहर करायचे असेल, तर त्याचा कारभार खंडणीखोरीत गुंतलेल्यांकडे असायलाच नको. त्याचीच तयारी भाजपकडून सुरू आहे, त्याला मराठी माणसापासून प्रत्येक मुंबईकराकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच पायाखालची जमीन सरकलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा आरोप केला. पण, कोणत्याही राजकारण्याच्या कितीही पिढ्या आल्या, तरी तसे होणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी हेच सांगितले आणि उद्धव ठाकरेंचा दावा निरर्थक ठरला.