ट्विटरचे नवे मालक मस्क

    दिनांक : 11-May-2022
Total Views |
ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांकडून मासिक शुल्क घेण्याचा मानस आहे. प्रसारित केलेल्या ट्विटचा मजकूर बदलणे, ट्विटरवर मुक्तचर्चेला चालना देताना कंपनीचे ‘अल्गोरिदम’ उघड करून त्यात पारदर्शकता आणणे, अशा अनेक सुधारणा एलॉन मस्कच्या अजेंड्यावर आहेत.
 

tweeter 
 
 
 
एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर मोजून ट्विटर विकत घेतल्यामुळे केवळ इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या विश्वातच नाही,तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही खळबळ माजली आहे. मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, जगातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेली ‘टेस्ला’चे सीईओ, ‘स्पेसएक्स’ या पहिल्या खासगी अंतराळ यान पाठवणार्‍या कंपनीचे संस्थापक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. अनेक भविष्यवेधी तंत्रज्ञान निर्मिती कंपन्यांमध्ये मस्क यांनी गुंतवणूक केली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यांपासून मस्कने ट्विटरचे समभाग घ्यायला सुरुवात केली. दि. १४ मार्चपर्यंत मस्कने कंपनीतील पाच टक्के समभाग विकत घेतले. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या धोरणांवर टीका करायला सुरुवात केली. मस्क यांची चाल लक्षात आल्यावर सुरुवातीला ट्विटरने त्यांना संचालक मंडळात जागा देऊन त्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला. पण, सुरुवातीच्या होकारानंतर मस्कने संचालक मंडळावर येण्यास नकार देत संपूर्ण कंपनीच विकत घ्यायची आपली इच्छा प्रदर्शित केली. एका समभागासाठी सुमारे ५४ डॉलर मूल्य देण्याची तयारी दाखवल्यावर त्यास नाही म्हणणे बहुतेक भागधारकांसाठी अशक्य होते. ट्विटरच्या व्यवस्थापनाने मस्कची योजना हाणून पाडायचे प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. दि. २५ एप्रिलपर्यंत मस्क ट्विटर विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा गोळा करण्यात यशस्वी ठरले.
 
मस्क यांचा निर्णय शहाणपणाचा ठरणार का आणि ट्विटर विकत घेऊन त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे, यावर सध्या बरीच चर्चा रंगली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि युट्यूबच्या तुलनेत ट्विटर वापरणार्‍यांची संख्या नगण्य, म्हणजे सुमारे 30 कोटींच्या घरात असली तरी त्याचा सामाजिक आणि राजकीय चळवळींवर प्रचंड प्रभाव आहे. १२ वर्षांपूर्वी अरब जगतातील राज्यक्रांत्या आणि लवकरच अनेक ठिकाणी त्यांचे रक्तरंजित यादवी युद्धात झालेले रुपांतर असो, २०१४ साली भारतातील ऐतिहासिक सत्तांतरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत असो, ‘ब्रेक्झिट’द्वारे ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडायचा निर्णय असो, २०१६ साली अमेरिकन राजकारणात नवख्या असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळालेला विजय असो किंवा मग २०२० साली त्यांचा झालेला पराभव असो, ट्विटरची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
 
एलॉन मस्क गेली अनेक वर्षं ट्विटरचे वापरकर्ते असून, ट्विटर हे सर्वसामान्यांच्या अभिव्यक्तीचे जागतिक व्यासपीठ असल्याने ते सर्वांसाठी खुले असावे या मताचे आहेत. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जन्मलेल्या अनेक इंटरनेट आणि समाजमाध्यम कंपन्यांचे संस्थापक वैचारिकदृष्ट्या डावे-उदारमतवादी असले तरी त्यांनी आपल्या कंपन्या व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवल्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये, खासकरून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेत डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांमधील दरी अधिक तीव्र झाली. त्यातून डाव्यांमध्ये ’वोक’ किंवा ‘जागृत’ म्हणून ओळखला जाणारा नवीन वर्ग तयार झाला. वर्णभेद, लिंगभेद, राष्ट्रवाद, जातीवाद या सगळ्याची चिंता आपल्यालाच आहे, असे दाखवण्याच्या प्रयत्नांत त्यांनी विरोधी विचारांच्या लोकांच्या विद्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या, अशा लोकांनी ट्विटर आणि अन्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर आपली वर्णी लावून जगाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे राखणदार झाले.
 
वर्तमानपत्रं, टीव्ही आणि रेडिओसारख्या माध्यमांमधील मजकूरावर नियंत्रण आणण्यासाठी या मजकुराची जबाबदारी संपादकांवर असते. याशिवाय त्यांना वेसण घालण्यासाठी सरकारी तसेच, अन्य नियंत्रक अस्तित्त्वात असतात. आजवर या मोठ्या इंटरनेट-समाजमाध्यम कंपन्यांनी आपण तंत्रज्ञान कंपन्या आहोत, माध्यम कंपन्या नाही या सबबीखालून सवलत मिळवली. त्यांचे म्हणणे होते की, आमच्या प्लॅटफॉर्मवरील संदेश, फोटो आणि व्हिडिओ वापरकर्त्यांकडून टाकले जातात. आम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत असल्याने त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. दुसरीकडे या कंपन्या आपल्यावरील मजकुराचे भांडवल करून अब्जावधी रुपयांच्या जाहिराती कमावतात आणि त्यासाठी भडकाऊ मजकुराला अधिक प्रसिद्धी देतात.
 
विविध लोकशाही देशांमध्ये जनमताला वळण देऊन निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव टाकायची त्यांची ताकद लक्षात आल्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात जाहिराती द्यायला सुरुवात केली. त्या स्वीकारताना त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले गेले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील आक्रमक प्रचाराचे मोठे स्थान आहे. अमेरिकेचे अध्यक्ष असतानाही ट्रम्प यांनी विरोधकांचा शेलक्या भाषेत उपमर्द करणे, अन्य देशांना निर्बंधांची किंवा धमकी देणे, अशा गोष्टींसाठी ट्विटरचा वापर चालू ठेवला. ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील बराचसा काळ आम्ही मजकुराचे नियंत्रण करू शकत नाही या सबबीखाली या कंपन्यांनी बोटचेपी भूमिका घेतली. निवडणुका जवळ आल्या तेव्हा ट्विटरने उदात्त भूमिका घेऊन ट्रम्प यांची चुकीची माहिती असलेली ट्विट ‘डिलिट’ करणे किंवा त्यांच्याखाली खुलासा लिहिणे असा खोडसाळपणा करणे सुरू केले. सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दलची वृत्त ती माहिती अनैतिक मार्गाने मिळवली म्हणून दडवण्यात आली.
 
हा दांभिकपणा होता. आजही ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर अश्लिल मजकूर, धमक्या, वंशद्वेषी मजकूर असतो. कारण, सर्वच्या सर्व मजकूर ओळखून तो गाळणे त्यांना शक्य होत नाही. दि. ६ जानेवारी, २०२१ रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचारास अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणांना जबाबदार धरून आजपर्यंत त्यांचे ट्विटर हँडल तहकूब करणार्‍या ट्विटरने त्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या बाबतीत मात्र तशी तत्परता दाखवली नाही. नरेंद्र मोदी शेतकर्‍यांच्या हत्याकांडाची योजना बनवत आहेत, असे ‘हॅशटॅग’ ट्विटरवर प्रसारित करण्यात आले. ते वापरून अनेक ट्विटर ‘हँडल’वरून खोटी ट्विट करण्यात आली. यातील काही ‘हँडल’ पाकिस्तानमधून तर काही कॅनडा, अमेरिका आणि अन्य देशांतील खलिस्तानवाद्यांकडून चालवण्यात येत होती. भारत सरकारने या ‘हँडल’ची नोंद घेऊन ती इंटरनेटवरून हटवण्यात यावी, अशी मागणी ट्विटरकडे केली असता ट्विटरने काही ‘हँडल’वर कारवाई केली. काही ‘हँडल’ दोन दिवसात पुन्हा सुरू झाली.
 
एलॉन मस्कना ट्विटरमध्ये अनेक सुधारणा करायच्या आहेत. कंपनी खासगी केल्यामुळे भागधारकांचा दबाव आणि सरकारकडून लावले जाणारे जाचक नियम आणि अटींपासून तिची सुटका होणार आहे. जास्त नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय किंवा सरकारी जाहिराती घ्यायच्या, तसेच त्यासाठी खोट्या खात्यांकडे किंवा त्यांद्वारे प्रसारित करण्यात येणार्‍या संदेशांकडे दुर्लक्ष करायचे आणि मग विद्वेश पसरवण्याचे किंवा पक्षपातीपणाचे आरोप झाले की, त्याविरुद्ध काही थातुरमातुर कारवाई करायची यामुळे समाजमाध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे. मस्क यांना ट्विटर जाहिरातींपासून जेवढा शक्य आहे तेवढा मुक्त ठेवायचा असून, त्यासाठी ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांकडून मासिक शुल्क घेण्याचा मानस आहे. प्रसारित केलेल्या ट्विटचा मजकूर बदलणे, ट्विटरवर मुक्तचर्चेलाचालना देताना कंपनीचे ‘अल्गोरिदम’ उघड करून त्यात पारदर्शकता आणणे, अशा अनेक सुधारणा एलॉन मस्कच्या अजेंड्यावर आहेत.
 
ट्विटरचे नियंत्रण हातातून गेल्याने त्याच्या व्यवस्थापनाचा तसेच डाव्या-उदारमतवादी ‘इकोसिस्टिम’चा संताप अनावर झाला आहे. एलॉन मस्कनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर आणण्यासाठी हे सर्व केले आहे. इथंपासून ते मस्कचे बालपण वर्णद्वेषी व्यवस्थेच्या काळातील दक्षिण आफ्रिकेत गेल्यामुळे ते त्याबद्दल पुरेसे संवेदनशील नाहीत, असे आरोप त्यांना सहन करावे लागत आहेत. ट्विटर मुक्त असणे याचा अर्थ तो अनिर्बंध असणे असा होत नाही, तर त्या त्या देशातील स्थानिक कायद्याच्या चौकटी त्याला लागू असतील, अशा अर्थाच्या वक्तव्याचाही चुकीचा अर्थ काढण्यात आला. अर्थातच, मस्क अशा टीकेला काडीचीही किंमत देत नाहीत. ट्विटरची मालकी बदलल्याने त्यात धोरणात्मक बदल होणार असून, त्यांचा जागतिक घडामोडींवर मोठा परिणाम होणार आहे.