हा तर काँग्रेसी पोपट!

    दिनांक : 16-May-2022
Total Views |
काँग्रेसने वर्षानुवर्षे देशाची सत्ता उपभोगताना जसा स्वांतत्र्यलढ्याच्या इतिहासाची विटंबना करत स्वातंत्र्यलक्ष्मीसाठी सर्वस्वाचा होम केलेल्या इतर सर्वच स्वातंत्र्यसेनानींचा अपमान केला, तोच काँग्रेसी प्रपोगंडा आता उद्धव ठाकरेरुपी पोपटाच्या तोंडातून बाहेर पडत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
 
 
 

Udhav-Soniya
 
 
 
ज्याला आपण अलिबाबा समजत होतो तो एक्केचाळीसावा चोर निघाला, तर आपल्याला जसे वाटेल तसेच, आता उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून वाटते. राजकारणात बेरीज-वजाबाकी चालू असते. काळानुरूप गुणाकार आणि भागाकारही चालतात. नको असलेले फेकून द्यावे लागतात आणि नको ते जवळही करायला लागतात. राजकारण करणार्‍या प्रत्येकाला हे करावेच लागते. भाजपही त्याला अपवाद नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की, ज्या देव, देश आणि धर्म म्हणून वादातीत राहिल्या पाहिजेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना उद्धव ठाकरेंना मात्र याचे भान राहिले नाही.
 
दुपारी आपल्या मातोश्रींना दानधर्मासाठी कोट्यवधी रूपये देणार्‍या यशवंत जाधवांची पोलखोल झाल्याने उद्धव ठाकरेंची सभा अधिक चिडकी, रडकी होणार, यात काही शंकाच नाही. पण ती नळावरच्या भांडकुदळ बाईला आपले टीनपाटही भरून न मिळाल्याने जशी होईल तशी झाली. काँग्रेसचा कुठलाही दुय्यम दर्जाचा प्रवक्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जसे बालिश आरोप करतो, तसेच आरोप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारच्या सभेतून केले. स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीपर्यंत अन्यायाविरोधातील लढ्यातल्या संघाच्या सहभागाचे हजारो पुरावे उपलब्ध आहेत.
 
मात्र, या सगळ्या पुराव्यांना पुरून त्यावर खोटारडेपणाचा नंगानाच करायचा ठरवला तर कोण सांगणार? तसा तो उद्धव ठाकरेंनी केला, पण म्हणून वस्तुस्थिती लपून राहत नाही. १९२५ साली रा. स्व. संघाची स्थापना झाली ती भारताला पुन्हा कोणीही गुलाम करू शकणार नाही, इतकी संघटनशक्ती अर्जित करण्यासाठी. अर्थात, हे उद्धव ठाकरेंना समजणार नाही. पण त्यांच्यासाठी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील तुरुंगवासापासून ते चिमूरमध्ये ब्रिटिशांच्या बंदुकीतील गोळ्यांनी देहाची चाळण झालेल्या बालाजी रायपूरकरपर्यंत अनेकानेक संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याची उदाहरणे लिखित स्वरुपात उपलब्ध आहेत.
 
१९२८-२९ साली सायमनविरोधी आंदोलनात काँग्रेसनेच नागपूर व मध्य प्रांतातील प्रचाराचे काम डॉ. हेडगेवारांकडे सोपवले होते. डिसेंबर १९२९ मध्ये काँग्रेसने लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करत दि. २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून संघाच्या सर्व शाखांवर स्वातंत्र्यदिन साजरा झाला. २१ जुलै, १९३० रोजी डॉ. हेडगेवारांनी दहा हजार लोकांसोबत जंगल सत्याग्रह केला व या गुन्ह्यासाठी त्यांना सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षाही झाली. पुढेही अनेकानेक संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात, भागानगर सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला.
 
१९४२ सालच्या ‘चले जाव’ चळवळीदरम्यान ब्रिटिशांनी सुरु केलेल्या अटकसत्रात काँग्रेसचे अनेक नेते भूमिगत झाले. त्यांचा ब्रिटिशांपासून बचाव करुन त्यांना आश्रय देण्याचे महत्त्वपूर्ण काम संघ स्वयंसेवकांनी केले. अरुणा असफअली, नारायण गुरू, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, असे अनेकजण संघ स्वयंसेवकांकडे राहिले. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश परत मिळवण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी कित्येक वर्षे कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
 
अशावेळी दादरा-नगर हवेली आणि गोवामुक्तीसाठी संघस्वयंसेवकांनी लढा दिला. ही संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाची वानगीदाखल उदाहरणे! उद्धव ठाकरेंनी घरात नुसतेच बसून राहण्यापेक्षा वाचन करून याबाबतची अधिक माहिती घेतल्यास उत्तम. पण सध्या तरी ते १८५७ चे स्वातंत्र्यसमर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे शेतकरी आंदोलन, रामसिंह यांचे कुका आंदोलन, अनुशीलन समिती, हिंदुस्तान समाजवादी लोकतांत्रिक सेना, गदर पार्टी, अभिनव भारत, सशस्त्र क्रांतिकारी गट, हिंदू महासभा, आर्य समाज, आझाद हिंद सेना आणि रा. स्व. संघासारख्या अनेक देशप्रेमी संघटनांचे योगदान नाकारत संपूर्ण स्वातंत्र्यलढा फक्त आम्हीच लढवला म्हणणार्‍या काँग्रेसबरोबर सत्तेत बसलेले आहेत.
 
त्यामुळे त्यांनाही काँग्रेसचा गुण लागलेला आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे देशाची सत्ता उपभोगताना जसा स्वांतत्र्यलढ्याच्या इतिहासाची विटंबना करत स्वातंत्र्यलक्ष्मीसाठी सर्वस्वाचा होम केलेल्या इतर सर्वच स्वातंत्र्यसेनानींचा अपमान केला, तोच काँग्रेसी प्रपोगंडा आता उद्धव ठाकरेरुपी पोपटाच्या तोंडातून बाहेर पडत आहे. त्याला कारणही तसेच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ढोल-ताशे वाजू लागले आहेत. सगळेच राजकीय पक्ष आता काही ना काही करणार हे उघड आहे.
 
मात्र, स्वत:चा वकुब नसला आणि काही घडवून आणण्याची हिंमत नसली की काय घडते, त्याचा उत्तम नमुना म्हणजे उद्धव ठाकरेंची शनिवारची सभा. त्यांनी संघावर केलेली टीका त्याचेच लक्षण. दुसरीकडे, या सभेतले फुलबाजे, फुलांचे हार-तुरे, ढोल-ताशे हे सगळे पाहिले की, ते कोणाचे तरी डोहाळजेवण आहे की काय, असा प्रश्न पडावा अशी ही सभा होती. राज्यात मनसुख हिरनपासून शेतकर्‍यांपर्यंत कितीतरी निष्पापांच्या रक्ताचे डाग तुमच्या कुर्त्याला लागलेले असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असा रंगढंग कसा करू शकतात, हा खरे तर प्रश्नच.
 
पण, त्याचे सोयर-सुतक उद्धव ठाकरेंना असू शकत नाही. कारण, त्यांना स्वतःव्यतिरिक्त काही दिसत नाही. ते फक्त तसा आव आणतात. त्याचाच एक दाखला म्हणजे आपणच खरे हिंदुत्ववादी असल्याचे उद्धव ठाकरेंचे म्हणणे. खरे म्हणजे सध्या हिंदुत्ववादी असण्याची स्पर्धा सुरु झालेली आहे. जो तो उठतो तो आपणच खरे हिंदुत्ववादी असल्याचे म्हणतो वा दाखवतो. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही मठ-मंदिरांचे उंबरे झिजवत आपण हिंदू असल्याचे भासवत असतात. शनिवारच्या सभेआधीही उद्धव ठाकरेच खरे हिंदुत्ववादी असल्याचे त्यांच्या नेते-कार्यकर्त्यांकडून म्हटले गेले.
 
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व दाखवण्यासाठी त्यांच्या सभेआधी तसा देखावाही केला गेला, मारुतीचे रथ वगैरे फिरवले गेले. पण ते स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी स्वतःच्याच मालकासाठी टाळ्या वाजवण्यासारखे. त्यांच्याव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंना कोण हिंदुत्ववादी म्हणतो? उद्धव ठाकरे खरेच हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी तसे जाहीर करावे. त्यासाठी चांगली संधीही चालून आलेली आहे. सध्या काशिविश्वेश्वराला ज्ञानवापी मशिदीच्या तावडीतून सोडवण्यासाठी, 350 वर्षांपासून आपल्या दैवताच्या दर्शनाची आस लागलेल्या नंदीची प्रतीक्षापूर्ती करण्यासाठी हिंदूंचा संघर्ष सुरू आहे.
 
विशेष म्हणजे, हिंदूंचा हा संघर्ष कालातीत आणि अनादी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा आहे. हिंदूंच्या संघर्षाला पुढे नेण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. पण म्हणून त्यात दुसर्‍या कोणी वा शिवसेनेने पडू नये असे नव्हे. शिवसेनेनेही त्यात भाग घ्यावा, नुसती पोपटपंची करत बसू नये. त्यामुळे आता शिवसेनेने ज्ञानवापीच्या प्रश्नात उतरावे. शिवसेना तसे करणार असेल, तर त्याने कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. उलट आणखी एक हिंदू धर्मकार्यासाठी पुढे आला, याचा आनंदच होईल. उद्धव ठाकरेंनी हे समजून घ्यावे आणि आपण खरे हिंदुत्ववादी आहोत, काँग्रेसी पोपट नाहीत, हे दाखवण्याची हीच ती वेळ साधून घ्यावी.