श्रेष्ठ भारतासाठी द़ृढसंकल्प

    दिनांक : 07-Apr-2022
Total Views |

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय औचित्यपूर्ण भाषण झाले. साधारणत: कोणत्याही राजकीय पक्षाचा स्थापना दिवस साजरा करताना पक्षाच्या प्रगतीचा आणि नेत्यांचा उदोउदो केला जातो.

 
modi

 

'पार्टी विथ द डिफरन्स' असे वर्णन भारतीय जनता पक्षाचे केले जाते, त्याचे दर्शन या 42 व्या स्थापना दिवसाच्या वेळी झाले. यावेळी कोणा व्यक्तीची किंवा केवळ पक्षाच्या वाटचालीची चर्चा न होता नरेंद्र मोदी यांच्या मुख्य भाषणात देशाच्या प्रगतीची, विकासाची आणि श्रेष्ठ भारताच्या संकल्पाची चर्चा जास्त होती. अशा प्रसंगातूनच नव्याजुन्या कार्यकर्त्यांची धारणा विकसित होत असते.
 

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विजय झाला आहे. या पृष्ठभूमीवर एखाद्या अन्य पक्षाचा स्थापना दिवस असता तर त्या पक्षाच्या जिंदाबादच्या घोषणा, नेत्यांच्या विजय असोच्या घोषणा, कोणाचे तरी हात बळकट करण्याची भाषणे झाली असती. फक्त भारतीय जनता पक्षासारख्या पक्षातच अशावेळी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या विषयावर चर्चा होते आणि 'भारत माता की जय' या घोषणा दिल्या जातात. भाजपच्या स्थापना दिवसाचे महत्त्व सांगताना मोदी यांनी तीन गोष्टींची आठवण करून दिली. एक म्हणजे या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. दुसरी, वेगाने बदलणारी जागतिक परिस्थिती आणि तिसरी म्हणजे भारतासाठी नवीन नवीन संधी समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर Bharatiya Janata Party भाजपचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यावेळी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक पंडित दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी हे जनसंघाचे कार्यकर्ते बनले.

 

अल्पावधीतच देशभर जनसंघाचा विस्तार झाला. त्यावेळी जनसंघ आणि हिंदुत्त्वाला जातीयवादी असे हिणवत मर्यादित करण्याचे कारस्थान अन्य सर्व राजकीय शक्तींनी केले. संधीसाधू काँग्रेस आणि कथित डावे यात आघाडीवर होते. मात्र, उपेक्षा सहन करत कठोर परिश्रमासह अनेक कार्यकर्त्यांनी नेटाने आपले जीवन समर्पित करत जनसंघाचे काम वाढवत नेले. आणिबाणीत इंदिरा गांधींनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना मिसाखाली तुरुंगात डांबले तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली तुरुंगातच जनता पक्षाचा जन्म झाला. त्यात जनसंघ सहभागी झाला. आणिबाणीनंतर जनता पक्ष सत्तेत निवडून आला. मात्र जनता पक्षात स्पर्धा आणि घटक गटांत भांडणे सुरू झाली. त्यात जनसंघाच्या सदस्यांनी रा. स्व. संघात जायचे नाही अशी अट घालणे सुरू झाल्याने ती अट मान्य नसलेल्या कार्यकर्त्यांनी 1980 मध्ये मुंबईत अधिवेशन घेतले आणि तिथे Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हाही भाजपला राजकीय अस्पृश्यतेचा बळी ठरविण्याचे प्रयत्न झालेच. त्यातच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत भाजपचे देशात फक्त दोन खासदार निवडून आले तेव्हा भाजप संपला असे म्हणत टिंगलही करण्यात आली. मात्र, शहाबानो प्रकरणात मुस्लिम लांगूलचालनाची हद्द झाली. त्यातच श्रीरामजन्मभूमीचे आंदोलनही सुरू झाले.

 

या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून नंतर Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाचे जनसमर्थन वाढतच गेले. देशात आघाडी सरकारांची मालिका सुरू झाली तेव्हा अटलजींच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्याच काळात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी गुजरात विकासाचे एक मॉडेल समोर आणले. त्याची देशभर चर्चा होऊ लागली. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले आणि भारतीय जनता पक्षाला एकट्याला बहुमत मिळण्याइतके खासदार निवडून आले. त्यानंतर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सतत विजयाची पताका फडकावत राहिले आहेत. पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोनवेळा केलेले सर्जिकल स्ट्राईक, जगात भारताची उंचावलेली प्रतिमा, देशांतर्गत कल्याणकारी कार्यक्रमात गरिबांना मोफत घरे, मोफत गॅस आणि मोफत धान्य अशा केलेल्या योजना यामुळे देशातील स्थिती बदलली. भ्रष्टाचारमुक्त कारभारामुळे जनतेची पसंती वाढतच राहिली. अनेक राज्यात आणि 2019 साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठे प्रचंड यश मिळविले.

 

Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या आणि पुढच्या वाटचालीचे मर्म नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले की अन्य सर्व राजकीय पक्ष गठ्ठा मताचे राजकारण करतात आणि भाजप अशा पक्षांशी संघर्ष करतो. गठ्ठा मतांचे राजकारण करणारे त्या नादात लांगूलचालनात इतके खाली घसरले होते की शहाबानो प्रकरणात मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क नाकारून त्यांना मध्ययुगात लोटले होते. भाजपने या परिस्थितीतून तीन तलाक रद्द करण्यापर्यंत वाटचाल आणली आहे. गठ्ठा मतांच्या राजकारणामुळे देशाचे होणारे नुकसान लोकांच्या लक्षात आणून देण्यात भाजपला यश आल्याचे मोदी यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनतेचा पाठिंबा असलेला नेता म्हणून त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. तेथील राष्ट्रप्रमुखांशी संवाद करून नाते प्रस्थापित केले. त्यामुळे भारताची जगातली प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढली. योगदिन जगाने स्वीकारला. जगाला देण्यासारखे भारताकडे आहे हे जगाला दाखवून दिले.

 

कोरोना काळात अनेक देशांना लस आणि औषधांचे सहकार्य करून भारताने मानतावादी भूमिका स्पष्ट केली. या सगळ्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस विशेष उल्लेखनीय होता. भाजपचे वैशिष्ट्य सांगताना मोदी यांनी राजकीय घराणेशाहीचा मुद्दा सांगितला. भारतीय राजकारणाला घराणेशाहीने ग्रासले आहे. केवळ गांधी परिवार आणि काँग्रेसच नाही, तर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष सुद्धा एखाद्या कुटुंबाच्या मालकीचे पक्ष असल्यासारखे झाले आहेत. भाजप एकच पक्ष असा आहे की तो घराणेशाहीच्या विरोधात बोलतो. घराणेशाही चालविणारे पक्ष युवकांना राजकारणात पुढे जाऊ देत नाहीत हे त्यांनी अवर्जून सांगितले. एखादा राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर काय करतो हे जास्त महत्त्वाचे असते. भारतात राजकीय पक्ष सत्तेत आले की सत्तेचा दुरुपयोग करत पैसा कमावणे सुरू करतात. मात्र नरेंद्र मोदी म्हणाले की सत्तेचा उपयोग जनतेचे जीवन सुलभ बनविण्यासाठी करणे जास्त महत्त्वाचे आहे. सर्वांचा विकास करत आपण पुढे जात आहोत. कोरोनाचा कठीण काळ सहन करूनही देशाने प्रगती केली आहे. हिंदुत्वाचा राजकीय विचार हा उपेक्षेचा आणि झिडकारण्याचा विचार असल्याचा भ्रम भारतात अन्य राजकीय शक्तींनी अगदी आक्रमकपणे केला होता. Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाने केलेले ऐतिहासिक कार्य म्हणजे आता अन्य राजकीय पक्ष आपण हिंदू असल्याचे मोठ्या आवाजात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. गोत्र सांगत आहेत.

 

हिंदुत्वाला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी स्वीकारार्ह विचार म्हणून प्रस्थापित करण्याचे मोठे काम Bharatiya Janata Party भारतीय जनता पक्षाने केले आहे. भारतीय जनता पक्षाने स्थापना दिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय पंधरवडा 7 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान साजरा करण्याचे ठरवले आहे. याच काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. या काळात केंद्र सरकारच्या ज्या योजना देशातील सर्वसामान्य गरिबांसाठी आहेत, त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी आणि योजनांचा लाभ जनतेस मिळवून द्यावा असा कार्यक्रम कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. 'पथ का अंतीम लक्ष्य नही है, सिंघासन चढते जाना' हे गीत एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कसे काय असू शकते? असा प्रश्न भाजपच्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा हे गीत म्हटले जाते तेव्हा पडत असतो. राजकीय महत्त्वाकांक्षा जरी सत्तेचे सिंहासन मिळवणे ही असली तरी त्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर मोदी यांच्या भाषणातून आणि कृतीतून मिळाले आहे. जनकल्याण व श्रेष्ठ भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी सत्ता मिळाल्यानंतर अधिक जबाबदारीने काम करणे अधिक महत्त्वाचे आहे.